News Flash

BLOG : सत्तेचे राजकारण…. जे सिनेमात तेच प्रत्यक्षात

मराठी माणसाच्या अनेक आवडत्या गोष्टीतील एक म्हणजे राजकारण

दिलीप ठाकूर

राज्याच्या राजकारणात जे काही चाललंय, न चाललंय, चालल्यासारखे वाटतेय, जे काही चालेल असे वाटते याची कोणीही कल्पना करु शकत नाही… सत्तेचे राजकारण कधीच सरळमार्गी नसतेच, त्यात कधी?, का?, कशी? नागमोडी वळणे येतील, अथवा कदाचित येणारच नाहीत हे खुद्द कसलेले राजकारणीही सांगू शकत नाहीत, म्हणूनच तर ‘मुख्यमंत्री कोण होणार ‘ याचा सस्पेन्स सतत रंगत आणणारा ठरतो. राजकारण हे असेच असते हे एकदा का आपण स्वीकारले की त्यातील काही गोष्टी समजून घेता येतात. कधी त्या मराठी राजकीय पटातून समजून येतात.

मराठी माणसाच्या अनेक आवडत्या गोष्टीतील एक म्हणजे राजकारण! आणि ते मग चित्रपट, नाटक, साहित्य, व्यंगचित्र अशा अनेक माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु असतोच.  मराठीत जवळपास पंचवीस -तीस बरे वाईट राजकीय पट पडद्यावर आले. ‘एक गाव बारा भानगडी’, ‘मुक्काम पोस्ट ढेबेवाडी’ अशा अनेक ग्रामीण चित्रपटात ‘पुढारी ‘ ही व्यक्तिरेखा हमखास असे आणि अनेकदा तरी निळू फुले यांनी ती अतिशय बेरकीपणे साकारलीय.  पण मराठीतील सर्वोत्कृष्ट राजकीय पट म्हटला की, हमखासपणे आठवतो तो डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सिंहासन ‘ ( १९७९). अरुण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ आणि ‘सिंहासन ‘ या कादंबरीवर आधारित विजय तेंडुलकर यांची पटकथा आणि संवाद असलेल्या या चित्रपटात राजकीय पत्रकार दिगू ( निळू फुले) यांच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्रातील त्या काळातील राजकीय घडामोडी/कुरघोडी/शह काटशहाच्या खेळी आपल्यासमोर येतात. मुख्यमंत्री शिंदे ( अरुण सरनाईक) हे पक्षाअंतर्गत राजकारण आणि विरोधी पक्षाची खेळी या दोन्हीत कशी चाणाक्षपणे, मुत्सद्दीपणे हाताळतात आणि सत्तेच्या राजकारणात मित्र आणि शत्रू कसा बदलत जातो याचा अनुभव घेतात हे यात होते. त्यात पुन्हा मुंबईतील कामगार संघटनेचा नेता डिकॉस्टा (सतिश दुभाषी) आणि मुख्यमंत्री यांच्यातील संघर्ष आहेच. हे सगळे राजकीय पत्रकार दिगू तटस्थपणे पाहतोय, पण राजकारणातील कोणते चेहरे खरे आणि मुखवटा कोणता हे सतत बदलत राहिल्याने तो चक्रावून जातो. मनाचा अजिबात थांगपत्ता लागू न देता मुख्यमंत्री शिंदे एकेक प्यादे खेळवत असताना अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे ( डॉ. श्रीराम लागू) त्यांना सतत अडचणीत आणतात. सगळा पट चक्रावून जातो, मुख्यमंत्रीपदाचे राजकारण जसे दिसते, त्यापलिकडे जाऊन बरेच काही असतेच असते, ते बिटवीन द लाईन सुरु असतेच हेच ही कलाकृती अधोरेखित करते. एक तर मराठीतील हा कसदार कलाकारांचा जबरदस्त अभिनय असलेला मल्टी स्टार कास्ट चित्रपट असल्याने त्याला विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली. या चित्रपटात अरुण सरनाईक, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू,दत्ता भट्ट, मधुकर तोरडमल, सतिश दुभाषी, श्रीकांत मोघे, माधव वाटवे, मोहन आगाशे, जयराम हर्डीकर, नाना पाटेकर, लालन सारंग, रिमा लागू, उषा नाडकर्णी, राजा मयेकर इत्यादी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारलीय. त्या काळात या राजकीय पटाची बरीच उलटसुलट चर्चा झाली. एकीकडे चित्रपट समीक्षकांची दाद मिळाली तर दुसरीकडे राजकीय विश्लेषकांनीही भाष्य केले.

मराठीतील आणखीन एक उल्लेखनीय राजकीय पट म्हणजे उज्ज्वल ठेंगडी दिग्दर्शित ‘वजीर ‘( १९९३). या चित्रपटात मुख्यमंत्री बाबुसाहेब मोहिले (अशोक सराफ) यांनाही अंतर्गत राजकारणात आजूबाजूच्या नेत्यांच्या महत्वाकांक्षा, अहंकार, असूया, स्पर्धा, डावपेच हे सगळेच मुरब्बीपणे हाताळावे लागते. राजकारणात नेमका विश्वास कोणावर आणि कधी ठेवायचा, तसेच संशय कधी येईल याचा काहीच नेम नसतो. त्यातच कोणत्याही सामाजिक समस्येचे राजकारण केले जाऊ शकते हेदेखील हा राजकीय पट समोर आणतो. या चित्रपटातही ‘वजनदार ‘ कलाकारांचा समावेश असल्याने या चित्रपटाने वेगळी उंची गाठली. या चित्रपटात अशोक सराफ, विक्रम गोखले, अश्विनी भावे, उज्ज्वल ठेंगडी, इला भाटे, आशुतोष गोवारीकर, कुलदीप पवार, चंद्रकांत गोखले, कुसुम देशपांडे, फैय्याज,सयाजी शिंदे, सुधीर जोशी, प्रदीप वेलणकर इत्यादी कलाकार आहेत. या राजकीय पटानेही रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळवला.
श्रावणी देवधर दिग्दर्शित “सरकारनामा” (१९९७) या राजकीय पटात मुख्यमंत्री उत्तमराव देशमुख (यशवंत दत्त) यांच्या खुर्चीभोवतीचे सामाजिक, राजकीय डावपेच आहेत. ते हाताळण्याचे कौशल्य आणि कसब कसे संयतपणे असावे लागते अन्यथा राजकारण धक्कादायक वळण घेऊ शकत असते. जनतेच्या हितासाठीच सत्ता आहे, पण राजकीय सिस्टीम नेमके काय करेल हे सांगता येत नाही. राजकीय पत्रकार वैजयंती पाटील (अश्विनी भावे) हे सगळे राजकारण आणि समाजकारण आपल्या वृत्तपत्रातून जनतेसमोर आणते. तिलाही शोध पत्रकारितेत आश्चर्याचे काही धक्के बसतात. अजेय झणकर यांची कथा पटकथा संवाद व गीते असलेल्या या राजकीय पटाचीही भरपूर चर्चा झाली. या चित्रपटात यशवंत दत्त, दिलीप प्रभावळकर, अजिंक्य देव, अश्विनी भावे, सुकन्या कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर, आशुतोष गोवारीकर, यतीन कार्येकर, नंदू माधव, मकरंद अनासपुरे, शर्वरी जमेनीस, श्रीकांत मोघे, उपेंद्र लिमये, मिलिंद गुणाजी इत्यादी दर्जेदार कलाकार आहेत. राजकीय पटात लहान मोठ्या भरपूर व्यक्तीरेखा स्वाभाविक असतात पण मान्यवर कलाकार अशा चित्रपटात भूमिका आवर्जुन साकारतात असे दिसतेय. त्यामुळे हे राजकीय पट कायमच वास्तववादी आणि परिणामकारक ठरलेत.

अनंत माने दिग्दर्शित ‘गल्ली ते दिल्ली ‘ यापासून रामदास फुटाणे दिग्दर्शित ‘भगिरथ सरपंच ‘ असे राजकारणाचे विविध पैलू दाखवणारे चित्रपट मराठीत आले. महेश बनसोडे यांनी ‘आमदार माझ्या खिशात…. ‘ या नावाचा चित्रपट निर्माण केला. दिग्दर्शक दत्ताराम तावडे यांनी ग्रामीण राजकारणाचे रंगढंग दाखवणारा ‘खुर्ची सम्राट ‘ पडद्यावर आणला. अवधूत गुप्ते याने आपल्या दिग्दर्शनातील ‘झेंडा ‘ या चित्रपटात शिवसेना फूटून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष जन्माला आला हे बरेचसे वास्तवाच्या जवळ जाणारे दाखवले. असे अनेक संदर्भातील राजकीयपट मराठी रसिकांना पाह्यला मिळताहेत. समिर विध्वंस दिग्दर्शित ‘धुरळा ‘ या मल्टी स्टार कास्ट राजकीय पटातही ग्रामीण राजकारणाचे बदलते रंग आणि जाग्या होत गेलेल्या महत्वाकांक्षा यांचे प्रभावी दर्शन घडेल असे त्याच्या टीझरवरुन वाटतेय. प्रदर्शनास सज्ज असलेल्या या राजकीयपटात अलका आठल्ये, प्रसाद ओक, सिध्दार्थ जाधव, अमेय वाघ इत्यादी कलाकार आहेत पण धक्कादायक बाब म्हणजे सई ताह्मणकर आणि सोनाली कुलकर्णी यांचा अगदी वेगळा लूक आहे. राजकीय पटात लहान मोठ्या भूमिका साकारताना मराठी कलाकार अधिक काळजी घेतात हे अधोरेखित होतेय. ‘सूर्योदय ‘ ते ‘कागर ‘ अशी राजकारणाचे कमी अधिक प्रमाणात दर्शन घडवलेले आणि कधी काही भाष्य करणारे चित्रपट मराठीत आले/येत राहतीलच. राज्याच्या राजकारणात सध्या उडालेला ‘धुरळा ‘ पाहताना अशा काही मराठी राजकीयपटाची आठवण येणे स्वाभाविक आहेच. सिनेमाच्या पडद्यावरची पटकथा आणि संवाद हे अगोदर लिहिले जातात, प्रत्यक्षातील सत्तेच्या राजकारणातील पटकथा आणि संवाद कधीही बदलू शकतात, बदलावे लागतात, कधी तर ते कसे आणि का बदलले हेच समजत नाही आणि यालाच खरे राजकारण म्हणतात. पण अनेक राजकीय पटांतील राजकारण प्रत्यक्षातील सत्तेच्या राजकारणाचे दर्शन घडवतात म्हणूनच रसिकांना आवडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 9:09 am

Web Title: marathi political movie blog by dilip thakur ssj 93
Next Stories
1 संजय राऊतको गुस्सा क्यू आता है?
2 शेवट काही होवो, फडणवीसांचं एकाकी पडणं सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ
3 शिवसेनेनं आजपर्यंत कुणा-कुणाशी केल्या युती व आघाडी!
Just Now!
X