नीलेश अडसूळ

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आजही चांद्यापासून बांद्यापर्यंत ‘आपल्या’ म्हणून ओळखल्या जातात. कौटुंबिक भूमिका, दैवी भूमिका यात जरी त्यांचा हातखंडा असला तरी एके काळी त्यांनी निर्माती म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि मराठी चित्रपट सर्वदूर पोहोचवला. आता सोनी मराठीवर येऊ घातलेल्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतून पुन्हा एकदा त्या देवी काळूबाईची भूमिका साकारत आहेत. फक्त यात केवळ देवीची भूमिका नाही तर देव माणूस रूपात कशा पद्धतीने भक्तासोबत उभा राहतो हे सांगणारी कथा असल्याचे त्या सांगतात.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

आजवरच्या सर्व दैवी भूमिका केवळ व्यावसायिकता म्हणून नाही तर श्रद्धा ठेवून केल्याचे त्या सांगतात. त्यांच्या मते ‘एखाद्या देवाची भूमिका आपण साकारतो तेव्हा आपल्यातही ऊर्जा येत असते. शिवाय लोकांचे श्रद्धास्थान असल्याने जबाबदारीही असते. त्या देवाचे माहात्म्य, अनुभव या सगळ्याचा अभ्यास करून अशा भूमिका साकाराव्या लागतात. त्याशिवाय लोक त्या पात्राशी एकरूप होत नाहीत.’ ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ हा सिनेमा फार वर्षांपूर्वी केला होता. तेव्हाच त्या देवीची महती आणि प्रचीती मी अनुभवली होती आणि यावर मालिका करावी असा विचार मनात येऊन गेला होता. आज इतक्या वर्षांनी तो पूर्णत्वास आल्याने मी या भूमिकेला चटकन होकार दिला. मुळात ही सामान्य माणसांची देवी आहे. हिचा शृंगार भपकेदार नाही. प्रत्येकाला आपली वाटेल अशी ही देवी आहे. त्यात मालिकेचे विशेष म्हणजे यात केवळ देवीची महती नाही तर सामाजिक भान आणि देवीची साथ अशी सांगड घालण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. ‘नटसम्राट’सारख्या अजरामर कलाकृतीतून नाटकांची सुरुवात झाली आणि पुढे दत्ता भट, शांता जोग, विजया मेहता, माधव वाटवे, नयनतारा अशा अनेक दिग्गजांचे आशीर्वाद त्यांना मिळाले. घरातली परिस्थिती अगदी बेताची असतानाही आहे त्यात समाधान मानून त्यांनी शिक्षण आणि अभिनय या दोन्ही गोष्टींना प्राधान्य दिले. ‘दहावीत असताना ‘चक्र’सारखा हिंदी सिनेमा मी केला. त्यात दोन मिनिटांची भूमिका असली तरी केवळ स्मिता पाटील यांच्यासोबत काम करायला मिळावे अशी आशा होती. या प्रवासात सगळ्यांकडून मी शिकत गेले. या जोडलेल्या माणसांनीच मला राजस्थानी, गुजराती सिनेमाचे दारही उघडे केले. मराठीत ‘पोरींची धमाल, बापाची कमाल’ या चित्रपटातून माझे पदार्पण झाले आणि ‘लेक चालली सासरला’ या चित्रपटाने मला ओळख मिळवून दिली. तिथून सुरू झालेला प्रवास थांबलाच नाही. तब्बल २९ चित्रपट केल्यानंतर ‘माहेरची साडी’ केला आणि मराठी चित्रसृष्टीत त्याचे नाव अजरामर झाले, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

हिंदीत चित्रपटात त्या फार रमल्या नाहीत. हिंदीत आलेल्या भूमिका मनासारख्या नसल्याने त्यांनी वेळोवेळी नकार दिला. त्याच वेळी मराठीने दिलेला आपलेपणा आणि यश त्यांना अधिकच जवळचं वाटत गेलं, असे त्या नमूद करतात.

नव्या पिढीच्या दोन बाजू

या क्षेत्रात काम करताना अनंत अडचणी येत असतात. अशा वेळी खचून न जाता मार्ग शोधण्याचा सल्ला त्या नव्या पिढीला देतात. ‘सुवासिनीची सत्त्वपरीक्षा’ या चित्रपटाची संपूर्ण तयारी झाली आणि प्रदर्शनाच्या दिवशीच वितरकाने हात वर केले. विशेष म्हणजे त्या चित्रपटात मी स्वत: पैसे टाकले होते. ऐन वेळी आलेल्या या अडचणीने भांबावून जायला झालं परंतु मी स्वत: गावागावात जाऊन जत्रा-यात्रांमधून हा सिनेमा दाखवला. तब्बल तिपटीने नफा कमावला आणि यशस्वी निर्माती झाले. त्यानंतर पाच चित्रपटांची निर्मिती केली. २००७ ला माझा अपघात झाला तेव्हा अलका कधीही उभी राहू शकणार नाही असा अनेकांनी समज करून घेतला. हातातले सहा चित्रपटही गेले. पण मी हरले नाही. पुन्हा उभी राहिले. त्यामुळे अडचणी आल्यावर त्यावर मात करायला हवी, असे त्या स्वानुभवावरून सांगतात. हल्लीच्या तरुणाईने स्वीकारलेला व्यसनाचा मार्ग तर अत्यंत अयोग्य आहे. आम्हीही ११ महिने सलग कामे केली आहेत. अशा ताणातून जाताना कुटुंबाची साथ घ्या. त्यांना विश्वासात घ्या म्हणजे तुमचा भार हलका होईल, असा सल्लाही त्या देतात.

नव्या पिढीला मार्गदर्शन करताना त्यांचे कौतुकही त्या करतात. ‘केदार शिंदे, सलील कुलकर्णी, समीर विद्वांस, क्षितिज पटवर्धन, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर अशा नव्या मुलांच्या मी संपर्कात आले. या पिढीकडे प्रचंड ऊर्जा आहे. याच पिढीने मला वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका दिल्या. ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘वेडिंगचा शिनेमा’, ‘धुरळा’सारखे चित्रपट करण्याची संधी मिळाली. त्यांच्याबरोबरचे मित्रत्वाचे नाते मला आवडते. मी भूमिका जरी सोशीक आणि रडवेल्या केल्या असल्या तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र आनंदी आणि नव्या पिढीसोबत चालण्याचा माझा प्रयत्न असतो. किंबहुना मी त्यांच्याकडून नव्या गोष्टी आत्मसात करत असते. म्हणून लेखक-दिग्दर्शक वयाने कितीही लहान असले तरी त्यांचा आदर करत मी काम करते, असं त्या सांगतात.

समाजकार्याचे स्वप्न..

आजवर केलेल्या कामाने खूप प्रेम मिळाले, पण आता लोकांसाठी काही करायचे आहे. माणुसकीच्या नात्याने निरपेक्ष काम करणाऱ्यांची मोट बांधायची आहे आणि कला क्षेत्रातील तंत्रज्ञ, पडद्यामागचे कलाकार, वृद्धजन यांच्यासाठी मदतीचा हात व्हायचे आहे. एकमेकांच्या मदतीसाठी धावून जाणे एवढेच स्वप्न आता उराशी बाळगून आहे.

नव्या मालिके विषयी..

काळूबाई या दैवताशी अनेक गैरसमज, अंधश्रद्धा जोडल्या गेल्या आहेत. ते गैरसमज दूर करण्यासाठी या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. मालिकेचे लेखन शिरीष लाटकर यांनी केले असून सातारा जिल्ह्यात चित्रीकरण सुरू आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता, प्राजक्ता गायकवाड, शरद पोंक्षे, मिलिंद शिंदे, प्रसन्न धुपकर, मंजुषा गोडसे अशा दर्जेदार कलाकारांची जंत्री यात पाहायला मिळणार आहे.