ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना व्यापून टाकणारा एक गुणी व अष्टपैलू अभिनेता आपण गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

विजय चव्हाण यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. चव्हाण यांच्या निधनावर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले, विजय चव्हाण यांना एक ताकदीचा विनोदी अभिनेता म्हणून मराठी रसिक ओळखतातच, मात्र त्याचसोबत त्यांनी गंभीर आशयाच्या भूमिकाही समर्थपणे साकारल्या. मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत, टूरटूर, हयवदन यांसारखी अनेक नाटके त्यांच्या कसदार अभिनयाने प्रचंड लोकप्रिय झाली. त्यांना विनोदाचं उत्तम टायमिंग होते चित्रपट आणि दुरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. मराठी सिनेसृष्टीच्या अलिकडच्या कालखंडातील स्थित्यंतरात चव्हाण यांनी बहुमूल्य योगदानही दिले होते. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीचे मोठे नुकसान झाले आहे.

विजय चव्हाण यांच्या निधनावर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे म्हणाले, विजय चव्हाण यांच्या निधनाने चित्रपट आणि नाटक क्षेत्राची मोठी हानी झाली असून महाराष्ट्राने अष्टपैलू अभिनेता गमावला. या कसदार अभिनयाच्या अष्टपैलू कलाकाराच्या निधनाने नाटक, चित्रपट क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.