|| भक्ती परब

भारत विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आणि प्रेक्षकांमध्ये ‘स्टार’चा ‘पॅक’ पुढच्या महिन्यात काढून टाकायला पाहिजे, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. ‘३ इडियट्स’ चित्रपटातलं हे दृश्य सगळयांना माहितीच असेल, दोस्त फेल हो जाए तो दुख होता है, लेकिन दोस्त फर्स्ट आ जाए तो और भी दुख होता है.. या दृश्यातील शेवटच्या संवादात आर. माधवन म्हणतो, त्या दिवशी आम्ही दु:खी होतो आणि आमच्याबरोबर अजून दोघेजण (चतुर आणि विरू सहस्रबुद्धे) दु:खी होते. तर या दृश्यातून सांगायचंय ते हे की भारत बाहेर पडल्यामुळे खेळाडू आणि त्यांचे चाहते दु:खी झाले. पण त्याचबरोबर अजून दोघे जण म्हणजे ‘स्टार स्पोर्ट्स’ वाहिनी आणि जाहिरातदारही दु:खी झाले. अंतिम सामन्याची सगळी तयारी, जाहिरातबाजीतून तयार झालेली वातावरणनिर्मिती हे सगळंच संपलं. प्रेक्षकांनीही आपला मोर्चा आता पुन्हा दैनंदिन मालिकांकडे वळवला आहे.

अंतिम सामन्यामध्ये ‘स्टार स्पोर्ट्स’ वाहिनी भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी मागितलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम जाहिरातदारांकडून मागणार, अशी चर्चा होती. भारतीय प्रेक्षक भावनिकरीत्या दूरचित्रवाणीशी जोडला जातो, त्यामुळे शेवटचे दोन सामने पाहण्यासाठी साहजिकच प्रेक्षकसंख्या कमी होणार, हे बार्कने सांगायच्या आधीच स्पष्ट झालं आहे. पण त्या आधीच वाहिनीने ‘प्रो कबड्डी’ सामन्यांच्या जाहिरातींना सुरुवात केली आहे आणि मराठी प्रेक्षकांना खूश करण्यासाठी १५ जुलैपासून ‘स्टार स्पोर्ट्स’ मराठी वाहिनी सुरू करण्याचा मुहूर्तही त्यांना मिळाला आहे.

त्याचबरोबर सोनी समूहाच्या ‘सोनी सिक्स’ आणि ‘सोनी टेन ३’ या वाहिन्यांनी भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कंबर कसली आहे. या पावसात प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या मनातील मोर नाचणार.., अशा आशयाची जाहिरात धमाल उडवते आहे. ऑगस्टचा महिना, मान्सून, चाहत्यांचे वेड आणि सोनीचा पॅक घ्यायला विसरू नका, अशा सगळ्या गोष्टी या जाहिरातीमध्ये आहेत. त्यामुळे प्रेक्षक स्टारऐवजी सोनीचा पॅक निवडतील का, हे काही दिवसांत कळेलच.

या आठवडय़ापासून बार्कने २०१९ या वर्षांच्या २७ व्या आठवडय़ापासून सशुल्क वाहिन्या आणि नि:शुल्क वाहिन्या यांचा वेगळा टीआरपी द्यायला सुरुवात केली आहे. या बदलानंतर ‘स्टार प्लस’ वाहिनीने सशुल्क वाहिन्यांमध्ये पहिला क्रमांक पटकावला, तर नि:शुल्क वाहिन्यांमध्ये ‘दंगल टीव्ही’ ही वाहिनी पहिल्या क्रमांकावर आली. पण एकूणच प्रेक्षकसंख्येचा विचार करता सशुल्क वाहिन्यांच्या तुलनेत नि:शुल्क वाहिन्यांना जास्त प्रेक्षकसंख्या मिळाली. स्टार प्लसने पहिला क्रमांक पटकावला असला तरी प्रेक्षकांनी वाहिनीवर जोरदार टीका केली आहे. प्रेक्षकांचं म्हणणं आहे की ‘कहा हम, कहा तुम’ या मालिकेमुळे भारतीय दूरचित्रवाणीवर खूप वर्षांनी मालिकांच्या मांडणीत बदल अनुभवायला मिळतो आहे. पण स्टार प्लस वाहिनी या मालिकेचा योग्य प्रमाणात प्रचार-प्रसार करत नाही. त्यामुळे मालिकेच्या कमी टीआरपीला ही वाहिनीच जबाबदार आहे. या चर्चेत भाग घेताना काहींनी या मालिकेचा सखोल अभ्यास करून मतं व्यक्त केलेली पाहायला मिळाली.

टीआरपीची आकडेवारी वाहिनीसाठी आणि वाहिन्यांवरील मालिकांसाठी एक दिशादर्शक असते. १ फेब्रुवारीपासून वाहिन्या निवडीचा हक्क मिळाल्यानंतर प्रेक्षकांनी नि:शुल्क वाहिन्यांबरोबर स्टार आणि झी समूहाच्या सशुल्क वाहिन्यांना अधिक पसंती दिली. याचं कारण असं की स्टार, झी, कलर्स आणि सोनी हे चार मोठे समूह आणि त्यांच्या विविध वाहिन्यांची नावे, त्यांच्या कार्यक्रमांची आखणी फक्त मोठय़ा शहरातील प्रेक्षकांना समजू लागली आहे. परंतु छोटय़ा शहरांमध्ये आणि गावांमध्ये स्टार आणि झी सोडून इतर समूहांच्या वाहिन्या कोणत्या आहेत, त्यावर कोणते विशेष कार्यक्रम लागतात, याबद्दल प्रेक्षकांना माहिती नसते. आता तर प्रेक्षक त्यांच्या आवडीप्रमाणे वाहिन्या निवडत असल्यामुळे सरसकट वाहिन्या पाहण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे वाहिन्यांना तळागाळातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. नुकतीच सोनी समूहाच्या सोनी सब वाहिनीने ‘खुशीयोंवाली फिलिंग’ ही संकल्पना घेऊ न वाहिनीला नवी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ही ओळख वाहिनीला कितपत फलदायी ठरते, ते पुढील काही महिन्यांत स्पष्ट होईल.

स्टार प्रवाह वाहिनीवर ‘एक टप्पा आऊ ट’ या कार्यक्रमामध्ये सहभागी स्पर्धकांची संख्या वाढवायला हवी होती. यूटय़ूब आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा आधार घेतलेल्या अनेक मराठी नवोदित विनोदवीरांना वाहिनीने एकत्र आणायला हवे होते, असो. पण हेही नसे थोडके. ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत गुरुपौर्णिमा विशेष भाग प्रसारित होणार आहे. यामध्ये दत्तगुरूंचे पहिले गुरू कोण?, याचे उत्तर मिळणार आहे. कलर्स मराठीवरील ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत सिद्धार्थला अनूने गुडबाय मित्रा म्हटल्यावर पुढे यांचं नातं कोणतं वळण घेणार?, हे पाहायला मिळेल.

सोनी मराठी वाहिनीवर १९ ऑगस्टपासून ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही मालिका दाखल होणार आहे. प्रोमोंमधून त्याची झलक सध्या वाहिनीवर पाहायला मिळते आहे. तसेच रिया-पुष्कराज की अवनी-जयदत्त, नवीन मिशन कोण फत्ते करणार? याचे उत्तर ‘ मी तुझीच रे’ आणि ‘एक होती राजकन्या’ या दोन मालिकांच्या महासंगमात मिळणार आहे. १५ जुलैला संध्याकाळी ७ वाजता हा विशेष भाग रंगणार आहे. झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत संभाजी महाराजांनी अनाजी पंत आणि त्यांच्याबरोबर कुटिल कारस्थान रचणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायी देण्याची शिक्षा फर्मावली आहे. लवकरच अनाजींना हत्तीच्या पायी देण्यात येणार आहे. याच वाहिनीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिका मस्त रंगात आली आहे. परंतु समरला सुमी आवडली आहे, हे दर्शवणारं फक्त एकटय़ा समरचं एक दृश्य मालिकेत दाखवलं जायला हवं होतं. झी युवा वाहिनीवर ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ ही मालिका १५ जुलैपासून रात्री ८ वाजता पाहायला मिळणार आहे.

टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांना एखादी मालिका चांगली आहे, तर तिला टीआरपी का मिळत नाही, हा प्रश्न नेहमी पडतो. टीआरपीच्या या दिशादर्शक आकडेवारीची कमाल प्रेक्षकांना वाटते तितकीच प्रत्येक वाहिनीच्या मागे राबणाऱ्या सर्जनशील मंडळींनाही वाटते. कारण त्यांना टीआरपीचे कोडे उलगडतानाच प्रेक्षकांचे मनोरंजनही करायचे असते.