गेल्या वर्षभरात आणि विशेष करुन २०२० मध्ये एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे प्रेक्षकांचा कल हा ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे अधिकाधिक वाढू लागला आहे. घरबसल्या आवडत्या भाषेतील सिनेमे, वेब सीरिज एका क्लिकवर अगदी सहजसपणे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. आता मराठी प्रेक्षकांना लवकरच ओटीटीच्या रुपात एक सरप्राईज मिळणार आहे.

उद्योजक, ‘अहमदनगर महाकरंडक’ समितीचे अध्यक्ष, निर्माते नरेंद्र फिरोदिया आणि स्टार्टअप स्टुडियोचे संस्थापक राहुल नार्वेकर ‘लेट्सफ्लिक्स’ हा नवीन मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. ओटीटीसाठी असलेली पसंती लक्षात घेता मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी देखील त्यांच्या हक्काचं ओटीटी माध्यम मराठीमध्ये घेऊन येण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

नरेंद्र फिरोदिया, राहुल नार्वेकर आणि सिनेइंडस्ट्री यांचं नातं फार जुनं आहे. नरेंद्र फिरोदिया हे ‘सोहम’, ‘अनुष्का मोशन पिक्चर्स’, ‘लेट्सअप’ यांसारखे अनेक प्रोजेक्ट्सचे प्रमुख आहेत.‘अहमदनगर महाकरंडक’ या महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या एकांकिका स्पर्धेचे ते अध्यक्ष आणि प्रायोजक देखील आहेत. ‘अगंबाई अरेच्चा २’ आणि ‘ट्रिपल सीट’ या मराठी सिनेमांची निर्मिती त्यांनी केली आहे.

राहुल नार्वेकर यांनी ९०च्या दशकाच्या सुरुवातीला अनुराग कश्यप आणि विजय मौर्या यांसारख्या नामांकित सिनेनिर्मात्यांसह पटकथा लेखक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. नंतर त्यांनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्समध्ये सीईओ म्हणून काम सांभाळले. ‘इंडिया नेटवर्क’ आणि ‘स्टार्टअप स्टुडिओ’चे ते संस्थापक आहेत.

स्वतंत्र ओटीटी सुरु करणे हे आव्हानात्मक तर आहेच पण या माध्यमातून मराठी प्रतिभेसाठी व्यासपीठ उपलब्ध होईल, असं मत नरेंद्र फिरोदिया यांनी मांडलं. “कोणतीही नवीन गोष्ट सुरु केली की आव्हानं असतातच, कारण ती तुमची नवीन सुरुवात असते. तसेच ‘लेट्सफ्लिक्स’चं देखील आहे. पण आमच्या ओटीटीला उत्तम टीम लाभली आहे त्यामुळे आम्हांला आशा आहे की आम्ही सर्व आव्हानं नक्की पूर्ण करु आणि प्रेक्षकांना सर्वोत्तम अनुभव देण्याचा प्रयत्न करु. ज्यांना सिनेमा, वेब सीरीज, शॉर्ट फिल्म बनवायची आहे किंवा तयार आहे पण प्रदर्शित कुठे करायची याचा विचार करत आहेत किंवा ज्यांच्याकडे कॉन्टेंट आहे अशा टॅलेंटसाठी ‘लेट्सफ्लिक्स’ हा प्लॅटफॉर्म असेल”, असं ते पुढे म्हणाले.

हे नवंकोरं मराठमोळं ‘लेट्सफ्लिक्स’ ओटीटी प्लॅटफॉर्म २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.