29 May 2020

News Flash

चित्रचाहूल : ‘लगीनघाई’ आणि ‘मांडव खोडय़ा’

लग्नाचा मांडव सध्या अनेक मालिकांच्या सेटवर घालण्यात आला आहे. 

(संग्रहित छायाचित्र)

निलेश अडसूळ

लग्न म्हटलं की आनंद— उत्साह आलाच, पण त्याच आनंदसोबत रुसवे—फुगवे, असंतोष आणि नाराजीही आलीच. कधी मुलाकडची बाजू जड  तर कधी मुलीकडची बाजू जड. कधी पसंती—नापसंतीचे वाद तर कधी मानपानाचे वाद. कधी एकदा हे कार्य पार पडतं आणि जीव सुटतो अशाच भूमिकेत अनेकजण असतात. आणि या सगळ्या रामरगाडय़ातून  वाट काढत निर्विघनपणे लग्न पार पाडण्यासाठी अनेकांचे प्रयत्नही सुरु असतात. आणि प्रसंग काही कुणाला चुकले नाहीत. अगदी प्रत्येक जातीधर्मात, गरीब—श्रीमंतात असे किस्से होतच असतात. त्यात महाराष्ट्रात लग्नात एकूणच उत्साहाचं उधाण असतं. म्हणून आहेरापासून  ते आहेराच्या परतफेडीपर्यंत सगळा विचार इथे झालेला असतो. सध्या याचेच प्रतिबिंब मालिकांमधून उमटताना दिसते आहे. हल्ली तर ‘विवाह सोहळा स्पेशल एपिसोड‘ हे प्रत्येक मालिकेत असतातच त्याशिवाय मालिका पूर्ण झाली असे होणे अशक्य. प्रत्येक दिग्दर्शक आपल्या मालिकेतील विवाह सोहळा कसा खास होईल याकडे विशेष लक्ष देत असतो. मग कुठे  ग्रामीण परंपरेनुसार चित्रीकरण होते तर कु ठे भव्य लखलखाट. असाच लग्नाचा मांडव सध्या अनेक मालिकांच्या सेटवर घालण्यात आला आहे.

‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता‘ या मालिकेत सध्या बाळ जिजाऊं च्या लग्नाचा घाट घालण्यात आला आहे. शहाजी राजे आणि जिजामाता या स्वराज्य घडवणाऱ्या दाम्पत्याचा विवाह पाहण्यासाठी सध्या सगळेच उत्सूक आहेत. परंतु हा केवळ विवाह आहे का, तर तसे नाही त्या काळात घडलेली ही एक राजकीय घडामोड आहे ज्यामुळे पुढे याच घटनांना इतिहासरूप प्राप्त झाले. मालिकेत सध्या एकीकडे गुलामगिरी आणि अन्यायाची जिजाऊं ना जाणीव होऊ  लागली आहे. किंबहूना त्यांच्यावर दुर्बलांच्या बाजूने उभं राहण्याचे, अन्यायाला वाचा फोडण्याचे संस्कारही होऊ  लागले आहेत. तर दुसरीकडे शहाजीसुद्धा गुलामगिरीच्या जाणीवेनं व्यथित झाले आहेत. अपमानाला, अन्यायाला आपल्यापरीने प्रत्युत्तर देत आहेत. आणि असे होत असतानाच जिजा आणि शहाजी एकमेकांसमोर येण्याचा ऐतिहासिक प्रसंग सध्या मालिकेत रंगवला जाणार आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने जाधव आणि भोसले परिवार निजामाच्या निमंत्रणावरून दौलताबादला जातात आणि तिथेच जिजा आणि शहाजी यांची पहिली भेट होणार आहे. आता दोन परिवार एकत्र आले म्हणजे लग्नाच्या गोष्टी तर होणारच. परंतु हे लग्न इतक्या सहजासहजी होईल असे नाही. या लग्नात आलेले अडथळे आणि त्यामागे असलेल्या नाटय़पूर्ण घटना आगामी भागात पहायला मिळणार आहेत. असे असले तरी जिजा आणि शहाजी यांची गोड भेट पाहण्यासाठी प्रेक्षक भलतेच उत्सूक आहेत.

सध्या दोन वाहिन्या दोन वेगवेगळ्या ऐतिहासिक कालखंडांचे चित्रण करत आहेत. एक थेट शिवपूर्व काळ तर दुसरा पेशवाई. पण ऐतिहासिक मालिका आल्या की भारदस्त भाषा, पेहराव, मानपान आणि शाही सरंजाम हा आलाच. असाच शाही सरंजाम माधव आणि रमा यांच्या लग्नात पाहायला मिळणार आहे.  ‘कलर्स मराठी’वरील ‘स्वामिनी‘ या मालिकेत रमा—माधव यांच्या विवाहाची धामधूम आणि धर—पकड गेले काही भाग सुरु असल्याचे प्रेक्षक पाहत आहेत. एकीकडे पेशव्यांचा माधव तर दुसरीकडे सामान्य कुटुंबातील रमा. या आर्थिक दरीमुळे तोलामोलाचे घर न मिळाल्याने गोपिकाबाईंच्या मनातली नाराजी आता कृतीत उतरू लागली. लग्नाला काही दिवस राहिलेले असतानाच आता कुरघोडय़ांना सुरुवात झाली आहे. रमाच्या घरच्यांचा अपमान करण्याची एकही संधी त्या सोडणार नाहीत, पण हे लग्न निर्विघनपणे पार पाडण्यासाठी मालिकेत आत्याबाईंची एंट्री झाली आहे. येत्या काही भागात रमा आणि तिच्या आईचे हळवे प्रसंग आणि  लग्नातील गोपिकाबाईंचा पेशवाई रुबाबही पाहायला मिळणार आहे. रमा—माधवचे लग्न होणार हे निश्चित असले तरी त्यामागील घटना आणि नाटय़प्रसंग आगामी भागात पाहायला मिळतील.

हे झाले ऐतिहासिक मालिकांच्या बाबतीत, पण सामान्य माणसांच्या लग्नातही या मांडव खोडय़ा होतच असतात. ‘स्टार प्रवाह’वरील ‘साता जल्माच्या गाठी’ या ग्रामीण जीवनावर आधारलेल्या मालिकेतही लगीनघाई सुरु झाली आहे. मालिकेतील नायक-नायिका म्हणजेच श्रुती आणि युवराज या दोघांनीही सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका पहिल्या भागापासून घेतल्या आहेत. पण यात सर्वात मोठा अडथळा आहे तो युवराजची आई नंदादेवी यांचा. श्रुतीसोबत विवाह करायला त्यांचा पहिल्यापासून नकार आहे. त्यामुळे आता युवराज श्रुतीच्या नात्याचं भविष्य काय असेल?, हाच प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये नक्की नंदादेवींचा अट्टाहास जिंकणार की श्रुतीचे युवराजवर असलेले प्रेम विजयी होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. युवराज आपल्या आईची संमती मिळवून हा विवाह थाटामाटात पार पडेल की श्रुती आणि युवराजला काही वेगळा निर्णय घ्यावा लागेल याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहाचली आहे.

तर झी मराठीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री‘ या मालिकेत नुकताच सुमी आणि पायलटचा विवाह सोहळा पार पडला. अर्थात ती मालिकाही विनोदी असल्याने तिथे झालेल्या कुरघोडय़ांनी प्रेक्षकांना निखळ आनंद दिला. तर ‘माझ्या नवऱ्याची बायको‘ या मालिकेने सौमित्र आणि राधिकाच्या लग्नाची बोलणी करून  पुरोगामी विचारांचा पाया घातला आहे. सध्या मालिके त सौमित्रच्या आईचे आगमन झाले असून राधिका आणि सौमित्र यांच्या लग्नाला परवानगी मिळाली आहे.  परंतु या बातमीने खवळलेला गुरुनाथ या लग्नात काय विघ्न आणेल हे अद्याप तरी सांगता येणार नाही. राधिका आणि सौमित्रच्या लग्नाला अजून बराच अवकाश असला तरी आगामी भागात त्यांचा साखरपुडा पहायला मिळणार हे नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2019 1:30 am

Web Title: marathi serial wedding episode abn 97
Next Stories
1 पाप्याच्या पितराचा पवित्रा..
2 वेबवाला : रटाळ आणि बाळबोध
3 फॅट टू फीट; वाहबिज दोराबजीचा पाहा ‘हॉट लूक’
Just Now!
X