मराठा साम्राज्य स्थापन करण्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ यांचा सिंहाचा वाटा आहे. हिंदुस्थानातील निजाम, हैदर मोगल, सिद्दी यांसारख्या परकीय महासत्तांना मात देणारा अजिंक्य योद्धा म्हणजे ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’. मराठी मुलखात आत्मविश्वास आणि स्वराज्यनिष्ठा निर्माण करणारा ‘संस्थापक पेशवा’! दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक मारणारा मराठी लढवय्या म्हणजे ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’. अशा या महापराक्रमी योद्ध्याची शौर्यगाथा आता ‘अजिंक्य योद्धा’ या नाट्यरूपाने आपल्या समोर येणार आहे.

वाचा : ‘पद्मावती’ चित्रपटाला ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाचा हिरवा कंदील

संजय ह. पांडे यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या तसेच पंजाब टॅाकीजची निर्मिती असलेल्या ‘अजिंक्य योद्धा श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ या महानाट्याला लवकरच प्रारंभ होणार असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. वरुणा मदनलाल राणा दिग्दर्शित आणि प्रताप गंगावणे लिखित ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ यांच्या जीवन चरित्रावरील सर्वात मोठे असे हे ‘महानाट्य’ आहे. या महानाट्यातून ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ यांचा इतिहास आणि जीवनचरित्र उलगडलं जाणार आहे. अवघ्या ४० वर्षांच्या आयुष्यात या पेशव्याने दैदिप्यमान आणि गौरवशाली इतिहास घडवला. युद्ध कौशल्य, लष्करी गुण, मुत्सद्दीपण, प्रशासकीय कौशल्य यांचा सुरेख मिलाफ असलेले बाजीरावांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचा इतिहास आजच्या पिढीला ज्ञात व्हावा या उद्देशाने या महानाट्याची निर्मिती करण्यात येत आहे.

वाचा : दोन वर्षांपूर्वी अशी दिसायची ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर

या महानाट्यातील गाणी गायक आदर्श शिंदे, नंदेश उमप, वैशाली माडे यांनी गायली आहेत. आदर्श शिंदे यांनी गायलेलं शीर्षकगीत अप्रतिम झाले आहे. संगीत आदि रामचंद्र, विनीत देशपांडे यांचे असून वेशभूषा पौर्णिमा ओक यांची आहे.