करोना विषाणूचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात सिनेमा आणि टिव्ही मालिकांची चित्रीकरणं बंद होती. अनेक कलाकार, तंत्रज्ञ आणि बॅकस्टेज आर्टीस्टनाही याचा फटका बसला. मात्र काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी दिली आहे. पुढील काही दिवसांत मराठी प्रेक्षकांसाठी त्यांच्या आवडत्या मालिकांचे नवीन भाग भेटीला येणार आहेत. तर काही वाहिन्यांवर याआधी प्रेक्षकांची पसंती मिळालेल्या जुन्या मालिका परत दाखवल्या जात आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळीची प्रमुख भूमिका असलेली, जुळून येती रेशीमगाठी ही मालिका झी युवा या वाहिनीवर पुन्हा एकदा प्रक्षेपित व्हायला लागली आहे.
या निमीत्ताने प्राजक्ताने आपल्या फेसबूक अकाऊंटवर याची माहिती देत, आपल्या सगळ्यांची इच्छाशक्ती फळाला आली असं म्हणत आनंद व्यक्त केला आहे. सध्या प्राजक्ता पाच विविध वाहिन्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे एकंदरीत आपण लॉकडाउन फळलेली कलाकार ठरल्याचं प्राजक्ताने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
जुळून येती रेशीमगाठी ही मालिका सुरू झाल्यापासून अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत गेले आणि प्रेक्षकांनी या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला. ललित आणि प्राजक्ता सोबत ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, लोकेश गुप्ते, शर्मिष्ठा राऊत यांसारखे अनुभवी कलाकार होते आणि त्यांच्या व्यक्तिरेखेने देखील प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 28, 2020 3:40 pm