01 March 2021

News Flash

अशी असावी ‘सासू’

मालिकांमधील प्रतिमांचा प्रभाव थेट घरातल्या नात्यांवरही पडताना दिसतो.

|| नीलेश अडसूळ

‘सासू’ या नात्याचे भीतीदायक चित्र मनात बसेल असे अनेक चित्रपट नव्वदीच्या दशकात एकापाठोपाठ एक आले. यात अपवाद म्हणून सासू कशी असावी याचा आदर्श ठेवणारा ‘अशी असावी सासू’ हा चित्रपट १९९६ ला प्रदर्शित झाला. या चित्रपटात सासूची प्रतिमा सकारात्मक झाली, पण सूनबाई मात्र वरचढ दाखवण्यात आल्या. त्यामुळे नकारात्मक छटा ही मागे उरलीच. अशा सासूसुनांच्या नकारात्मक छटा मालिकांमध्ये वारंवार उमटत आल्या आहेत. त्यातही सासूच्या जरा अधिकच. जणू सासू म्हणजे सुनेचा छळ करण्यासाठीच निर्माण केलेले समीकरण असावे. काही मालिका याला नक्कीच अपवाद आहेत, पण सध्या सुरू असलेल्या बऱ्याच मालिकांमध्ये सासूची भूमिका सकारात्मक होताना दिसते आहे. काळानुरूप बदलणारी नाती याला कारणीभूत आहेतच, पण ती मालिकांमधून सशक्तपणे मांडली जात आहेत हे विशेष.

मालिकांमधील प्रतिमांचा प्रभाव थेट घरातल्या नात्यांवरही पडताना दिसतो. सुनेला प्रेरणा देणारी, प्रोत्साहन देणारी सासू घराघरांत आवडीने पाहिली जाते. लोकांना केवळ कुरघोडी, भांडण, डावपेचच आवडतात असे काही नाही. सध्या प्रत्येक वाहिनीवर किमान एकतरी मालिका अशी आहेच, ज्यात सासूची व्यक्तिरेखा सकारात्मकतेने रंगवण्यात आली आहे. यामध्ये ‘कलर्स मराठी’ वाहिनीने वरचष्मा राखला आहे. ‘शुभमंगल ऑनलाईन’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ आणि काही अंशी ‘राजा रानीची गं जोडी’ अशा तीन मालिकांमध्ये आदर्श सासूचे दर्शन घडते आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत सासूची भूमिका अभिनेत्री अतिषा नाईक साकारत आहेत. अतिषा नाईक म्हणजे खलनायिका अशी ओळख मागील काही मालिकांनी करून दिली आहे. पण या मालिकेत मात्र अतिषा नाईक यांनी साकारलेली गोड सासूची भूमिका प्रत्येक सुनेच्या मनाला स्पर्शून जाते. या मालिकेत नायक आणि नायिकेच्या नात्यात लग्न होऊनही पतीपत्नीचे नाते प्रस्थापित झालेले नाही, परंतु केवळ अशी प्रेमळ सासू असल्याने सून त्या घरात टिकून आहे.

नात्यांची वेगळी ओळख करून देणारी मालिका म्हणजे याच वाहिनीवरील ‘शुभमंगल ऑनलाइन’. या मालिकेने चालू काळाशी जोडणारी काही नवी नाती समोर आणली. शर्वरी – शंतनूचे फिस्कटलेले नाते, त्यात डोकावणारा भूतकाळ या सगळ्या धबडग्यात एक संयत भूमिका मांडणारी, सर्वांना जोडू पाहणारी, प्रत्येकाप्रती आत्मीयता बाळगणारी एक व्यक्ती दिसते ती म्हणजे अनुपमा अर्थात शंतनूची आई ‘पमा’. या पात्राकडे सासू म्हणून बघताना कायमच आईचा भास होतो. त्यातही सुकन्या मोने ही भूमिका साकारत असल्याने सासुतील ‘आई’पणाला अधिक दुजोरा मिळतो. याच वाहिनीवर लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे ‘राजा रानीची गं जोडी’. या मालिकेत शुभांगी गोखले यांनी साकारलेली सासू म्हणजे कुसुमावती ढाले पाटील. मानमरातब, घराण्याची प्रतिष्ठा, नियम, मर्यादा यांच्या सीमांनी ती वेढलेली असली तरी अंतर्मनात असलेले प्रेम तिला लपवता येत नाही. वेगवेगळ्या प्रसंगानुरूप ते समोर आलेलेच आहे. कधीतरी तिच्या तटस्थ भूमिकेचा तिलाही त्रास होतो. शेवटी जबाबदारीने वागताना काही गोष्टींचे भान तिला बाळगावे लागणारच. यात शुभांगी गोखले यांचे विशेष कौतुक वाटते. एकाच वेळी दोन वाहिन्यांवर दोन वेगवेगळ्या सासूच्या पवित्र्यात त्या आहेत. म्हणजे एकीकडे घरंदाज बाईची भूमिका तर दुसरीकडे गर्भश्रीमंतीच्या गलक्यात अडकलेली साधीभोळी बाई.  एकीकडे नात्यांना असंख्य परिसीमा आहेत तर दुसरीकडे परिसीमा मोडून नाती जोडण्याची ओढ. ‘कलर्स मराठी ’ वाहिनीप्रमाणेच ‘झी मराठी’ वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतही त्या सासू म्हणून उभ्या ठाकल्या आहेत. अजून त्यांच्या मुलाचे लग्न होऊन सासूपर्यंतचा प्रवास होणे बाकी आहे. पण सासू झाल्यानंतरही पात्राची प्रेमळता काही कमी होणार नाही. ‘मिसेस खानविलकर’ म्हणून मिरवणाऱ्या या बाईला कित्येक वर्ष ‘शकू’ अशी हाक ऐकण्याची आस होती. जी तिच्या एका गरीब मैत्रिणीकडून पूर्ण झाली. पुढे याच मैत्रिणीची मुलगी तिच्या घरी सून म्हणून येणार आहे. त्यामुळे अल्लड सून आणि तिला सावरणारी साधीभोळी सासू यांचे नाते पाहायला गम्मत येणार आहे.

‘झी मराठी’ वरील ‘अगं बाई सासूबाई’ या मालिकेची तर कथाच निराळी. म्हणजे ही सासू प्रेमळ तर आहेच पण सोशिक अधिक आहे. वयाच्या मध्यावर सुनेच्या आग्रहामुळे घेतलेला दुसऱ्या लग्नाचा निर्णय काळाच्या पुढचा वाटतो. दुसऱ्या लग्नानंतरही तिने मुलाला किंवा सुनेला अंतर दिलेले नाही. उलट त्यांचा संसार कसा फुलेल याकडेच तिचे अधिक लक्ष आहे. या मालिकेत सासूच्या भूमिकेत ‘सोहम’ वाटतो. आपल्या आईची म्हणजे असावरीची छळवणूक करण्यात त्याला भलतीच धन्यता मिळते. हा आता त्याच्यातही बदल घडतो आहे, पण हा तात्पुरता बदल आहे की क्रांती हे पुढेच कळेल. निवेदिता सराफ यांनी मात्र सासूचा आदर्श घालून दिलेला आहे.

सासूची भूमिका पार पाडताना ऐश्वार्या नारकर यांच्याशी अभिनयाची किमया आपल्याला पाहायला मिळते. ‘कलर्स मराठी’ वरील ‘स्वामिनी’ मालिकेतील गोपिकाबाई आणि ‘सोनी मराठी’वरील ‘श्रीमंता घरची सून’ या मालिकेतील ‘अरुणा’ म्हणजे परस्पर टोकाच्या भूमिका. गोपिकाबाईंचा करारीबाणा काही वेगळ्याने सांगायला नको, पण ‘अरुणा’ मात्र श्रीमंती असूनही ‘उतू नको मातु नको, घेतला वसा टाकू नको’ अशा स्वभावाची आहे. कर्णिक कुटुंबात सगळेच एकापेक्षा एक, श्रीमंती मिरवणारे आहेत. पण अरुणा याला अपवाद ठरते. घरातील एकूण वातावरण पाहता आपल्याला श्रीमंता घरची सून नको असा तिचा विचार आहे खरा, पण अनन्याच्या रूपाने तिला श्रीमंतच नव्हे तर अतिश्रीमंत सून मिळणार आहे. अर्थात तिची सूनही श्रीमंतीला अपवाद असणारीच आहे हे एव्हाना उघड झाले आहे. त्यामुळे पुढे सासू-सुनेचे हे नाते आई-मुलीत बदलणार यात शंका नाही.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील नंदिनी यशवंत शिर्के पाटील ही सासूची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर बजावत आहेत. तीन मुले, तीन सुना, एक लेक, जावई अशा भरल्या घरात राहणारी नंदिनी समस्त शिर्केपाटील घराचे प्रतिनिधित्व करते. हा गावाकडचा परिवार असला तरी विचारांनी पुढारलेली अशी ही सासू आहे. सुनांना पुरेसे स्वातंत्र्य देणारी, त्यांचे लाड करणारी अशी ही सासू आहे. वेळप्रसंगी ती कठोरही होते पण तो तिचा मूळचा स्वभाव नाही. वर्षा उसगावकर यांच्या आजवरच्या भूमिका पाहता ही भूमिका वेगळ्या धाटणीची आणि कायम लक्षात राहणारी आहे. याच वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत सासूची भूमिका थोरली जाऊ पार पाडताना दिसते. जेव्हा घरातील मोठ्यांवर जबाबदारी असते तेव्हा अनाहूतपणे अधिकार गाजवणे, वर्चस्व मिरवणे असे प्रकार होतात, पण या मालिकेतील नंदिता पाटकर साकारत असलेली ‘सरिता’ ही खऱ्या अर्थाने कुटुंबाला ‘सहकुटुंब’ करणारी आहे. दोन धाकट्या जाऊ, तीन दीर, अपंगत्व आलेली सासू असा घरगाडा हाकताना ती कुठेही मी-तूपणाच्या छायेत येत नाही.

बदलत्या नात्यांची ही बदलती समीकरणे सासू-सुनांच्या नात्यापर्यंत आल्याने आता मालिका जगतात पुढेही येणारी नाती नव्या काळाचा वेध घेणारी असतील. अर्थात त्यांना सकारात्मकच छटा असली पाहिजे असा काही अट्टहास नाही. पण सकारात्मक बदल समाजात घडत असतील तर ते मालिकांमधून प्रतिबिंबित झालेले पाहायला नक्कीच उजवे वाटतील.

मालिका उभी करतानाच सासूला नकारात्मक छटा द्यायची नाही, हे आम्ही ठरवले होते. कारण मालिकेची प्राथमिक तयारी सुरू केली तेव्हा मराठी मालिकांमध्ये सकारात्मक सासूचा अभाव होता. या निमिताने एक वेगळी सासू लोकांना पाहायला मिळेल म्हणून हा वेगळेपणा आणला. ही प्रोत्साहन देणारी सासू उभी करण्यात ‘कलर्स मराठी’ वाहिनी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांचे विशेष प्रयत्न आहेत. सासूच्या पात्राविषयी विचार करताना, आमच्या प्रत्येकीच्या सासूबाई आम्हाला पाठिंबा देणाऱ्या आहेत. त्यामुळे तेच चित्र मालिकेतून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय आम्ही घेतला. याचा सकारात्मक परिणाम प्रेक्षकांपर्यंतही पोहोचेल.   – मनवा नाईक. निर्माती, सुंदरा मनामध्ये भरली

सासूसुनेला जाच करणार असा एक साचा प्रेक्षकांच्या मनात बसला होता. पण आता ते दिवस राहिलेले नाहीत.  सासू सुनेची आई होण्यापेक्षा मैत्रीण जास्त होऊ पाहते आहे. कारण दोघींच्या वयातील अंतर मध्यात सांधणे गरजेचे असते. म्हणजे सूनसासूला मोबाइल कसा वापरायचा शिकवते तेव्हा सासूला आनंदच होत असतो. त्यामुळेच कदाचित सासू आपले फोटो काढून मैत्रिणींना पाठवू शकते. या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अगदी बारीकसारीक गोष्टी आहेत. सासूसुना एकत्र राहिल्या तर नवऱ्याचे आयुष्य सुखकर होते. दिग्दर्शक हा प्रेक्षकाच्या नजरेतून पहात असतो. त्यामुळे हे बदल टिपले जातात. काही लोक अशा सकारात्मक बदलावर आक्षेपही घेतात, पण हळूहळू तेही बदलतात. हाच मालिकेचा चांगला परिणाम आहे.  – अजय मयेकर. येऊ कशी तशी मी नांदायला

पूर्वी सासूसुनांची भांडणे चवीने पाहणारा प्रेक्षकवर्ग होता. तशी नात्यांमध्ये तेढही होती. पण आता प्रत्येक घरातली विचारधारा बदलते आहे. सून घराबाहेर पडून काम करत असल्याने ती सासूला सहकार्य करते तर सासूही सुनेला मुलीसारखी वागवते. सासूच नाही तर सासरेही सुनेला प्रोत्साहन देतात. सासू-सून या नात्यातील सामंजस्य वाढते आहे. दोघी एकमेकींना समजून घेऊन पुढे जात आहेत. आज बहुतांशी घरात हेच चित्र आहे. मग तेच मालिकांमधून आले तर लोकांनाही पाहायला आवडेल. जे या विचारधारेचे नसतील ते बदलतील. तीस वर्षांचा संसार सांभाळलेल्या सासूकडून जसे सून चार गोष्टी शिकत असते तसे सुनेकडून चार गोष्टी शिकणाऱ्या आजच्या सासवा आहेत. त्यामुळे कुटुंब संतुलित करणारे हे नवे नाते अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे. – रोहिणी निनावे. लेखिका, श्रीमंताघरची सून

मालिका, सिनेमा किंवा नाटक हे असे माध्यम आहे ज्याचा लोकांच्या मनावर परिणाम होत असतो. आपण दाखवलेल्या सकारात्मक आशयातून लोक काहीतरी शिकू पाहत असतील तर ती महत्त्वाची बाब आहे. अशी नाती अधिक सकारात्मकतेने दाखवली तर लोकांना ते नक्कीच आवडेल. ज्याप्रमाणे महिला सक्षमीकरण होणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे आज नात्याचे सक्षमीकारण व्हायला हवे. काळानुसार नाती नवीन आकार घेत आहेत. सासूचे विचारही उंबरा ओलांडून पुढे आलेले आहेत. त्यामुळे सासू-सुना एकमेकींना पुरेसे स्वातंत्र्य देतात आणि आनंदही. आपण नात्यांना कशा पद्धतीने वागवतो हे लोक पाहत असतात आणि त्याचे अनुकरण करतात. त्यामुळे सकारात्मक नाती दाखवणे आजची गरज आहे.   – नंदिता पाटकर, अभिनेत्री, सहकुटुंब सहपरिवार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 12:03 am

Web Title: marathi serial danger mother in law movie films in the nineties akp 94
Next Stories
1 साय-फायपट अजूनही दुर्लक्षितच!
2 ‘अभिनय कौशल्याला प्राधान्य’
3 जनसेन्सॉरशिप
Just Now!
X