|| भक्ती परब

काव्या निखिलच्या घरी आली आहे. तिथे निखिलचे आई-वडीलही आहेत. काव्या निखिलला खूप सुनावते, मग निखिलच्या वडिलांकडे बघून म्हणते, तुमचा मुलगा पळपुटा आहे. आधी विधीमुळे आणि आता माझ्यापासून पळायला बघतो आहे. पुढे ती म्हणते, परंपरा आणि संस्कारांची जळमटं चढलेल्यांना हा धक्का कसा पचणार.. तर दुसरीकडे एका दृश्यात विधी आणि विश्वास यांचा संवाद सुरू आहे. तिथे विधी आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, वगैरे त्याला ऐकवते आहे. ‘जिवलगा’ मालिकेतील ही दोन दृश्ये आणि त्यातले संवाद आहेत. अलीकडे बऱ्याच मालिकांमध्ये कधी साधे-सोपे संवाद ऐकायला मिळतात तर कधी वैचारिक पातळीवर जाणारे संवाद ऐकायला मिळतात. अशा वेळी प्रेक्षक म्हणतात, अरे या मालिकेचे संवाद कोण लिहितं, त्याला खरंच मानलं पाहिजे. प्रेक्षकांच्या अशा विचारण्यामागे कौतुक तितकाच उपहासही दडलेला असतो. सध्या प्रेक्षक अशी बरीच मालिकांमधील दृश्यं आणि संवाद पाहून यामधील उपहास अधिक गहिरा होतो आहे.

book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!

‘जीवलगा’ मालिकेत विश्वास, काव्या, निखिल आणि विधी यांच्या नात्यांमधील गुंता कसा सुटणार आहे, विधी आणि विश्वास हे दोघे मिळून काही योजना आखणार का, हे येत्या काही भागांत पाहायला मिळेल. या मालिकेतील संवाद कधी कधी समजायला जड जातात तर कधी सोपे वाटतात. त्यामुळे फार तात्त्विक पातळीवर जाऊ नये, अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेत नुकतंच ईशा आणि मायरा या दोघींमधलं एक दृश्य पाहायला मिळालं. ते अप्रतिम चित्रित केलेलं होतं. अलीकडे फारच कमी मालिकांमध्ये अशी हळवी आणि मनाला भिडणारी दृश्यं पाहायला मिळतात. मायरा ईशाची माफी मागते. तिला म्हणते, ईशा मी तुला माणूस म्हणून समजून घेतलं नाही. तुला जे जे मिळालं, ते मला मिळायला हवं, अशी इच्छा मनात धरली आणि सतत तुझा तिरस्कार करत राहिले. ईशाही तिला मोकळ्या मनाने माफ करते. तिला छान समजावते. मग मायरा ईशाला मिठी मारते. मालिकेच्या सुरुवातीपासून मायरा आणि ईशामधील नातं पाहता हे दृश्य इतकं अप्रतिम साकारलं गेलं की ते खूप भावलं. अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने मायराची व्यक्तिरेखा उत्तम वठवली आहे. आता या मालिकेत विक्रांतला शिक्षा देण्यासाठी ईशाने अजून एक योजना आखली आहे. ती नेमकी काय करणार आहे, हे पुढील भागात पाहायला मिळेल. या मालिकेत जयदीप आणि ईशाचं दीर-वहिनीचं नातं छान दाखवण्यात आलंय. जयदीपचं ईशाला माय फ्रेंड वहिनी म्हणणं, प्रेक्षकांना फारच आवडलंय. काही जणं तर आपले वहिनीबरोबरचे छायाचित्र पोस्ट करताना ‘माय फ्रेंड वहिनी’ अशी ‘कॅप्शन’ देऊ लागले आहेत.

काही मालिकांमधील दृश्यं हळवी करतात तशी काही मालिकांधील दृश्यं हा काय बालिशपणा, असं म्हणायला भाग पाडतात. कलर्स मराठीवरील श्री लक्ष्मी नारायण या पौराणिक मालिकेत एक दृश्य होतं. त्यात लक्ष्मीला इंद्रदेवांना तिचा स्पर्श झालेली एक वस्तू द्यायची असते. तेव्हा लक्ष्मी तिच्या वडलांना सांगते, मी मला प्रिय असलेली कमलपुष्पे देऊ का? वडील हो म्हणतात. पुढे त्या दृश्यात मात्र जे घडलं ते सगळंच हास्यापद होतं. ती ताट घेते आणि तिच्यासमोर असलेल्या कुंडामधून कमळं खुडू लागते. ती ते करत असताना ती फुलं खरी नाहीत, ती प्लास्टिकची किंवा कागदाची असावीत हे दिसते. या दृश्यामध्ये लक्ष्मीला कमळं खुडताना दाखवण्याची आवश्यकता नव्हती. ती आत जाते आणि ताज्या कमलपुष्पांनी भरलेलं ताट घेऊन येते, असं दाखवलं असतं तरी चाललं असतं. कमलपुष्पे ही रात्रभर पाण्यात ठेवली तरी टवटवीत राहतात. चित्रीकरण करताना ही साधी बाब लक्षात येऊ नये, म्हणजे कमालच आहे. पौराणिक मालिकांमधील व्हीएफएक्स तंत्र किती म्हणून प्रेक्षकांनी सहन करावं, त्यालाही मर्यादा आहेत. पौराणिक मालिकांच्या सादरीकरणात अशा बऱ्याच बालिश गोष्टी दिसतात. अशा तांत्रिकपणामुळेच अलीकडच्या पौराणिक मालिकांचा आत्मा हरवलेला दिसतो.

कलर्स मराठीच्या ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेत सिद्धीची पहिली वटपौर्णिमा साजरी होताना पुढील भागात पाहायला मिळणार आहे. सणांच्या निमित्ताने वेगळं वळण मालिकेला देण्याचं कसब याही मालिकेत पाहायला मिळणार आहे. त्यातून शिवा आणि सिद्धीच्या नात्यात काय नाटय़ घडणार, हे येत्या भागांमध्ये पहायला मिळेल.

झी मराठी वाहिनीवर ‘मिसेस मुख्यमंत्री’ ही नवी मालिका २४ जूनपासून दाखल होते आहे. त्यामुळे ‘लागीरं झालं जी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अज्या आणि शितली या दोघांनी मालिकेच्या सुरुवातीपासून लक्ष वेधलं होतं. पण त्यांच्या लग्नानंतर मात्र ही मालिका भरकटत गेली. ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतून अमृता धोंगडे ही अभिनेत्री छोटय़ा पडद्यावर पदार्पण करत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत राणादाला कोणीतरी खूप मारहाण करतंय, असं दाखवण्यात येणार आहे. याची दृश्ये समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात २० जूनपासून दर गुरुवारी कर्मवीर हा विशेष भाग दाखवण्यात येणार आहे. येत्या गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते अधिक कदम येणार आहेत, तर त्या पुढील भागात सयाजी शिंदे येणार आहेत. कथात्मक मालिकांमधील दृश्य आणि संवाद प्रेक्षकांच्या डोक्याला कधी ‘शॉट’ देतात तर हळवंही करतात. पण ‘बिग बॉस’सारख्या कथाबाह्य़ कार्यक्रमांमधील दृश्य आणि संवाद मात्र डोक्याला ‘शॉट’च देतात. नुकतंच ‘बिग बॉस’मध्ये एक पूर्ण एपिसोडभर शिवानी सुर्वेला प्रेक्षकांनी फक्त ‘बिग बॉस मला घरी जायचंय’ एवढंच बोलताना ऐकलं. त्यानंतर शिवानी सुर्वेच्या बोलण्यात खरेपणा आहे की ती नाटक करतेय हेच कळेनासे झाले आहे. अशी दृश्यं आणि संवाद ‘बिग बॉस’मध्ये ऐकायला मिळतात तेव्हा हा कथात्मक मालिकांसारखाच लिहिला गेलेला कार्यक्रम आहे, असे वाटू लागते. परंतु दुसऱ्याच दृश्यात स्पर्धकांना कचाकचा भांडताना बघून अजून आश्चर्याचा धक्का बसतो. काय खरं आणि काय खोटं हेच कळेनासं होतं. पण हेही तितकंच खरं की दृश्य आणि संवादांच्या अशा अफलातून खेळीमुळेच मालिकांना जिवंतपणा येतो.