News Flash

कात टाकतेय..

गेली अनेक वर्ष मालिका आणि त्यांचे विषय नायिकाप्रधानच राहिले आहेत.

भारतात मालिकांची सुरुवात ‘हम लोग’ या मालिकेपासून झाली. काळ होता १९८४ चा. तेव्हा  दूरदर्शन संचांची संख्या खूप कमी होती त्यात दूरदर्शन हीच एक वाहिनी. पण त्या काळातच बदल दिसायला सुरुवात झाली होती आणि मग जागतिकीकरणानंतर त्यात असंख्य वाहिन्यांची भर पडली. सोबतच कार्यक्रमांची जोड हवी म्हणून मग मालिकांची संख्यासुद्धा वाढली आणि हा प्रवास आजतागायत सुरू आहे. मालिकांच्या आणि त्यांच्या व्यक्तिरेखांच्या प्रेमात पडणारी खूपशी मंडळी आपण आपल्या आजूबाजूला पाहात असतो. मग ती ‘दामिनी’ असो किंवा आता सुरू असलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधली ‘राधिका.’ गेली अनेक वर्ष मालिका आणि त्यांचे विषय नायिकाप्रधानच राहिले आहेत. वाहिन्या वाढल्या तशी स्पर्धा वाढली, मालिकांची संख्याही वाढली. मात्र कथेचा केंद्रबिंदू ‘ती’च होती आणि आजही आहे. सध्या काही वाहिन्या जाणीवपूर्वक फक्त नायिकाप्रधान करता वेगवेगळे विषय हाताळण्याचा किंवा पुरुषप्रधान व्यक्तिरेखा असलेल्या मालिका निर्मितीचे प्रयोग करू पाहात आहेत. मात्र हा बदल अजूनही सोपा नाही हेच दिसून येते.

आठवडय़ातून एकदा येणाऱ्या मालिकांची आणि त्यातील व्यक्तिरेखांची ओढ आपल्याला रोज लागली आणि म्हणून सर्व वाहिन्यांनी आपल्याला आठवडय़ातून किमान ५ दिवस मालिका दाखवायला सुरुवात केली. त्या मालिकांचा प्रामुख्याने प्रेक्षकवर्ग हा महिला! संध्याकाळी रिमोट त्यांच्या हाती आणि मग सुरुवात झाली ती महिलांना काय आवडतंपासून ते त्यांना आपण काय काय देऊ  शकतो इथपर्यंत वाहिन्यांनी संशोधन करायला सुरुवात केली.

वाहिन्यांना आज महिलांच्या आवडीनिवडी त्यांच्या नवऱ्यापेक्षाही जास्ती चांगल्या माहिती आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही! त्यांनी त्यांची वाहिनी आणि त्यावरच्या मालिका विकण्यासाठी आजवर जे काही संशोधन केले त्याचे सगळे निष्कर्ष हे महिला विश्वाभोवतीच फिरणारे होते. त्यामुळे साहजिकच मग वाहिन्यांना टीआरपीच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गाची आवड-नावड कळली आणि मग त्यातूनच महिलाप्रधान मालिका दाखवण्यास सुरुवात झाली. यातपण वेळेचा खेळ आलाच, त्यातूनच महिलावर्गाला कधी वेळ असतो आणि त्या कोणत्या मालिका, कधी पाहू शकतात इथपर्यंत संशोधन झालं. वेळ दुपारची असो किंवा संध्याकाळची मालिकांचा भडिमार सुरू झाला आणि टीआरपीनुसार असंख्य महिलाप्रधान मालिका आल्या आणि टीआरपीच्या शिखरावर पोहचल्या. मग त्यातील ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाचि हा संसार’, ‘कानामागून आली आणि तिखट झाली’, ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘पुढचं पाऊ ल’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘कुलस्वामिनी’ अगदी ‘जय मल्हार’सारखी पौराणिक मालिकाही खंडोबाची कथा सांगण्याच्या निमित्ताने का होईना म्हाळसा आणि बाणाई यांच्याभोवतीच फिरत राहिली. याचाच अर्थ जॉनर, विषय काहीही असो मालिका अखेर त्यातील स्त्री पात्रांभोवतीच घुटमळते किंवा त्यांच्याचभोवती कथा गुंफली जाते.

यामागची कारणं नेमकी काय असावीत? मालिका रोज दाखवायला सुरुवात झाली आणि सोबतच त्याची चर्चा कार्यालयांमध्ये, किटीपार्टी, भजनी मंडळात व्हायला लागली. मग यात सर्वच वयातील महिला आल्या. ती कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारी मुलगी असो किंवा वयाची सत्तरी गाठलेल्या आजी. मालिकांवर समस्त महिलावर्गाला चर्चा करायला आवडतं. अमुक मालिकेत आज काय झालं, तमुक मालिका आजकाल खूपच बोअर करते आहे! ती ना खूपच वाईट वागते आहे, तिला ना बदडूनच काढायला हवं असे काही मुद्दे महिलांच्या चर्चेत ऐकू यायला लागले, आजही या मुद्दय़ांमध्ये फारसा बदल झालेला नाही. ‘आपण मालिकांमधली नायिका रोज पाहतो ती कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करताना आपल्याला दिसते, तिच्या दुखांशी प्रेक्षक आपला संबंध जोडत असतो. प्रामुख्याने तो त्या व्यक्तिरेखांमध्ये स्वत:ला शोधत असतो. ज्यात त्याला जाणवतं की आपली दु:खं तर या नायिकेपेक्षाही कमी आहेत आणि मग त्या स्वत:ला दिलासा देत असतात. त्या नायिकेबरोबर आपली तुलना करत असतात’, असे निरीक्षण ‘ जय मल्हार’ मालिकेचे कार्यकारी अधिकारी राहिलेले दिनेश कोयंडे यांनी नोंदवले.

रेल्वेच्या डब्यात किंवा शेजारपाजारणींच्या चर्चेतून आणि संशोधनामधून वाहिन्या आपल्या मालिकांचे विषय ठरवतात. त्यामुळे मालिकेचा केंद्रबिंदू नायिकाच असेल मग ती कशी असेल हेही याच संशोधनावरून ठरवलं जातं, अशी माहिती टीव्हीविश्वातील सूत्रांनी दिली. या वाहिन्यांच्या मालिका पाहिल्या तर लक्षात येतं एकीकडे ‘झी मराठी’वरील मालिकांमधील नायिका आपल्याला नोकरी करणारी, थोडीशी आजच्या बदलत्या काळातील तरुणींचं प्रतिनिधित्व करणारी दिसते. तर तेच ‘कलर्स मराठी’वरील नायिका आपल्याला शिकली-सवरलेली तरीही सालस, सगळे घर सांभाळून घेणारी, सगळी नाती सांभाळणारी एकत्र कुटुंबातील तथाकथित आदर्श सून अशा रूपात दिसते. वेगवेगळ्या वाहिन्या आणि त्यांच्या मालिकांमध्ये जाणवणारा हा फरक हाही या संशोधनातून सापडलेल्या निष्कर्षांच्या आधारेच घेतलेल्या निर्णयाचा परिपाक असतो, असं म्हणायला हरकत नाही. हिंदीत तर अजूनही मालिका सास-बहू ड्रामा किंवा प्रेमत्रिकोण कथा हाताळतानाच दिसतो. मराठीतही हे लोण आहे आणि इथेही पुन्हा एकदा नायिकाच महत्त्वाची असते मग ती शीतल असो, पाठक बाई असोत किंवा प्रेमला दीपिकाच्या कचाटय़ातून वाचवू पाहणारा राधा नाहीतर मैत्रीच्या नात्यातून तरी का होईना अक्षयबरोबर संसार टिकवू पाहणारी अमृता असो.. ‘ती’च्या कथेला महत्त्व असल्याशिवाय टीआरपी गवसत नाही हेही वास्तव आहे. मुख्यत: मालिकांमध्ये आपल्याला त्रिकोण दिसतो. मग ती मालिका रोमॅंटिक असो पौराणिक किंवा ऐतिहासिक असो. रोमॅंटिकमध्ये प्रेमाचा त्रिकोण दिसतो ज्याचं उदाहरण म्हणून ‘कळत नकळत’, ‘अवघाचि हा संसार’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘घाडगे & सून’ आपल्याला दिसतात. ज्यात एका नायिकेच्या बाजूला दोन व्यक्तिरेखा प्रामुख्याने फिरत असतात. तेच पौराणिक  मालिकांमध्ये ‘जय मल्हार’मध्येही हाच त्रिकोण पाहायला मिळतो. ऐतिहासिक मालिकांमध्ये ‘राजा शिवछत्रपती’, ‘संभाजी’ यातही नायिका आहेतच. मात्र त्या मालिकाच मुळात प्रसिद्ध अशा व्यक्तीपुरुषावर असल्याने तिथे तुलनेने नायिकोसूत्र घुसवण्याचा त्रास नसतो. त्यांची टीआरपीची गणितं वेगळी असल्याने तिथे हा धोका कमी असतो. अर्थात, हा नायिकाप्रधान मालिकांचा आग्रह मोडून काढण्याचा प्रयत्नही गेले काही दिवसांपासून वाहिन्यांकडून जाणीवपूर्वक केला जातो आहे. मग ती ‘झी युवा’वरची ‘बाप माणूस’ असेल किंवा ‘देवाशप्पथ.’ ‘ विठू माऊ ली’ ही स्टार प्रवाहवरची मालिका, ‘झी मराठी’वरची ‘संभाजी’ हे असे पुरुषप्रधान मालिकांचे प्रयोग होताना आपल्याला दिसत आहेत. त्याच त्या कथानाटय़ाला वाहिन्याही कंटाळल्या आहेत. त्यामुळे साधारणपणे जनमानसाचा कौल लक्षात घेत हळूहळू प्रयोग करणे सुरू आहे. ‘बाप माणूस’चे निर्माते संजय झणकर म्हणतात, ‘आम्ही जेव्हा ‘झी युवा’ वाहिनीकडे या मालिकेचा प्रस्ताव दिला तेव्हा त्यांनी हिंमत केली आणि काहीतरी नवीन प्रयोग करू या म्हणून काही अटींसोबत हा शो मान्य केला. मात्र यात महिला व्यक्तिरेखासुद्धा असतीलच असंसुद्धा नमूद करण्यात आलं होतं.’

घराघरांतून स्त्रियांबरोबरच मालिका पाहणाऱ्या पुरुषांची संख्यासुद्धा वाढते आहे. त्यामुळे वाहिन्या मालिकांमध्ये पुरुषप्रधान व्यक्तिरेखा आणून प्रयोग करू पाहात आहेत. ‘बाप माणूस’मध्ये महिला व्यक्तिरेखा जरी असल्या तरी महत्त्व हे दादासाहेब आणि सूर्या या पात्रांना दिलं आहे ज्यात रवींद्र मंकणी आणि सुयश टिळक हे भूमिका करत आहेत. तेच ‘देवा शप्पथ’मध्ये संकर्षण कऱ्हाडे आणि क्षितीश दाते हे अनुक्रमे श्लोक आणि क्रिश या प्रमुख भूमिका करताना दिसत आहेत. पुरुषप्रधान मालिका करताना त्यात भाषेचासुद्धा प्रयोग दिसतो आहे ज्यात ग्रामीण आणि शहरी भाषेचा, कथेचा वापर जाणीवपूर्वक केला जातो आहे. भाषेचे प्रयोग आपण ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि ‘लागीर झालं जी’ या मालिकांमध्ये पाहिलेच, ज्यात प्रामुख्याने ग्रामीण प्रेक्षकांवर लक्ष केंद्रित केलं आहे. ग्रामीण आणि शहरी भाषेचा उत्तम तोल या मालिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि मुख्य म्हणजे महिला प्रेक्षकांसमोर असे प्रयोग करणं ज्यात पुरुषप्रधान व्यक्तिरेखांचे चित्रण आहे हे धाडसाचं असतं. कारण मालिकांच्या केंद्रस्थानी पुरुष व्यक्तिरेखाच असतील तर त्या मालिकांच्या प्रसिद्धीसाठी जास्त प्रयत्न करावे लागतात. प्रसिद्धीची तंत्रंही वेगळी असतात. त्यामुळे अशा प्रकारे ‘ती’ची चौकट मोडून जॉनर आणि कथेप्रमाणे मालिकांमध्ये बदल आणणे हे सहजसोपे नाही. पण अशक्यही नाही. प्रेक्षक बदलतोय त्यामुळे वाहिन्याही आता या चौकटी मोडून विषय-मांडणीच्या दृष्टीने अधिक प्रयोगशील, सर्जनशील होण्यावर भर देतायेत. त्यामुळे येत्या काळात प्रेक्षकांच्या पदरात दर्जेदार मनोरंजन पडेल, अशी आशा करायला हरकत नाही!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 2:23 am

Web Title: marathi serial actress based marathi serial marathi daily soap
Next Stories
1 दोन सुपरस्टार आणि रोजचे सात तास
2 रंगभूमी आक्रसतेय!
3 ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांना ‘जीवनगौरव’
Just Now!
X