सध्याच्या काळात प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतो. अनेक सेलिब्रिटीही इन्स्टाग्राम, ट्विटर या सारख्या सोशल माध्यमांच्या सहाय्याने चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. यात बऱ्याच वेळा ही सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या जीवनातील अनेक रंजक किस्से, फोटो किंवा व्हिडीओ शेअर करुन त्यांच्या जीवनातील काही गोष्टी चाहत्यांना सांगत असतात. तर काही जण त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करुन जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. यामध्येच सध्या एका लोकप्रिय गायिकेने तिच्या लहानपणीचा फोटो शेअर केला असून सध्या या फोटोची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका सावनी रविंद्र साऱ्यांनाच ठावूक असेल. आपल्या मधूर आवाजाने सावनीने मराठी कलाविश्वात एक दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे तिचे सध्याच्या घडीला असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच तिने इन्स्टाग्रामवर तिच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे.


या फोटोत सावनी तिच्या वडिलांसोबत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे सावनी प्रचंड गोड दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांनीही या फोटोवर अनेक कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, सावनी रविंद्र हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नाव आहे. तिने अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. सावनीने मराठीसह तेलुगू, मल्याळम, कन्नड, तामिळ भाषेतूनही अनेक गाणी गायली आहेत. काही काळापूर्वी तिच्या ‘वेन्निलविन सालईगलिल’ या गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाले होता. तिने ‘पसंत आहे मुलगी’, ‘कमला’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ आदी मालिकांची शीर्षकगीतं गायली आहेत.