|| भक्ती परब

मालिकांचं हे जग कधी खोटं वाटतं, कधी खरं वाटतं. तार्किकता लावत बसलो किंवा त्यात दाखवण्यात येणाऱ्या प्रसंगांची चिकित्सा करत बसलो तर हाती काहीच लागत नाही. मालिका किंवा एकूणच कलेचा आस्वाद घेताना चिकित्सा आणि तर्क-वितर्क थोडे बाजूला ठेवावे लागतात. कलाकार आपल्या कलेतून प्रेक्षकांचं मन आशेच्या किरणांनी भरून टाकतात. प्रेक्षकांचं मनोरंजन करावं, हा त्यांचा हेतू समजून घ्यावा लागतो. बऱ्याच मालिकांमधील घटना-प्रसंग चिकित्सक वृत्तीने पाहिले तर आपल्याला पटत नाहीत. अशा वेळी हा अतिविचार न केलेला बरा.. फक्त आनंद घ्यायचा असतो. एक नाही आवडली तर दुसरी मालिका पाहण्यासाठी असतेच. आपल्याकडे पर्याय आहेत, त्यातून आपल्याला आवडतं ते निवडलं पाहिजे. अलीकडेच बऱ्याच मालिकांमध्ये अचानक बदल होत आहेत आणि प्रेक्षकांना आश्चर्याचे धक्के बसत आहेत. त्यामुळे पर्यायांचा विचार गरजेचा झाला आहे.

‘एक भ्रम सर्वगुणसंपन्न’ या स्टार प्लसवरील मालिकेत अलीकडे असाच धक्कादायक प्रकार घडला. मालिकेला म्हणावा तेवढा प्रभावी टीआरपी नव्हता, त्यातही मुख्य नायिकेची व्यक्तिरेखा साकारणारी श्रेणू पारेख या अभिनेत्रीभोवतीच कथानक फिरत असल्यामुळे इतर कलाकार नाराज होते. मालिकेत कितीही वळणं आली तरी मुख्य नायिकाच जिंकणार, त्यामुळे नेहमी तीच वरचढ ठरणार. म्हणून अयुब खान, तन्वी डोग्रा यांसारख्या मालिकेतील कलाकारांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी आम्ही मालिका सोडली नाही, वाहिनीने आम्हाला काही कारणं देऊन मालिका सोडायला लावली, असे कलाकारांचे म्हणणे आहे. पण या सगळ्यात लेखकावर मात्र खूप जबाबदारी आली. मालिकेतील एवढे कलाकार मालिका सोडून गेले म्हटल्यावर त्यांचा मृत्यू होतो, हे वळण मालिकेला द्यावं लागलं. आणि मुख्य नायिकेचा बदला पूर्ण होतो, असं दाखवावं लागलं. हे काम लेखकाने चोख पार पाडलं. त्यामुळे आता उरलेल्या दोन कलाकारांसह या मालिकेचा नवा प्रोमो चित्रित झाला आहे. चर्चा अशीही कानावर येतेय की प्रोमोत दिसणारे हे दीर-वहिनी पुढे एकमेकांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळणार आहेत. टीआरपीची गणितं आणि कलाकारांचं मालिका सोडून जाण्यामुळे काय काय करावं लागतं, याचं ही मालिका एक ताजं उदाहरण आहे.

कलाकार स्वत: मालिका सोडून जाणं आणि वाहिन्यांनी त्यांना टीआरपीचं कारण सांगून काढून टाकणं, असे बरेच प्रकार अलीकडे व्हायला लागले आहेत. पण ‘शो मस्ट गो ऑन’ या सूत्रानुसार पुढे जावं लागतं. दैनंदिन मालिका आणि कथाब’ कार्यक्रमांपेक्षा या आठवडय़ात काही वेगळं पाहायचं असल्यास ‘हिस्ट्री टीव्ही१८’, ‘डिस्कव्हरी’, ‘एफवायआय टीव्ही १८’, ‘एपिक’ आणि ‘लिव्हिंग फुड्ज’ या वाहिन्यांवर बरंच काही अफलातून पहायला मिळणार आहे.

‘लिव्हिंग फुड्ज’ या वाहिनीवर नेहमी प्रेक्षकांना कोडय़ात टाकणारे प्रोमो दाखवले जातात. या वेळी वाहिनीने एक मस्त प्रोमो चित्रित केला आहे. बर्फाळ पर्वतरांगा, बाईकवर स्वार झालेला प्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार आणि बर्फवृष्टी असं बरंच काही दिसतंय. हे दाखवताना वाहिनीने नवा कार्यक्रम येतोय त्याचे नाव ओळखा आणि बक्षिसं मिळवा, असं म्हटलं आहे. ‘एपिक’ वाहिनी २३ जूनला ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस’ खास अंदाजात साजरा करणार आहे. ‘उम्मीद इंडिया’ या सीरिजचे एका पाठोपाठ एक असे १४ भाग दाखवून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणार आहे. प्रसिद्ध क्रिके टपटू वीरेंद्र सेहवाग या सीरिजचं सूत्रसंचालन करणार आहे. या सीरिजमध्ये भारतातील प्रसिद्ध ऑलिम्पिक खेळाडूंचा प्रवास पाहता येणार आहे. तसेच ते ऑलिम्पिकसाठी कशी तयारी करतात, तेही पाहायला मिळणार आहे.

‘हिस्ट्री टीव्ही १८’ या वाहिनीवर शौर्याचं आगळंवेगळं रूप पाहायला मिळणार आहे. ‘सिक्स्टी वन कावलरी-इंडियाज हॉर्स वॉरियर्स’ नावाची ऐतिहासिक युद्धप्रसंगावर बेतलेली ही सीरिज २४ जूनला रात्री ९ वाजता पाहता येईल. भारतीय घोडेस्वार सैन्याचं अनोखं युद्धकौशल्य आणि युद्धाचं मैदान गाजवणारा त्यांचा पराक्रम याची ही सत्य घटना आहे. याला पहिल्या महायुद्धाची पाश्र्वभूमीसुद्धा आहे.

‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर नेहमीच अद्भुत असं काही तरी पाहायला मिळतं. दोन उंच इमारती आणि त्यांना जोडणाऱ्या साखळीवरून किंवा मजबूत दोरखंडावरून चालणारा नायक वगैरे असे प्रसंग आपण चित्रपटात पाहिले आहेत, पण ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर थेट न्यू यॉर्क शहरातील प्रसिद्ध टाइम स्क्वेअर येथे रंगणारा अशा पद्धतीचा थरार २४ जूनला ‘हायवायर लाइव्ह’ या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. तसेच ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर भारताच्या समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालणाऱ्या शूर सैन्याचा पराक्रम दाखवणारी ‘गार्डियन ऑफ द कोस्ट’ नावाची एक सीरिज लवकरच पाहायला मिळणार आहे. ‘एफवायआय टीव्ही १८’ या वाहिनीवर ‘ट्रॅव्हल मॅन’ नावाची सीरिज रविवारी रात्री १० वाजता दाखवण्यात येणार आहे. रिचर्ड अयोड हा सूत्रसंचालक, अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्याबरोबर आपल्याला ४८ तासांत जगभरातील काही लोकप्रिय भटकंतीच्या जागांची सैर करता येणार आहे. तो जिथे फिरणार आहे, तिथल्याच ठिकाणच्या लोकप्रिय पाककृती तो चाखणार आहे. आपल्याला घरबसल्या फिरण्याचा सुंदर अनुभव तो देणार आहे.

मराठी मालिकांकडे या आठवडय़ात वळण्याचा विचार केलात तर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘जिवलगा’ ही मालिका आहेच पण त्याबरोबर ‘श्री गुरुदेव दत्त’ ही मालिका खूप चांगल्या प्रकारे सादर केली जातेय. मालिकेत अनसूया आणि अत्री ऋषींचा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्याआधी अत्री ऋषींनी किती छान पद्धतीने अनसूयेच्या पाच प्रश्नांची उत्तरं दिली, हे पाहायचं राहून गेल्यास तेही पाहून घ्या. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘जीव झाला येडापिसा’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’, ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’ आणि ‘श्री लक्ष्मी नारायण’ या मालिका छान रंगात आल्या आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेच्या प्रोमोजवर समाजमाध्यमातून टीकाही होतेय आणि कौतुकही होतंय. ‘तुला पाहते रे’ मालिकेसहित इतरही मालिकांमध्ये रंजक वळणं पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे दैनंदिन मालिका आणि कथाब’ कार्यक्रमांबरोबरच इतर वाहिन्यांवरील कार्यक्रमांचे प्रभावी पर्याय प्रेक्षकांसमोर आहेत. त्यामुळे ‘प्रेक्षकांच्या मनोरंजना, नाही तोटा’ असंच चित्र या आठवडय़ात दिसतंय.