सध्याचा काळ हा वेबविश्वाचा असल्याचं म्हटलं जातं. केवळ इंग्रजीच नव्हे तर हिंदी, मराठी, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये वेबसीरिजची निर्मिती होऊ लागली आहे. या वेबसीरिजची तरुणाईमध्ये क्रेझ असल्यामुळे रुपेरी पडदा गाजवणाऱ्या अनेक कलाकारांनी त्यांचा मोर्चा वेबसीरिजकडे वळविला आहे. विशेष म्हणजे यात मराठी कलाकारही मागे नाहीत. यामध्येच अभिनेता प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित बायकोला हवं तरी काय ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘बायकोला हवं तरी काय’ या सीरिजमध्ये अभिनेत्री श्रेया बुगडे मुख्य भूमिका साकारत असून अभिनेता अनिकेत विश्वासराव, निखील रत्नपारखीदेखील तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. विशेष म्हणजे ही विनोदी वेब सीरिज असल्याचं प्रदर्शित झालेल्या ट्रेलरवरुन दिसून येत आहे.

आपला नवरा सर्वगुण संपन्न असावा असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं.तसंच बायकोला हवं तरी कायमधील या गृहिणीला देखील वाटत आहे. त्यामुळेच ती श्रीकृष्णाकडे आपल्या पतीला अपग्रेड करण्यास सागते. त्याला रुबाबदार, अध्यात्मिक गुरुसारखा शांत, प्रचंड श्रीमंत करण्यास सांगते. परंतु, या सगळ्यात अनेक मजेशीर किस्से घडताना, असं प्रदर्शित झालेल्या ट्रेलरवरुन दिसून येत आहे.

“प्रत्येकाला आयुष्यात आपण अपग्रेड व्हावं असं नेहमीच वाटत. नवीन गाडीमध्ये अपग्रेड करावा अस वाटत, मोठ घर घेऊन अपग्रेड व्हावं अस वाटत… पण काय होतं जेव्हा आपण आपल्या साथीदाराला “अपग्रेड” करायला जातो तेव्हा? या कथेतून हाच हास्यवर्धक, मनोरंजनाचा कल्लोळ श्रेया, अनिकेत आणि निखिलच्या परफेक्ट टायमिंगसह गोड संदेश देत आपल्या भेटीला येत आहे आणि मला अशी आशा आहे की प्रेक्षकांना सीरिज पाहताना ही तितकाच आनंद मिळेल”, असं प्रियदर्शन जाधव म्हणाला.

“या सीरिजमध्ये मी एका सामान्य गृहिणीची भूमिका साकारत आहे. जी कायम अपग्रेड होण्याची स्वप्न पाहते. त्याचवेळी भगवान श्रीकृष्ण तिला प्रसन्न होतो आणि तिला तिच्या संसारात किंवा नवऱ्यात जे बदल अपेक्षित असतात ते करण्यासाठी मदत करतो. पण, या सीरिजमध्ये शेवटी श्रीकृष्णाचा प्रश्न पडतो की ‘बायकोला हवं तरी काय”,असं श्रेया म्हणाली.

दरम्यान, आतापर्यंत एमएक्स प्लेअरवरील समांतर, आणि काय हवं,पांडू आणि इडियट बॉक्स अशा अनेक वेबसीरिज गाजल्या आहेत. यानंतर “बायकोला हवं तरी काय” ही नवीन सीरिज येत्या ४ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज ६ भागांची आहे.