मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे चापेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी या पुरस्काराची पुण्यात घोषणा केली. या वर्षी या पुरस्काराचे ७७ वे वर्ष आहे. मागील अनेक वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने हा मानाचा पुरस्कार दिला जातो. कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.

हा पुरस्कार सोहळा एप्रिल महिन्यात पार पडणार असून पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात प्रदान करण्यात येणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. सुचेता भिडे चापेकर या शास्त्रीय नृत्यांगना असून त्या नृत्य दिग्दर्शिका आहेत. ६ डिसेंबर १९४८ रोजी प्रतिष्ठित घरात सुचेताताईंचा जन्म झाला. त्यांचे बालपण मुंबई येथे गेले. मुलीची नृत्यातली गती आणि आवड बघून स्वतः चित्रकार असलेल्या वडिलांनी त्यांना नृत्य शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. गुरु पार्वतीकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे अरंगेत्रम १९६३ साली वयाच्या १५व्या वर्षी झाले. पार्वतीकुमारांच्या नृत्य कार्यक्रमातून त्यांचा सक्रिय सहभाग असे. त्याचप्रमाणे गुरूंच्या भरतनाट्यम नृत्यातील तंजावर येथील मराठी राजांच्या योगादानाविषयीच्या अभ्यासातही सुचेताताई त्यांच्या साहाय्यक होत्या.