भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख मिळत आहे. अनेक भारतीय चित्रपट अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, चीन यांसारख्या देशांत प्रदर्शित होत आहेत. आता तैवानमध्येही भारतीय चित्रपटांसाठी नवा मार्ग खुला झाला आहे. ‘मर्द को दर्द नही होता’ हा चित्रपट तैवानमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.

तैवानमधल्या ५५ चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एका भारतीय चित्रपटाला पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात स्क्रीन्स उपलब्ध होणार आहेत. २१ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातून ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळविलेली अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दसानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वासन बाला यांनी केले असून अनुराग कश्यपच्या ‘फॅण्टम फिल्म्स’ने चित्रपटाची निर्मिती केली आहे.

२१ मार्चला अक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपटदेखील प्रदर्शित होत आहे. अनेक चित्रपटगृह मालकांनी अक्षयच्या चित्रपटाला सर्वाधिक पसंती दिली आहे. खुद्द अभिमन्युनंपण एकाप्रकारे अक्षयच्या चित्रपटाचं प्रमोशन सोशल मीडियावर केलं आहे. मी अक्षय कुमारचा खूप मोठा चाहता आहे त्यामुळे ‘केसरी’चा फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला मी जाणार असं अभिमन्यु स्वत: म्हणाला होता. भारतात अभिमन्युच्या चित्रपटाला कमी स्क्रीन्स मिळाल्या असल्या तरी तैवानमध्ये पहिल्यांदाच हिंदी चित्रपटाला मोठ्या स्क्रीन्स मिळाल्याचं दिसून येत आहे.