क्रिकेटच्या मैदानावर ‘स्ट्रेट ड्राइव्ह’ आणि ‘कव्हर ड्राइव्ह’ मारणारा सचिन तेंडुलकर आता रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. सर्वसामान्य कुटुंबातील एका मुलापासून सुरु झालेल्या प्रवासापासून देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान होण्याच्या त्या अदभूत क्षणापर्यंतचा त्याचा प्रवास ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

२६ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण, चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी खास स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलंय. या स्क्रिनिंगसाठी सचिनने खास निमंत्रण पत्रिकाही डिझाईन करुन घेतल्या होत्या. निमंत्रण पत्रिकेची संकल्पना आणि चित्रपटाचं कथानक यांची सुरेख सांगड घालत ‘रविश कपूर इन्व्हिटिशन्स’तर्फे ही निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली आहे.

सचिनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलेली ही निमंत्रण पत्रिका कोणकोणत्या सेलिब्रिटींना मिळणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती. हीच उत्सुकता जास्त न ताणता काही सेलिब्रिटींनी ट्विटरवरुन ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’चं तिकीट म्हणजेच निमंत्रण मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. यामध्ये गायिका श्रेया घोषाल, अभिनेता रणदीप हुडा, नवोदित अभिनेत्री सैय्यामी खेर, अदिती राव हैदरी या सेलिब्रिटींचा समावेश आहे. तेव्हा आता क्रिकेटमधील विक्रमवीराच्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगांचं साक्षीदार होण्यासाठी कलाकार मंडळीही सज्ज झाली आहेत, असंच म्हणावं लागेल.