News Flash

मालिकांबाबत प्रेक्षकांना नेमकं काय वाटतं

नाचाचे कार्यक्रम तर बघवत नाहीत. लहान आणि मोठ्यांकडून वाटेल तसे करून घेतात.

‘घाडगे अॅकण्ड सून’मध्ये अक्षय-अमृता इतके भावनाशून्य कसे काय?

रेखा केळकर – response.lokprabha@expressindia.com
प्रतिक्रिया
प्रेक्षकसंख्या वाढवण्यासाठी वाहिन्यांकडून अनेक प्रयोग केले जात असले तरी प्रेक्षकांना नेमकं काय वाटतं त्याची ही एक प्रातिनिधीक प्रतिक्रिया.

‘प्रेक्षकसंख्या वाढवण्यासाठी रस्सीखेच’ या २० एप्रिलच्या कव्हरस्टोरीमध्ये सध्या वाहिन्यांमधील सुरू असलेल्या स्पर्धेचा आढावा आपण घेतला आहे. त्या अनुषंगाने काही मते मांडावीशी वाटतात.

झी मराठी, कलर्स मराठीच्या नवीन मालिका सुरू झाल्या किंवा त्यांच्या जाहिरात येत असताना त्याबद्दल उत्सुकता असते. कधी मालिकांची शीर्षके आकर्षित करतात तर कधी त्यातल्या नट-नटय़ांमुळे मालिकेबद्दल उत्सुकता वाटते. मालिका बघायला (दंड थोपटून, नवऱ्याचा विरोध पत्करून) आम्ही सुरुवात करतो.

दुसऱ्या दिवशी आपापली मते प्रदर्शितही करतो. परंतु चार-पाच आठवडय़ात मालिका आपले रंग दाखवायला सुरूवात करतात. झाडाला फांद्या फुटतात, तसे मालिकांना आडवे-उभे  कथानक फुटायला लागते आणि ती रुळावरून घसरायला लागते. लेखकपण गोंधळतो आणि कसेतरी जुळवण्याचा प्रयत्न करतो. संस्कार, संस्कृती भंपक आहे, असे वाटायला लागते. ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’मध्ये अक्षय लग्न झाल्यावरही त्याचे प्रेमप्रकरण सुरू ठेवतो. त्याला त्याच्या पालकांची भीती वाटतच नाही. पण सगळ्यात जास्त कमाल वाटते ती त्या अमृताची. बायको होऊन एका खोलीत झोपून फक्त मैत्रीचे नाते असते. कोणीही मूर्ख माणूस यावर विश्वास ठेवणार नाही. अमृता-अक्षय भावनाशून्य असतात का? कोण कोणाची फसवणूक करते आहे, ते कळत नाही. प्रेक्षक बघतात, त्याचा गैरफायदा घेऊ नका. पटेल असे लिहा आणि दाखवा. मालिकेच्या टीममध्ये बरीच मंडळी काम करत असतात. त्यांची सर्वाची बुद्धी कामातून गेलेली असते का? चुकीचे दाखवायला काहीच कसे वाटत नाही? झी मराठी स्वत:शीच स्पर्धा करते, म्हणजे काय? एकाहून एक बेकार मालिका सादर करणार का?

‘राधा प्रेम रंगी रंगली’ ही मालिका आधुनिक-पुरातन (संस्कारक्षम) असा वाद दाखवून छान लिहिता आली असती. पण तसं झालं नाही. श्रीमंत मुलगी चाळीत कशी राहणार, याचा काडीचाही विचार न करता, कथानक पुढे ढकलत आहेत. त्यात भर म्हणजे आदित्य दुसऱ्या बाईमध्ये गुंततो हे उपकथानक दाखवून तर संस्कारांची अगदी वाट लावली आहे. बेशरमपणाची कमाल आहे. उद्योजक पैशासाठी असतात; पण संस्कारांची थोडी तर चाड असते. प्रेमची लग्नाआधी भानगड असूनही तो बहिणीकरता एका सुसंस्कारित मुलीशी लग्न करतो ते पटत नाही आणि त्याचे कारणही पटत नाही. प्रेक्षक निर्बुद्ध नाहीत. त्यांना काहीही दाखवलेले चालणार नाही. प्रेक्षकांची मते घ्या. ती ‘लोकप्रभा’ने घेतली ओहत. तेव्हा त्या सूचनांचा काही विचार करणार का? आटोपशीर मालिका फार छान होतात. पाणी घातलेल्या मालिका नकोत. प्रेक्षकांना गृहीत धरू नका. मनोरंजन करा. विनोदी मालिका दाखवल्या; तर त्यांचा स्तर जरा उच्च ठेवा.

‘तुझं माझं ब्रेक-अप’मध्येपण घटस्फोट घेऊन परत एकमेकांत गुंततात. कुठचीही आई आपल्या मुलाचा संसार मोडणार नाही. नको ते दाखवू नका. आजकालचे तरुण-तरुणी मालिका बघून त्यांचे अनुकरण करतात; तेव्हा जरा जपून..! सर्वाची कामे छान झाली म्हणजे मालिका यशस्वी झाली असे नाही. कलियुगात मधातून कडू चाटण दिले, तरी चालेल; म्हणून चांगले दाखवा. प्रेमाचा फुसका आधार घेऊन मालिका पुढे ढकलू नका. ‘बूमरँग’ होऊन तुमच्याच घरातील माणसांवर आदळेल, हे ध्यानी घ्या. आदर्श दाखवू नका. पण रोजच्या जीवनातील नीती (खोटे न बोलणे, लग्न झाल्यावर दोघांत तिसरा नको, इ. इ.) नियम तरी दाखवा.

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका वेगळी आणि छान वाटली. परंतु परत ‘ये रे माझ्या मागल्या!’ सरळ मालिका का धावू शकत नाही? संकटे दाखवा, पण त्याला काही तरी अर्थ असला पाहिजे. छोटी सून आरामात लोळते. मोलकरीणबरोबर फिरते. घरात कामाला हात लावत नाही – हे कसे काय? मोठी शिकलेली; पण सर्व करते. बरे वाटते; पण सत्याला असे होणे शक्य नाही. दोन्ही सुनांना सारखाच न्याय नको का?  की एकत्र कुटुंब पद्धतीच नको? सासरेबुवा छान दाखवले आहेत. अजूनही बघण्यासारखी मालिका आहे; तेव्हा उगाच वाढावा नको.

स्टार प्रवाहवर ‘नकळत सारे घडले’ ही मालिका छान वाटली. पण परत तेच! मुलीकरता आई आली आणि ती चांगली ‘सून-आई’ होते आहे, तरी नवरा दुर्लक्ष का करतो? पटत नाही. आता नणंदेचा नवरा नालायकासारखा वाटतो. तो पहिल्या भागापासून खलनायक वाटतो. कशाकरता? उपकाराची फेड उपकाराने का करतो? त्याची बायकोसुद्धा त्याचीच बाजू घेते. प्रेक्षकांना नको ते निष्कर्ष काढायला भाग पाडू नका.

‘लेक माझी लाडकी’ ही मालिका बघता वेड लागणार, असं वाटतं. साकेत-मीराचे काय संबंध आहेत, हे दाखवले नाहीत. कित्येक वेळा कोणी विचारले; पण उत्तर नाही. मीरा घरात असताना साकेतचा प्रेमविवाह झाला. सानिकाने तेव्हाच विरोध करायला हवा होता. असेच वेडय़ासारखे अनेक भाग गेल्यावर मीराचे लग्न होते. आता तो मनोरुग्ण दाखवून प्रेक्षकांना मनोरुण करणार की काय? वरणाची डाळ गायब होऊन फक्त पाणीच दिसते आहे. तेव्हा आटोपती घ्यावी. ऐश्वर्या, अविनाश नारकर दोघेही उत्तम नट-नटी आपला वेळ कशाला फुकट घालवतात? दोघांनाही नाटकाची पाश्र्वभूमी आहे. त्यामुळे या निर्थक मालिकेत का अडकले आहेत? पैशाच्या पाठीमागे न लागता, कलेच्या पाठी लागा, हे मी सांगायला पाहिजे? त्यांच्या मुलीने पावलावर पाऊल ठेवू नये म्हणजे झाले!

‘छोटी मालकीण’ शीर्षकात काही अर्थ नाही. कुठचाही आणि कितीही कडक बाप असला, तरी आपली मुलगी नोकराच्या मुलाला देणार नाही. अशक्य गोष्टी शक्य करू नका. प्रेमविवाह असता तर गोष्ट वेगळी होती. तो श्रीधरपण फारच उदारमतवादी दाखवला आहे. नाकापेक्षा मोती जड होणार, हे त्याला कळले नाही. यालाच प्रेम आंधळे असते, असं म्हणतात का? अर्थात पुढे काय होणार माहीत नाही. पण श्रीधरच्या आईचा संताप बरोबर दाखवला आहे. असो मालिकापुराण पुरे! नाहीतर ग्रंथ व्हायचा.

स्पर्धा करा; पण ती सकारात्मक झाली पाहिजे. एकाहून एक सरस मालिका दाखवा. म्हणजे प्रेक्षक तुमच्यावर अतोनात प्रेम करतील. एखादापण भाग चुकता कामा नये, असे लिखाण व्हायला पाहिजे. मालिकेच्या वेळेला घरात हजर राहावेच लागेल. आता विठूमाऊली आणि संभाजी मालिकांची भव्यता आणि बारीक अभ्यास करून काढलेल्या मालिकांबद्दल काही बोलायचे नाही.

‘झी – युवा’वरील ‘देवा शप्पथ’ मालिका सर्व दृष्टीने (लिखाण, संवाद, कामे, दिग्दर्शन आणि कल्पना, इ. सर्व) अतिशय छान होती; पण श्लोक-कुहुचे प्रेमप्रकरण फार लांबवले आहे. श्लोकच्या आईचा हट्ट मूर्खासारखा वाटतो. सरळ वाटेवरची गाडी वाकडी गेली की ती आपटणारच कुठेतरी. पण अत्यंत आदर्श मालिका होती. पैशाचा किडा डोक्यात घुसल्यावर, त्यावर काही उपाय नाही.

निखिल साने यांनी सांगितले की आम्ही नवनवीन कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करतो. ते ठीक आहे; पण त्याबरोबर दर्जापण सांभाळा. श्रावणी देवधर भरारी घ्यायला निघाल्या आहेत. ‘शतदा प्रेम करावे’ नावीन्यपूर्ण आहे; पण परत प्रेमाचा त्रिकोण आणि खलनायक आहेच. सोज्वळ साधी मालिका होऊच शकत नाही का? प्रेक्षकांना ‘रिमोट’ हातात असल्यामुळे पटकन् वाहिनी बदलता येते; पण असे करायला आम्हाला भाग पाडू नका – ही नम्र विनंती आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्रास देऊ नका. व्यक्ती तितक्या प्रकृती असल्या तरी समतोलपणा साधण्याचा प्रयत्न करावा. दूरचित्रवाणीच्या नवीन वाहिन्यांनी खरोखर खूप मनोरंजनाची दारे उघडली आहेत. अतिरेक टाळावा.

नाचाचे कार्यक्रम तर बघवत नाहीत. लहान आणि मोठ्यांकडून वाटेल तसे करून घेतात. स्पर्धा असल्यामुळे जिवाच्या आकांडतांडवाने स्पर्धक करत असतात; ते नको वाटते. रस्सीखेच नको.
लौजन्य –  लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 5:21 pm

Web Title: marathi tv serials how to increase audience
Next Stories
1 गरोदरपणात मीरा राजपूतला होतोय ‘हा’ मनस्ताप
2 आमिरच्या ‘महाभारत’ चित्रपटात सलमान साकारणार ‘ही’ भूमिका?
3 ‘आपलं देशप्रेम व्यक्त करण्यासाठी दुसऱ्या देशाचा द्वेष करणं गरजेचं नाही’
Just Now!
X