अर्जुन कपूर सध्याच्या बॉलीवूडमधील तरुण अभिनेत्यांमधलं वेगळं असं व्यक्तिमत्त्व आहे. त्याला वेगळं म्हणण्याचं कारण म्हणजे तो स्वत:चे निर्णय स्वत: घेतो. त्यामुळे चित्रपटांमध्ये असो किंवा वैयक्तिक जीवनात तो यश-अपयशाचं खापर इतर कोणावर फोडत नाही. दहा वर्षांचा असताना दिग्दर्शक होण्याचा त्याने घेतलेला निर्णय, त्यानंतर योग्य वळणावर अभिनेता होण्याचा निर्णय घेत त्यासाठी केलेले अतोनात कष्ट या साऱ्यातून बॉलीवूडमधील तथाकथित घराणेशाहीपासून दूर राहण्याचा त्याचा आग्रह दिसून येतो. ‘इशकजादे’ ते ‘इंडियाज मोस्ट वाँटेड’पर्यंतच्या प्रवासाकडे तटस्थ पाहणारा अर्जुन कपूर सांगतोय, सध्याच्या बदलत्या मनोरंजन क्षेत्राविषयी..

समकालीन अभिनेत्यांच्या तुलनेत समाधानकारक यश मिळालं आहे का? यावर अर्जुन कपूर म्हणतो, मी  निर्माता-दिग्दर्शक-कलाकार असं सगळं घरच फिल्मी लोकांनी भरलेल्या घरात लहानाचा मोठा झालो. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंत तुमचा चित्रपट चित्रपटगृहात चांगल्या प्रकारे टिकला, तर तो पुढे यशस्वी होतो आणि नाही टिकला तर काय होतं, या सगळ्या गोष्टींतून मी गेलो आहे. घरात कायम चित्रपटाशी संबंधित चर्चा व्हायची. चित्रपटांचा ट्रेंड काय आहे. कुठल्या प्रकारचे चित्रपट यशस्वी होत आहेत.  त्याविषयी सतत विचारविनिमय घरात सुरू असायचा. चित्रपट व्यवसायाशी संबंधित मासिकं , बातम्या वाचायचो. मनोरंजन क्षेत्रात काय चाललंय, त्याकडे नेहमी लक्ष असायचं. मी निर्मात्याचा मुलगा आहे. सिनेसंस्कृती माझ्या घरात नांदते आहे, पण मी या क्षेत्रात आल्यावर मला फक्त अभिनयच करायचाय किंवा दिग्दर्शनच करायचंय अशी परिस्थिती आज राहिलेली नाही. आजची बॉलीवूडमधील पिढी, निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय अशा विविध बाजू एकाच वेळेस प्रयोगशीलपणे करू शकते. त्यामुळे यश-अपयशापेक्षा मी योग्य-अयोग्य काय याकडे लक्ष देत आलो आहे, असं अर्जुनने सांगितलं.

आठवणींमध्ये रमताना अर्जुनने आपल्या आधीच्या दिवसांविषयी सांगितलं. तो म्हणाला, दहावीत असतानाच मला दिग्दर्शन करायचं आहे, यावर मी ठाम होतो. तेव्हा अभिनेता व्हायचं अजिबात डोक्यात नव्हतं. परंतु एकदा सलमान खानशी भेट झाली. आणि त्यांनी माझा विचार बदलला. त्याने मला पहिल्यांदा जाणीव करून दिली की तू दिग्दर्शक कधीही होऊ  शकतोस, पण आता अभिनेता म्हणून पुढे नाही आलास तर नंतर तुला अभिनेता म्हणून वावरण्याची संधी मिळणार नाही, असं त्याने सांगितलं होतं. त्यानेच मला मी अभिनेता होऊ शकतो, असा विश्वास दिल्याचंही त्याने सांगितलं.

‘इंडियाज मोस्ट वाँटेड’ या आगामी चित्रपटासाठी तू स्वत: किती संशोधन केलंस तुझ्या भूमिकेसाठी.. याबद्दल बोलताना तो म्हणाला, जेव्हा लेखकच दिग्दर्शक असतो तेव्हा त्यांनीच स्वत: त्यावर खूप संशोधन केलेलं असतं. राजकुमार गुप्ता त्यांचे चित्रपट स्वत: लिहून दिग्दर्शित करतात. त्यामुळे त्यांनी माझ्या भूमिकेसाठी आवश्यक ते सगळं संशोधन केलं होतं, कारण त्यांनी मला सांगितलं की आयबी ऑफिसर (गुप्तचर यंत्रणा अधिकारी) हे दिसताना सामान्यच दिसतात, पण त्यांची कामगिरी असामान्य असते. ते मला माझ्या भूमिकेतून दाखवायचं होतं. एखाद्या मिशनवर असताना त्यांची विचारप्रणाली कशी असते. त्याचं निरीक्षण करण्यासाठी मी काही अधिकाऱ्यांना भेटलो, असंही अर्जुनने सांगितलं.

या चित्रपटाच्या निमित्ताने तू पहिल्यांदाच वास्तववादी विषयावरच्या चित्रपटात काम करतो आहेस, असं म्हटल्यावर त्याने हा मुद्दाच पटत नसल्याचं स्पष्ट केलं.  याआधी मी ‘औरंगजेब’ चित्रपट केला होता, त्यातही माझी वास्वतवादी भूमिकाच होती. ‘इशकजादे’मध्येही वास्तववादी चित्रण होतं. तशा सर्वच भूमिका मला चांगल्या आणि वास्तवाशी जोडलेल्या अशाच होत्या, त्यात अतिरंजितपणा नव्हता, असं त्याने सांगितलं.

यासीन भटकळ प्रकरणावर भाष्य करताना तो म्हणाला, ४०० निरपराध लोकांची हत्या करण्याएवढं क्रूर कृत्य करूनही तो गुन्हेगार आहे की नाही, यावरच आपण अजूनही फक्त चर्चा करत बसतो. हे सगळं बघून माझं रक्त उसळतं. सगळे पुरावे, साक्षीदार असूनही तो स्वत:ला न्यायालयासमोर मी निर्दोष आहे, असं सांगतो. या सगळ्याबद्दल चीड येते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे माझी न्यायव्यवस्थेला विनंती आहे की त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा द्यावी. अशा गुन्हेगारांवर चर्चा करण्यापेक्षा भारतीयांनी आपल्या शूर सैन्याच्या, पोलीस यंत्रणेतील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या शौर्यगाथा जास्तीत जास्त सांगितल्या पाहिजेत, असं मत अर्जुनने व्यक्त केलं. ‘इंडियाज मोस्ट वाँटेड’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे, मात्र समाजात कुठलीही नकारात्मक भावना वाढीला तो प्रोत्साहन देत नाही. कुठल्याही धर्माच्या विरोधात तो नाही, हेही त्याने स्पष्ट केलं.

हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे यात त्याला हिरॉइन-नाचगाणी असा टिपिकल बॉलीवूडी चित्रपटाचा तामझाम नाही. याचा उल्लेख करताच तो हसून म्हणतो, मी असा विचार केला तर ते लहान मुलांसारखं होईल. केक मिळाला नाही तर मी पार्टीला येणार नाही असं म्हणण्यासारखं आहे ते. राजकुमार गुप्ता यांनी अतिरंजित पद्धतीने न मांडता त्या कथेला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्यानेच नाचगाणी, नायिकेचे दिलासादायक भावनिक संवाद असं काही यात नाही आहे, असंही त्याने सांगितलं.

यानिमित्ताने बदलत्या मनोरंजन क्षेत्राविषयीही त्याने अचूक निरीक्षण नोंदवलं. आता मसाला चित्रपटांचा काळ राहिलेला नाही. आता पठडीबाहेरचे विषय येत आहेत आणि नवोदित अभिनेतेही प्रयोग करून पहायला लागले आहेत. आता नायक-नायिकेपेक्षा कथा महत्त्वाची ठरते आहे. त्यातल्या व्यक्तिरेखा लोकप्रिय होतात. कारण प्रेक्षक कथा काय आहे, ते पाहून चित्रपट पाहायला येतात. त्यामुळे व्यक्तिरेखांकरवी तुम्ही कुठली गोष्ट सांगताय हे पाहिलं जातंय. माझ्या पहिल्या चित्रपटापासून याचा प्रत्यय आल्याचं तो म्हणतो. बॉलीवूड अभिनेता म्हणून एकाच वेळी रोमान्स, अ‍ॅक्शन आणि संवेदनशील चित्रपटही करायचे आहेत असं तो म्हणतो. सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी लोकप्रिय व्यावसायिक चित्रपटही करावे लागतातच, असं तो सांगतो. अनुभवातून शिकत राहण्यावर त्याचा विश्वास आहे. तो म्हणतो, माझ्या आजवरच्या प्रवासात मी केलेल्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी मला स्वीकारलंय हे पाहिलं आहे. गेल्या सात वर्षांत मी हेही अनुभवलंय की प्रेक्षक आता टाइमपास, पैसा वसूल करण्यासाठी चित्रपट पाहायला येत नाहीत. तो काळ गेला आहे. आता प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबरच, शिक्षण, विचार करायला लावणारा, माहितीपूर्ण तसेच जिवंत अनुभव देणारा चित्रपट पाहायला आवडतो. त्यामुळे यापुढच्या काळात कलाकार म्हणून तसेच चित्रपट करण्यावर त्याचा भर राहील, हेही त्याने ठामपणे सांगितलं.

मला प्रत्येक चित्रपटात काम करताना त्या त्या पटकथेत उत्सुकता वाढवणारं काहीतरी सापडलं होतं. त्यामुळे त्या भूमिका करताना मजा आली. एखादी भूमिका मी करू शकेन किंवा नाही, याबद्दल मी ठामपणे कधी तरी भूमिका घेऊ शकत नाही. मात्र एखाद्या दिग्दर्शकाला माझ्यात अमुक एक व्यक्तिरेखा साकारण्याची क्षमता दिसली आणि त्याने मला तसा विश्वास दिला तर मी त्यासाठी प्रचंड मेहनत घेतो. ऐतिहासिक भूमिका साकारण्याची माझी खूप इच्छा होती. त्याच दरम्यान ‘पानिपत’मधील सदाशिवरावभाऊंची भूमिका तू साकारू शकतोस असा विश्वास आशुतोष गोवारीकर यांनी मला दिला. तोपर्यंत मला विश्वासच बसत नव्हता. विशिष्ट  प्रकारच्या मिश्या आणि डोक्यावरील केसांशिवाय मी कसा दिसेन, अशी कधी कल्पनासुद्धा केली नव्हती. मराठी मला उत्तम बोलता येतं, पण या भूमिकेत प्रभावी संवाद हवेत म्हणून मी मराठीत बोलण्याचा अधिक अभ्यास करतो आहे. ‘पानिपत’मध्ये काम करतो आहे हे समजल्यापासून लोक अत्यंत आपुलकीने माझ्याशी संवाद साधतायेत, त्यामुळे हा किती जिव्हाळ्याचा विषय आहे हे सहज लक्षात येतं. चित्रपट बनण्याआधीच लोकांचं प्रेम मिळायला लागलं आहे त्यामुळे अधिक ऊर्जा मिळते आहे.    – अर्जुन कपूर