मराठी सिने आणि संगीतसृष्टीनं नेहमीच प्रेक्षक आणि रसिकांच्या मनावर राज्य केलंय. मराठमोळ्या ठेक्यांवर ताल धरायला लावणाऱ्या चित्रपटगीतांपासून अल्बम आणि सिंगल्सच्या माध्यमातून सर्वसामान्यांमधील डान्सरला मनमुराद नृत्य करायला लावणाऱ्या सर्वच गीतांचा मोलाचा वाटा आहे. हीच परंपरा पुढे सुरू ठेवत ‘दादला बुलेटवाला…’ हे धमाकेदार मराठी गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला आलं आहे.

भक्ती तुषार दळवी आणि निखिल चंद्रकांत पाटील यांची निर्मिती असलेल्या या गाण्याचं दिग्दर्शन आाणि कोरिओग्राफी अमित बाईंग यांनी केली आहे. या गाण्याचं खास आकर्षण आहे सुशांत पुजारी. सुशांत पुजारी हे नाव एव्हाना सर्वांच्याच चांगलं परिचयाचं झालं आहे. दिग्दर्शक-कोरिओग्राफर रेमो डिसूझाच्या ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’, ‘स्ट्रीट डान्सर’ या हिंदी सिनेमांमध्ये सिनेरसिकांनी सुशांतच्या डान्सची जादू पाहिली आहे. आता प्रथमच तो मराठीत आपली प्रतिभा दाखवत आहे. या गाण्यात सुशांतच्या जोडीला अमृता फडकेचं नृत्य आणि सौंदर्य लक्ष वेधून घेत आहे.

डीओपी अभिजीत पाटील यांनी ‘दादला बुलेटवाला…’ची सिनेमॅटोग्राफी केली आहे. गीतकार-संगीतकार श्रेयस यांनी हे गीत लिहिलं असून, कविता राम यांच्यासोबत स्वत: गात त्यांनी संगीतबद्धही केलं आहे. श्रेयसनं यापूर्वी ‘तिचा उंबरठा’, ‘गावठी (गुठून जीव… आणि भन्नाट…)’, ‘ट्रकभर स्वप्नं’ या मराठी सिनेमांसाठी संगीत दिलं आहे. ‘गावठी’मधील ‘गुठून जीव…’ या गाण्यासाठी श्रेयसला सर्वोत्कृष्ट संगीतकार आणि पुरुष पार्श्वगायकाची नामांकनंही मिळाली होती. श्रेयसच्या संगीतानं सजलेले ‘सलमान सोसायटी’, ‘कोंडी’, ‘रावस’ आणि ‘देवाक काळजी’ हे आगामी मराठी सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१५ मध्ये श्रेयसनं बीसीसीआय इंडियासाठी गाणं बनवलं होतं. श्रेयसनं संगीत दिग्दर्शित केलेलं ‘तुटलेत सारे आधार…’ हे शेतकरी गीतही चांगलंच चर्चेत राहिलं होतं.

‘दादला बुलेटवाला…’चं दिग्दर्शन आणि कोरिओग्राफी करणारे अमित बाईंग १९९६ पासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असून, मागील १० वर्षांपासून कोरिओग्राफर म्हणून कार्यरत आहेत. ‘साहेब बीवी और गँगस्टर’, ‘जब तुम कहो’, ‘जाने क्यों दे यारों’ या हिंदी सिनेमांसोबतच अमित यांनी ‘कॅनव्हास’, ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’, ‘लालबागची राणी’, ‘चीटर’, ‘सिनीयर सिटीझन’, ‘व्हॅाट्सअप लव्ह’, ‘मिस यू मिस’ या मराठी आणि ‘कॅनव्हास’, ‘धंत्या ओपन’, ‘मि. कलाकार’, ‘दीवान हाऊस’ या गुजराती सिनेमांसाठी कोरिग्राफी केली आहे. यासोबतच कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॅास’च्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनचं शीर्षकगीतही त्यांनी केलं आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’, ‘भागो मोहन प्यारे’, ‘अल्टी पल्टी’, ‘लग्नाची वाईफ वेडींगची बायको’, ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ ‘डान्सिंग क्वीन’ आणि नवीन कारभारी लयभारी या मालिकांच्या शीर्षकगीतांसोबतच त्यांनी झी युवा वाहिनीचं टायटल साँगही केलं आहे.