‘गारवा.. वाऱ्यावर भिरभिर पारवा..’ गीतकार सौमित्र यांचे शब्द आणि गायक-संगीतकार मिलिंद इंगळे यांचे संगीत, त्यांच्याच आवाजातील या गाण्यांनी प्रेक्षकांवर अक्षरश: गारूड केले होते. आज या दोघांचीही आपली अशी एक वेगळी ओळख आहे. गीतकार सौमित्र म्हणजेच किशोर कदम यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून एक चांगला अभिनेता म्हणून आपली छाप उमटवली आहे. तर मराठी चित्रपट संगीत क्षेत्रात मिलिंद इंगळे हे नाव घर करून आहे. या जोडीने मराठी चित्रपटांसाठी गीतकार-संगीतकार म्हणून काम केले होते. मात्र आता त्यांनी पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात गीतकार आणि संगीतकार म्हणून पदार्पण केले आहे.
‘डॉटर’ या हिंदी चित्रपटासाठी किशोर कदम यांनी पहिल्यांदाच गीतकार म्हणून काम केले आहे, तर मिलिंद इंगळे यांनी संगीतकार म्हणून काम पाहिले आहे. २४ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातील पदार्पणासाठी किशोर कदम यांनी आणखी एक टोपणनाव निवडले आहे. अभिनय जगतात किशोर कदम म्हणून परिचित असलेला हा हरहुन्नरी कलाकार कवी म्हणून लोकांसमोर येतो तो ‘सौमित्र’ होऊन, गीतकार म्हणून हिंदीत त्यांनी के. पश असे नवे नामकरण करून घेतले आहे. या नव्या नावामागचा अर्थ त्यांनी स्वत:च उलगडून सांगितला. किशोर या नावातील ‘के’ आणि पश्मीना या त्यांच्या मुलाच्या नावातील पश ही अक्षरे घेऊन त्यांनी ‘के. पश’ असे नवे नाव स्वीकारले आहे. ‘गारवा’, ‘सांजगारवा’ या अल्बम्सबरोबरच या जोडीने मराठीत ‘माहेरचा निरोप’, ‘मोकळा श्वास’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ अशा चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे.
मात्र चित्रपट आणि संगीत क्षेत्रात एकत्र काम करणाऱ्या या जोडीची मैत्री ही त्याआधीपासूनची आहे आणि त्याचाच फायदा ‘डॉटर’ या हिंदी चित्रपटासाठी पहिल्यांदाच गीतकार-संगीतकार म्हणून एकत्र काम करताना झाला, असे मिलिंद इंगळे यांनी सांगितले. ‘आमच्या मैत्रीचा सिलसिला आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेपासून सुरू झाला तो आजही कायम आहे. आमच्या या तीस वर्षांच्या मैत्रीचे आम्हा दोघांनाही कौतुक आहे’, असे ते म्हणतात. किशोरच्या मराठीतील कविता अप्रतिम आहेत. त्याने हिंदीतही काम करावे, अशी माझी इच्छा होती. ही इच्छा ‘डॉटर’ या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाली, असे मिलिंद इंगळे यांनी सांगितले.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे