चित्रचाहूल : नीलेश अडसूळ

मराठी प्रेक्षकांना कौटुंबिक आशयाची गोडी कायमच वाटत आली आहे. त्यामुळे सर्व मालिकांचे सत्र कौटुंबिक आशयावर गुंफले असले तरी, प्रेक्षक त्यातही वेगळेपण शोधत असतात. मग ते वेगळेपण नात्यातले असो, भाषेतले, परिस्थितीतले वा प्रांतातले प्रेक्षक त्यांना पसंती देतातच. अशाच अनेक नव्या मालिका या महिन्याभरात प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. एकीकडे गणेशोत्सवाची धूम असताना या नव्या मालिकांचा धडाकाही प्रेक्षकांना या आठवडय़ात अनुभवता येणार आहे. यातल्या काही मालिकांनी अगदी कमी वेळात प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.

‘कलर्स मराठी’ वरील ‘जीव झाला येडपिसा’ या मालिकेने प्रेक्षकांना भलतीच भुरळ घातली आहे. सांगलीतील भाषिक लहेजा, पात्रांच्या निरनिराळ्या छटा आणि अपघातातून गैरसमजाच्या भोवऱ्यातअडकलेली नायक-नायिकेची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या पौराणिक मालिकांना मिळणारा प्रतिसाद जास्त असल्याने प्रत्येक वाहिनी पौराणिक किंवा ऐतिहासिक मालिकेच्या निर्मितीकडे वळली आहे. ‘लक्ष्मी-नारायण’ या मालिकेतही लक्ष्मी आणि नारायण यांच्या सहजीवनातील प्रसंग उलगडण्यात आले आहेत. भव्यदिव्य सेट, त्या त्या काळाला शोभणारा पोशाख, दागिने आणि काळाशी जोडून घेण्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टींचे कलाकारांसह प्रेक्षकांनाही कुतूहल असते. अनेकदा प्रेक्षक मालिकेशी स्वत:ला जोडू पाहतात आणि यातूनच मालिकांमध्ये असलेल्या पेहरावाचे, दागिन्यांचे सामान्य माणसांमध्ये ट्रेण्ड सुरू होतात. ‘लक्ष्मी नारायण’ मालिका व्हीएफएक्ससारख्या तांत्रिक बाबींनी सक्षम असली तरी अजूनही प्रेक्षकांचा उजवा कौल मालिकेला मिळालेला नाही.

‘झी मराठी’वर ‘लागीर झालं जी’ या लोकप्रिय मालिकेची जागा सध्या ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेने नुसतीच घेतलेली नाही, तर ती त्याच पद्धतीने उचलूनही घेतली आहे. ग्रामीण जीवनाचाच धागा पकडून सुरू झालेली ही मालिका हलकेफुलके विनोद, लपवाछपवी, काहीसा मिश्कीलपणा यामुळे आपला वेगळेपण सिद्ध करते आहे. ‘लागीर झालं जी’ मालिकेप्रमाणे याही मालिकेतील सर्व चेहरे नवीन असले तरी ‘तो’ प्रतिसाद अद्याप मालिकेला मिळालेला नाही. पण लवकरच तो प्रतिसाद मिळेल, यात शंका नाही. मालिका मोठय़ा प्रमाणात पाहिली जात असली तरी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेल्या शीतल, अज्या आणि समस्त चांदवडी गावासारखी लोकप्रियता मिळायला मालिकेला थोडी वाट पहावी लागेल. गिरीश ओक, निवेदिता सराफ, रवी पटवर्धन, तेजश्री प्रधान अशी दर्जेदार कलाकारांची सरमिसळ असलेली ‘अगंबाई सासूबाई’ या मालिकेने प्रोमोपासूनच प्रेक्षकांना वेड लावले होते. सासूचे लग्न म्हणजे नक्की काय?, याबाबत प्रेक्षकांनी अनेक तर्कवितर्क केले होते. परंतु त्या सर्व विचारांना बाजूला सारत मालिकेत पतीच्या निधनामुळे खूप साधे, तुलनेने एकाकी अशा साध्याभोळ्या स्त्रीच्या आयुष्याला मिळालेले सकारात्मक वळण आणि त्यात तिला मिळालेली तिच्या सुनेची साथ असा नवा आशय दिला आहे. बदलत्या काळानुसार आलेला हा आशय प्रेक्षकांना नवीन असल्याने त्यांचे संपूर्ण लक्ष या मालिकेने वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे निवेदिता यांनी साकारलेली साध्यासरळ स्वभावाची आसावरी आणि त्यावर गिरीश ओक यांच्या खोडकर आणि मिश्कील अभिनयाची फोडणी पुढे चांगलीच रंगत जाणार याची ग्वाही प्रेक्षकांनीही द्यायला सुरुवात केली आहे.

प्रेक्षकांच्या प्रतिसादापासून काहीशा नजरेआड झालेल्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील दोन मालिकांनी पुन्हा एकदा वाहिन्यांच्या जगतातली आपली पकड मजबूत केली आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकांच्या निमित्ताने सामान्य प्रेक्षकांसह अभ्यासक आणि भक्तमंडळींची वाट एकाच वेळी मालिकांकडे वळवण्यात वाहिनीला यश आले आहे. आजवर बाबासाहेबांवर अनेक चित्रपट आले. परंतु त्यात काही महत्त्वाचा घटनाक्रम दाखवण्यात आला होता. बाबासाहेबांनी देशासाठी दिलेले योगदान अनन्य साधारण आहे. आणि अशा महामानवाची गौरवगाथा, त्यांचा संघर्ष लोकांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने सुरू झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही मालिका घराघरांत बाबासाहेबांचा संघर्ष आणि कार्य पोहचविण्यात यशस्वी होत आहे. याच दरम्यान आलेली श्रीगुरुदेव दत्त ही मालिका मालिकांच्या जगतात काहीशी वेगळी ठरली आहे. कारण अनेक पौराणिक कथा हिंदी मराठी माध्यमातून, चित्रपटांतून साकारल्या गेल्या होत्या. परंतु महाराष्ट्राच्या बहुतांशी लोकांचे मनात दत्त संप्रदायाचे स्थान अढळ आहे. अनेकांचे आराध्य असलेल्या दत्तगुरूंचे या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पडद्यावर पहायला मिळाले असल्याने प्रेक्षकही भक्तिमय होऊन मालिका पाहत आहेत.

‘सोनी मराठी’वर आलेली आगळ्यावेगळ्या प्रेमकथेची ‘मी तुझीच रे’ ही मालिका हळूहळू पुढे सरकते आहे. मालिकेतील नायकाचा चेहरा संग्राम साळवी या अभिनेत्याने साकारला आहे. या आधी ‘देवयानी’ मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेला संग्राम पुन्हा एकदा प्रेमकथेतून लोकांसमोर आला आहे. शासकीय अधिकारी असलेल्या जयदत्तची उद्धट आणि काहीशी अल्लड स्वभावाच्या रियासोबत याची गाठ पडते. आणि वादावादीतून सुरू झालेला प्रवास पुढे लग्नापर्यंत पोहोचलेला पाहण्यासाठी सारेच प्रेक्षक उत्सुक आहेत.

अमोल कोल्हेंची निर्मिती असलेली ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेने नुकताच आपला प्रवास सुरू केला आहे. परंतु स्वराज्य आणणारे शिवाजी महाराज, आणि त्याचे रक्षण करणारे संभाजी महराज यांना घडवणारी ती स्वराज्यजननी कशी घडली हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. विशेष म्हणजे या मालिकेला जिजाऊंच्या बालपणापासून सुरुवात झाल्याने आदर्श मानल्या जाणाऱ्या त्या मातेची गाथा पाहण्याकडे महिला वर्गाचाही विशेष कल आहे. या मालिकेतील जिजाऊच नाही तर शहाजी राजे, शिवाजी महाराज, शंभूराजे या व्यक्तिरेखा कोण साकारणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे.

नुकत्याच सुरू झालेल्या या मालिका काही भागांचा टप्पा पूर्ण करत सुसाट वेगात पुढे निघाल्या आहेत. प्रेक्षकांचा प्रतिसाद हा कमी-जास्त होतच असतो. परंतु पुढे जात असताना या मालिकांचा प्रवास कोणकोणती नवी वळणं घेणार याकडे आता प्रेक्षकांचे डोळे लागले आहेत.