एके काळी कॉमिक्स आणि कार्टून मालिकांमधून झळकणाऱ्या सुपरहिरोंचे विश्व चित्रपट माध्यमातून आता आणखीनच विस्तृत होत चालले आहे. त्यातच नवनवीन सुपरहिरोंच्या मोठय़ा प्रमाणावर झालेल्या भरतीमुळे एखाद्या कारखान्यातून जुन्या मजुरांना काढून त्या जागी ताज्या दमाच्या नवीन कामगारांची भरती करावी त्याचप्रमाणे ‘डीसी’ आणि ‘माव्‍‌र्हल’ या सुपरहिरो कारखान्यांमधून जुन्या व्यक्तिरेखांना आता निवृत्त केले जात आहे. याची सुरुवात माव्‍‌र्हलने ‘एक्स मेन’मधील ‘सायक्लॉप्स’, ‘सब्रेतोथ’, ‘आइसमॅन’, ‘टोड’ या व्यक्तिरेखांपासून केली. पुढे ‘वूल्वरीन’सारख्या पहिल्या फळीतील सुपरहिरोला त्यांनी निरोप दिला आणि आता निर्माते ‘हल्क’ला नारळ देण्याची तयारी करत आहेत. ‘हल्क’फेम लू फेरिग्नो याने ट्वीट करून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. ‘अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’नंतर ‘हल्क’ कायमचा चाहत्यांचा निरोप घेणार, असे लू फेरिग्नोने केलेले ट्वीट वाचून हल्कच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.

१९६२ साली स्टॅन ली व जॅक कर्बी यांनी निर्माण केलेल्या ‘हल्क’ने कॉमिक्स आणि कार्टून मालिकांतून जबरदस्त लोकप्रियता मिळवली; परंतु चित्रपट माध्यमात ‘हल्क’ला आपले सातत्य टिकवता आले नाही. परिणामी बरोबरीचे ‘बॅटमॅन’, ‘सुपरमॅन’, ‘वूल्वरीन’, ‘स्पायडरमॅन’, ‘आयर्न मॅन’ हे सुपरहिरो एकामागून एक मोठे होत असताना ‘हल्क’ मात्र तिथेच राहिला.

निर्मात्यांनीही ‘द इनक्रेडिबल हल्क’ ही चित्रपट मालिका तयार करून त्याला पुढे आणण्याचा जोरदार प्रयत्न केला; परंतु पटकथेत जोरच नसल्यामुळे त्यांना प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. निर्मात्यांना मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यात तो काही प्रमाणात ‘अ‍ॅव्हेंजर्स’ मालिकेतून चमकला; परंतु त्याची चमक ‘आयर्न मॅन’, ‘कॅप्टन अमेरिका’, ‘थॉर’ यांच्यापुढे काहीशी फिकी पडली. म्हणूनच येत्या ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ या चित्रपटात ‘हल्क’चा शेवट केला जाणार असा कयास लावला जात आहे.