X
X

Marathi Actor Vijay Chavan : विजय चव्हाण यांची ही इच्छा अपूर्णच राहिली

झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत, जत्रा, घोळात घोळ, आली लहर केला कहर, माहेरची साडी, येऊ का घरात यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.

Marathi Actor Vijay Chavan : गेली चार दशके आपल्या अभिनयाने मराठी रसिकांचे मन जिंकणारे विजय चव्हाण यांचे शुक्रवारी निधन झाले. विजय चव्हाण हे गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे रंगभूमीपासून दुरावले होते. पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करायचे आहे, अशी इच्छा त्यांनी चार महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात व्यक्त केली. मात्र, विजय चव्हाण यांची अपूर्णच राहिली.

दमदार अभिनयाने मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टी गाजवणारे विजय चव्हाण यांना एप्रिलमध्ये राज्य सरकारने व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. वरळी येथे पार पडलेल्या या सोहळ्यात विजय चव्हाण उपस्थित होते. आजारी असूनही ते या सोहळ्याला आले होते. विक्रम गोखले यांनी त्यांना पुरस्कार दिल्यानंतर विजय चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. मला पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करायचे आहे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली असून मराठी प्रेक्षकही एका गुणी अभिनेत्याला मुकला आहे.

जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी विजय चव्हाण व्हीलचेअरवर बसून व्यासपीठावर आले आणि उभे राहिले. चव्हाण यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थितांनी उभे राहून मानवंदना दिली होती. जीवनगौरव मिळाला असला तरी माझा प्रवास संपला नाही, प्रवास सुरूच राहणार अशी भावना चव्हाण यांनी व्यक्त केली होती.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विजय चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. मला आयुष्यात कोणतीही गोष्ट सहज मिळाली नाही. प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत करावी लागली, असे त्यांनी म्हटले होते.

विजय चव्हाण यांचे गाजलेले चित्रपट व नाटक

झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत, जत्रा, घोळात घोळ, आली लहर केला कहर, माहेरची साडी, येऊ का घरात यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. तर ‘मोरुची मावशी’ हे विजय चव्हाण यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेले नाटक होते. या नाटकात त्यांनी मोरुची मावशी अप्रतिम रंगवली या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडविला. नाटकातून आपल्या अभिनयाच पाया पक्का केलेल्या विजय चव्हाण यांनी १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वहिनीची माया’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘हलाल’ हा अलिकडेच प्रदर्शित झालेला चित्रपट बहुदा त्यांचा शेवटचा चित्रपट असावा. यात त्यांनी मुस्लिम व्यक्तिरेखा साकारली होती.

22
First Published on: August 24, 2018 10:31 am
  • Tags: marathi,
  • Just Now!
    X