दोन अवलियांच्या संकल्पनेतून साकारलेला चित्रपट म्हणजे मुक्काम पोस्ट धानोरी. सुदर्शन वारोळे आणि महेश राजमाने या जोडगोळीने चित्रपटाच्या निर्मितीपासून दिग्दर्शन, कथा आणि सिनेमॅटोग्राफीपर्यंत सर्वभार आपल्या खांद्यावर पेलला आहे. या चित्रपटाची कथा सरळ साधी असली तरी यात रहस्य, धाडस, थरार आणि मनोरंजन असे विविध पैलू हाताळण्यात आले आहेत. स्पेशल इफेक्ट, ३डी आणि सळसळत्या तरूणाईने भरलेला व पूर्वी कधीही न हाताळलेला विषय घेऊन हा चित्रपट येत्या काही दिवसातच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाची कथा बंडखोर तरूणी पूजा हिच्याभोवती गुंफण्यात आली असल्याने त्यासाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतलेल्या तरुणीची गरज होती. त्यासाठी नियती घाटे या नवोदित नायिकेची निवड करण्यात आली. त्याव्यतिरीक्त यशवंत बर्वे, योगेश शिंदे, देवयानी मोरे, अंकुश काणे, प्रकाश धोत्रे, प्रिया गमरे, स्वराज कदम, प्रशांत कांबळे, महेश आंबेकर, रविकिरण दीक्षित, रुपाली पाठारे या नवोदित कलाकारांना संधी देण्यात आली आहे.
मुक्काम.. ही संघर्षपूर्ण रोमांचक कथा आहे. परिस्थिती कितीही असामान्य असली तरी तिचा सामना करणारी माणसं ही सामान्यत असतात. अश्या वेळी त्यंचा कर्तुत्व मात्र असामान्य होऊन जाते. अशी परिस्थिती जेव्हा अस्तित्वाच्या लढाईचे स्वरुप घेऊन समोर उभी ठाकते त्यावेळी सामान्य माणसाजवळ धैर्य हा एकमेव मार्ग उरतो व अस्तित्वाचा बचाव हा मृत्यूच्याही पलीकडे होतो. चेतन-अचेतन किंवा प्रत्येकाच्या मनातील आत्मसंघर्ष असे वेगवेगळे संघर्ष वेगळ्या स्वरुपात चित्रपटात मांडण्यात आले आहेत. शहरी भागाबरोबर चित्रपटाला ग्रामीण बाजाचा तडका देण्यात आला आहे.