|| नीलेश अडसूळ

एकाच वेळी नाटक, मालिका, सिनेमा अशा विविध क्षेत्रांत स्वत:चा ठसा उमटवणे प्रत्येकाला शक्य होतेच असे नाही. तिन्ही क्षेत्रांचा बाज वेगळा, पद्धत वेगळी तरीही या तीनही क्षेत्रांतून पदार्पण करत रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचलेला नट, लेखक, दिग्दर्शक म्हणजे चिन्मय मांडलेकर. सध्या चतुरस्र कलाकार म्हणून आवर्जून ज्याचे नाव घेतले जाते त्या चिन्मयने लिहिलेली मालिका वाहिनीवर दाखवली जाते. एकीकडे तो वेबसीरिजसाठी लेखन करतो आहे. दुसरीकडे त्याने दिग्दर्शित केलेले नाटक रंगभूमीवर प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेते आहे. तर तिसरीकडे तो स्वत: आगामी ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातून पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहे. कोणतेही क्षेत्र काळानुसार आयाम घेत बदलत असते, तो बदल आपण स्वीकारायला हवा, असं मानणाऱ्या चिन्मयची ही चौफे र वाटचाल नेमकी कशी सुरू आहे, याचा त्याच्याशी बोलून वेध घेण्याचा हा प्रयत्न..

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Child beaten teacher pune, pune,
पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Controversy on Ramayana
सीतेच्या हातून रावणाला गोमांस, हनुमानाचं विकृत चित्रण, विद्यापीठातील नाटकाचा वाद आहे काय?

नाटकाची आवड असणाऱ्या चिन्मयने नाटय़वेडय़ांसाठी कलागुणांचा स्वर्ग मानल्या जाणाऱ्या ‘नॅशनल स्कू ल ऑफ ड्रामा’मधून नाटकाचे शिक्षण पूर्ण करत आपले स्वप्न साकारले. ‘एनएसडी’मधून बाहेर पडताच त्याच्या पुढे मालिका क्षेत्रातील संधी उभ्या ठाकल्या होत्या. त्या आठवणींविषयी चिन्मय सांगतो, महाविद्यालयात शिक्षण घेत असताना नाटकाचा प्रवास सुरू होता. त्यात निर्मल पांडेकडून मला एनएसडीची माहिती मिळाली. अभिनय क्षेत्रात काहीतरी करता यावं आणि विशेष म्हणजे भारतात अशी संस्था आहे ज्यामध्ये देशभरातील नाटकांचा वेध घेतला जातो अशा ठिकाणी जाऊन शिकण्याची इच्छा झाली. आणि एनएसडीच्या पहिल्याच फेरीत माझी निवड झाली. तिथल्या शिक्षणाचा आणि संस्थेचा माझ्यावर खूप परिणाम झाला. विशेष म्हणजे संपूर्ण भारतातील विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी आल्याने शिक्षकांसोबत तिथे भेटलेल्या मित्रमैत्रिणींकडून खूप काही शिकता आले. विशेष म्हणजे भारतातील कोणत्या भागात कशा परिस्थितीत आणि कसे थिएटर केले जाते याची माहितीही मिळाली. शब्दाभिमुख मराठी रंगभूमी आणि उत्तरेकडे असलेली प्रकाश, नेपथ्य आणि रंगमंचीय सौंदर्याच्या दृष्टीने सक्षम असलेली त्यांची रंगभूमी यातील फरक जाणवला. आणि ज्या वेळी आपल्या कल्पनाशक्तीपलीकडे काहीतरी शिकायला मिळते तेव्हा ते भरभरून आत्मसात करावे, असं तो सांगतो.

एनएसडीनंतर मुंबईत परतल्यावर रंगभूमीवरचा त्याचा प्रवास आणि अनुभव याविषयी बोलताना तो म्हणतो, रंगभूमीपेक्षा मालिका क्षेत्रात त्या वेळी झालेले बदल झपाटय़ाने जाणवले. मी दिल्लीत जाताना ‘आभाळमाया’ नुकतीच सुरू झाली होती. आणि तीन वर्षांनी परतलो तेव्हा सर्व काही बऱ्यापैकी मालिकामय झाले होते. नोकरी आणि कलाक्षेत्र एकत्र सांभाळणाऱ्या कलाकारांना मालिकांच्या निमित्ताने पूर्णवेळ काम करता येत होते. आणि परतल्यावर पहिल्यांदा माझ्यापुढेही मालिकेच्या संधी खुल्या झाल्या आणि ‘वादळवाट’च्या निमित्ताने मी पुढे आलो. म्हणून कदाचित मालिकांविषयी वाटणारा जिव्हाळा अधिक आहे, असे तो सांगतो. पण प्रायोगिक रंगभूमीविषयीही आपल्या मनात तितकेच प्रेम असल्याचे चिन्मयने स्पष्ट के ले. सुरुवातीची पंधरा-सोळा वर्षे मी नाटक करत होतो. आजही करतो आहे. आताचा ठळकपणे जाणवणारा बदल म्हणजे प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीमधल्या सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत. आता फरक फक्त आर्थिक बाजूंचा उरला आहे, पण कोणतेही क्षेत्र काळानुसार आयाम घेत बदलत असते. आपण त्यानुसार स्वत:त बदल करायला हवेत, असे तो आवर्जून सांगतो.

‘आदिपश्य’ या नाटकातून चिन्मयने पहिल्यांदा दिग्दर्शनाची धुरा हातात घेतली. प्रायोगिक रंगभूमीवर आलेल्या ‘आदिपश्य’ने पुढे व्यावसायिक रंगभूमीवरही झेप घेतली. त्यानंतर खऱ्या अर्थाने दिग्दर्शक म्हणून प्रवास सुरू झाला, असं चिन्मय सांगतो. एनएसडीमध्ये असतानाच ‘आदिपश्य’ नाटकाचा विचार केला होता. पुढे ते नाटक रंगभूमीवर आले, त्याला पुरस्कार मिळाले. माझ्या बाबतीत या गोष्टी अगदी सहजरीत्या घडत गेल्या. मी कधी ठरवून लेखक किंवा दिग्दर्शक झालो नाही. मी माझे काम करत राहिलो आणि त्यातून मिळालेल्या आत्मविश्वासावर दिग्दर्शक म्हणून उभा राहिलो. मग त्यातूनच ‘आदिपश्य’, ‘बेचकी’, ‘समुद्र’, ‘अलबत्या-गलबत्या’ आणि आता ‘निम्मा शिम्मा राक्षस’ अशा वेगवेगळ्या धाटणीच्या संहिता हाताळल्या. प्रत्येक वेळी आपल्याला काय वेगळे देता येईल आणि त्यातून आपल्याला काय शिकता येईल याकडे माझा कल असतो. शिवाय लेखन करताना वेगवेगळ्या माध्यमांचे वेगवेगळे अनुभव येत गेले, असे त्याने सांगितले. त्याच्या मते मालिकांचे लेखन हे प्रेक्षक कल आणि वाहिन्यांकडून केली जाणारी मागणी याचा समतोल साधून केले जाते. पूर्वीच्या मालिकांमध्ये ज्याप्रमाणे लेखकांना स्वातंत्र्य असायचे तितके आता उरलेले नाही. टीआरपी आणि वाहिन्यांच्या इतर धोरणांमुळे लेखकांवर येणारी बंधने पाहता ही चिंतेची बाब वाटते, असं तो म्हणतो. गेली सोळा वर्षे मी मालिका लेखन करतो आहे. ‘जीव झाला येडापीसा’ या मालिकेचे लेखन करताना दिग्दर्शक आणि वाहिनीने मला माझे पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचा आनंद आहे. आणि मुक्त लेखनाचे सकारात्मक परिणाम मालिकेवर दिसून येतात, असे सांगतानाच पूर्वी लेखक मालिका लिहिताना आशयाला प्राधान्य देत होते आता वाहिन्यांनी आखून दिलेल्या चौकटीत राहून लेखन करावे लागते याबद्दल त्याने खंतही व्यक्त केली. पण हे चित्र लवकरच बदलेल अशी त्याला आशा आहे.

चित्रपटाच्या बाबतीत लेखकाला पूर्ण स्वातंत्र्य असते, परंतु मुळात तो दिग्दर्शकाच्या नजरेतून घडत असल्याने तिथे चर्चा करून कथेला आकार दिला जातो. त्यामुळे  चित्रपट लिहिण्याची गंमत काही और आहे. आणि जिथे लेखकाच्या लेखणीला प्रथम प्राधान्य असते ते म्हणजे नाटक होय. असे वेगवेगळ्या माध्यमांतील लेखनातला फरक त्याने समजावून सांगितला. शिवाय वेबसीरिज हा आता मालिका आणि चित्रपट यांच्यामधला दुवा सांधणारा नवीन पर्यायही उपलब्ध झाला आहे, असे तो म्हणतो. वेबसीरिजविषयी चिन्मय सांगतो, लवकरच माझी वेबसीरिज येते आहे. लोक मालिका आणि वेबसीरिज यात गल्लत करतात. मालिका या कुटुंबासमवेत पाहता याव्यात यासाठी त्याची निर्मिती केली जाते. तर वेबसीरिजचा आशय तुम्हाला वैयक्तिकरीत्या पाहण्यासाठी आहे. कारण ज्या गोष्टी इतर माध्यमांत उघडपणे मांडता येत नाहीत त्या ठामपणे मांडणारे हे माध्यम आहे. कदाचित हेच माध्यम पुढे भविष्य ठरणार आहे, असे सूतोवाचही त्याने केले.

अभिनय क्षेत्रातही त्याची वाटचाल त्याच सहजतेने सुरू आहे. त्याबद्दल बोलताना यासाठी तो प्रेक्षकांचा ऋणी असल्याचे सांगतो. आजवर मी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला लोकांनी स्वीकारले. मग तो समशेर असो, सत्यजित असो, तुकाराम असो वा ‘र्फजद’मधील शिवाजी महाराज. पश्चिम महाराष्ट्रातले लोक आजही मला तुकाराम महाराज म्हणून ओळखतात, आदर देतात याचे समाधान शब्दांपलीकडे आहे. माझ्या भूमिकांचे श्रेय माझ्या दिग्दर्शकांना आहे, ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. ‘र्फजद’ करतानाही दिग्पाल लांजेकरने मला संहिता ऐकवली आणि महाराजांच्या भूमिकेसाठी विचारले. सुरुवातीला मी भारावून गेलो, पण अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या महाराजांची भूमिका साकारणे आव्हान होते. त्या प्रतिमेला कुठेही धक्का न लावता ती प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि प्रेक्षकांनीही त्याला भरभरून दाद दिली, असं तो सांगतो.

नुकत्याच येऊ  घातलेल्या दिग्पाल लांजेकर यांच्याच  ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातून चिन्मय पुन्हा एकदा महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याविषयी चिन्मय म्हणतो, ‘र्फजद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या दोन्ही चित्रपटांत महाराज असले तरी महाराजांची भूमिका मात्र वेगळी आहे. कोंडाजी र्फजदने पन्हाळा जिंकताना आखलेली मोहीम आणि त्यात मिळालेले महाराजांचे योगदान यावर ‘र्फजद’ची कथा साकारली गेली. तर ‘फत्तेशिकस्त’मध्ये महाराज स्वत: शत्रूशी दोन हात करताना दिसणार आहेत. आपल्याला शाळेत गनिमी काव्याविषयी शिकवलेल्या दीड पानी धडय़ामागची महाराजांची भूमिका ही केवळ तेवढीच मर्यादित नसून त्यामागचा इतिहास सांगणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या केंद्रस्थानी महाराज असल्याने प्रेक्षकांसाठी हा वेगळा अनुभव असणार आहे, असे चिन्मयने सांगितले. अ‍ॅक्शन आणि लढाईचा भाग जास्त असल्याने भूमिकेवर विशेष काम करावे लागले. आणि केवळ ही शारीरिक भूमिका नसून महाराजांचे व्यक्तिमत्त्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तो धागा पकडणे गरजेचे होते. जे दिग्पालच्या मदतीने साध्य झाले. परंतु चित्रपट प्रदर्शित होऊ न प्रेक्षकांचा प्रतिसाद येईपर्यंत मनात धाकधूक सुरूच राहणार आहे, असेही  तो म्हणाला. चित्रपट असो वा मालिका आपल्याकडे चुकीच्या गोष्टींचे भांडवल केले जाते, याबद्दलही तो खंत व्यक्त करतो. तिहेरी तलाक या गंभीर विषयावर भाष्य करणाऱ्या ‘हलाल’ या चित्रपटावर बंदी घातली गेली. आज त्या प्रथेवर कायद्याने बंदी आणली असली तरी त्या समस्येला वाचा फोडणारा हा चित्रपट दडपला गेला. आपल्याकडे चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमात हेच होत आहे. लोकांना आशयापेक्षा धर्म, जात, वैयक्तिक मतभेद आणि चुकीचे समज जास्त महत्त्वाचे वाटतात, अशी खंत त्याने व्यक्त केली. आज तोच चित्रपट ऑनलाइन पाहून लोक भरभरून प्रतिक्रिया देतात, असेही तो म्हणाला.

“आपल्या पालिकेने गोव्यातील प्रशासनाकडून काहीतरी शिकायला हवे. गोव्यातील प्रेक्षकांची कलेप्रती असलेली आस आणि प्रशासनाने जपलेली नाटय़गृहे डोळे दिपवून टाकतात. आपल्याकडे मात्र दुरवस्थेवर सतत भाष्य के ले जाते. जेव्हा समाजमाध्यम नव्हते तेव्हाही आम्ही हीच व्यथा मांडत होतो. आजही चित्र तेच आहे. फरक एकच आहे की आज समाजमाध्यमातून ते जगभर पोहोचत आहे. कलाकारांनी प्रवेशद्वारावर मोबाइल तपासत उभे राहणे, नाटक थांबवणे ही बाब शरमेची आहे. नाटय़गृहांनी आणि प्रेक्षकांनी कलाकारांचा आणि रंगभूमीचा आदर करत स्वत:त परिवर्तन घडवायला हवे. अन्यथा न्यायालयासारखी शिस्त नाटय़गृहात लागू करायला हवी. – चिन्मय मांडलेकर