विशेष
सध्या चर्चेत असलेले अजित दळवी लिखित, अतुल पेठे  दिग्दर्शित ‘समाजस्वास्थ्य’ हे र. धों. कर्वे यांच्या जीवनावरचे नाटक आवर्जून पाहावे असे आहे.

‘समाजस्वास्थ्य’ या नाटकाचे नाव बऱ्याच दिवसांपासून कानावर पडत होते. अतुल पेठे आणि अजित दळवी यांचे नाटक असल्याने नक्कीच काहीतरी वेगळे असणार असे वाटल्याने नाटकाला जायचेच असे मी ठरवत होते. अखेर योग आला आणि दादरच्या यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात मी हे नाटक पाहिले. नाटक रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या कार्यावर आहे इतकी मोघम माहिती मला होती. र. धों. म्हणजे धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र इतकेच मला तोपर्यंत माहीत होते. र. धों. कर्वे म्हटल्यावर साधारण काळ लक्षात आला होता. पण तोवर त्यांचे काम किंवा इतर विशेष माहिती नव्हती. तितक्यात नाटकाविषयी माहिती देणारे एक छोटेखानी पुस्तक हातात पडले. ते चाळल्यावर स्वातंत्र्यपूर्व काळात प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिकाचे नाव ‘समाजस्वास्थ्य’ होते आणि त्याचे संपादक र. धों. कर्वे होते इतका अंदाज आला.

lokmanas
लोकमानस: महाराष्ट्रधर्म राजकारणापुरताच मर्यादित नाही!
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
country has to be saved from leftist thinkers says All India Member of RSS Suresh Soni
“डाव्या विचारवंतांपासून देशाला वाचवावे लागेल, अन्यथा हे लोक…” संघाचे अखिल भारतीय सदस्य सुरेश सोनी यांचा इशारा

र. धों. कर्वे यांचे काम आणि त्यामध्ये तत्कालीन समाजात आपले काम करताना त्यांना येणाऱ्या अडचणी अशी मूळ संकल्पना असल्याचे पहिल्या टप्प्यात लक्षात आले. नाटकातील एकेका प्रसंगानंतर मला त्यांचे कार्य आणि निष्ठेबाबत औत्सुक्य वाटायला लागले. समाजाच्या हिताच्या काही गोष्टींसाठी लढणारे, खटाटोप करणारे र. धों. यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व आणि जीवनाच्या अखेपर्यंत त्या विषयाला तडीस नेण्याची त्यांची वृत्ती याचे कौतुक करावे तितके कमी अशीच असल्याची भावना झाली. र. धों. समोर आलेल्या अडचणींना न खचता सामोरे गेले आणि न्यायव्यवस्था तसेच समाजव्यवस्थेला त्यांनी वारंवार आपले म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन सनातनी आणि कर्मठ समाजाला मात्र त्यांचे काळाच्या पुढे जाऊन विचार करणे अजिबात मान्य नसल्याने त्यांना दीर्घकाळ संघर्ष करावा लागला. एखाद्या ध्येयाने झपाटलेले लोक तन-मन आणि धनाने एकरूप होऊन आपली भूमिका कशी पार पाडतात याचा प्रत्यय नाटकाच्या प्रत्येक टप्प्यावर येत गेला.

मासिकात वापरलेले शब्द अश्लील ठरवून, मासिकाच्या गुजराती आवृत्तीमध्ये वाचकांच्या प्रश्नांना उत्तर देताना वापरलेले शब्द आक्षेपार्ह ठरवून, इतकेच नाही तर मासिकातील जाहिरातीतील शब्दावरूनही र.धों. यांच्यावर वारंवार खटले भरण्यात आले. आताच्या काळात लैंगिक विषयावर लिहिणे किंवा प्रबोधन करणे हे पाप आहे किंवा यामध्ये काही गैर आहे असे आपल्याला अजिबात वाटणार नाही. मात्र १९३० ते १९४० या काळात लैंगितका, कुटुंबनियोजन या नाजूक विषयांवर भाष्य करणे अश्लील किंवा पाप समजले जायचे. मात्र र. धों. कर्वे कायमच काळाच्या पुढे असल्याने आणि सामाजिक समस्यांचे त्यांना उत्तम भान असल्याने त्यांनी या विषयावर जनजागृतीचे काम सुरू केले आणि नेटाने पुढेही नेले. र. धों. कर्वे आपले म्हणणे न्यायालयात मांडत असताना एक अतिशय नेमके वक्तव्य करतात. ते म्हणतात, धर्माचा सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी म्हणजे काम. कामवासनेचं आकर्षण माणसाला धर्माच्या आज्ञा मोडण्याचं सामर्थ्य देतं म्हणून धार्मिकांचा काम या गोष्टीवर राग. म्हणून ते सर्वात वाईट पाप. अगदी कमी शब्दात पण नेमके भाष्य करणारे हे वक्तव्य र. धों. यांच्या कामाची जाणीव करून देते.

अतुल पेठे यांनी आपल्या ताकदीने नाटक उचलून धरले आहे. बाकी कलाकारांची भूमिकाही साजेशी आहे. न्यायालयातील प्रसंग तसेच तत्कालीन समाजाच्या दृष्टीने वादग्रस्त वक्तव्य करताना नट म्हणून त्यांनी कुठेही आक्रस्ताळेपणा केलेला जाणवत नाही. आपल्या बोलण्याच्या शैलीतून आणि देहबोलीतून त्यांनी र. धों. यांची भूमिका समर्थपणे पेलली आहे असे म्हणता येईल. लैंगिकतेविषयी काम करत असल्याने मिशनरी महाविद्यालयातून र. धों. यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता असते. मात्र अजिबात न डगमगता ते तेथील प्राचार्याशी ज्या पद्धतीने संवाद साधतात तो प्रेक्षक म्हणून आपल्याला निश्चितच भावतो. नोकरीच्या ठिकाणी नोकरी, पण वैयक्तिक आयुष्यात मी काय करायचे याचा पूर्ण अधिकार माझा आहे आणि हे मान्य नसेल तर मी नोकरीचाही त्याग करतो असे सांगत ते थेट राजीनामा देतात. त्यामुळे एखाद्या सामाजिक प्रश्नासाठी लढण्याची समाजसुधारक म्हणून असणारी त्यांची तळमळ पुन्हा एकदा अधोरेखित होते.

नाटकात एका टप्प्यावर र. धों. कर्वे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट दाखवली आहे. त्यानंतर र. धों. यांचा एक खटला वकील म्हणून बाबासाहेब लढतात, मात्र त्यांनी केलेला युक्तिवाद चुकीचा असल्याचे न्यायालयाने सांगितल्यावर मात्र र. धों. काहीसे शांत होतात. वारंवार आपल्यावर होणारे खटले आणि त्यासाठी खर्च होणारी शक्ती, पैसा यांना न वैतागता शेवटच्या खटल्यात मात्र ते स्वत:च युक्तिवाद करतात आणि तो जिंकतातही. लैंगिक विषयांवर कोणीही लिहिलं तर त्याला अश्लील ठरवता कामा नये असा महत्त्वाचा युक्तिवाद डॉ. आंबेडकर ३०च्या दशकात मांडतात. ज्या काळात सामान्य स्त्री-पुरुष संबंधांवर बोलण्याची परवानगी नव्हती, त्या काळात हा विवेकवादी विचार मांडणं  ही खूपच महत्त्वाची गोष्ट होती. नाटकात आरोपीच्या पिंजऱ्यातल्या माणसाच्या बाजूने तर्कशुद्ध मांडणी आहे, धर्मचिकित्सा आहे, विवेकवाद आहे, बुद्धिप्रामाण्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्भीडता आहे. छोटय़ा छोटय़ा सहा-सात प्रसंगांमध्ये खटला आणि घरातले प्रसंग अशा मांडणीत नाटक पुढे सरकते आणि नकळत आपल्याला त्या काळाची, त्या वेळी असलेल्या प्रश्नांची प्रकर्षांने जाणीव करून देतं.

‘पूर्ण हयात गेली तरी चालेल पण मी माझ्या ध्येयाशी प्रतारणा करणार नाही,’ हा र. धों. कर्वे यांसारख्या समाजसुधारकांचा भाव आपल्याला आतून विचार करायला लावणारा आहे. संततीनियमन, गुप्तरोग आणि आरोग्यविषयक जनजागृती करणाऱ्या मासिकात अश्लील लेखन केल्याबद्दल त्यांच्यावर कित्येकदा आरोप ठेवले गेले. अटकसत्र, न्यायालयाच्या फेऱ्या, आरोप-प्रत्यारोप या सगळ्यांनी ते अनेकदा थकतात. मोडून पडतात. पण पुन्हा नव्या उमेदीने उभे राहात आपण करत असलेले काम समाजासाठी गरजेचे असल्याचा ठाम विश्वास असल्याने ते शेवटच्या घटकेपर्यंत हा लढा सुरू ठेवतात. या नाटकाने अनेक पुरस्कार मिळवत आपला ठसा उमटवला आहे.
सायली जोशी – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा