तसं पाहिलं तर कथानक अगदीच सरळसाधं. फार काही प्रचंड मोठय़ा घडामोडी वगैरे असं काही येथे घडत नाही. आजच्या काळाला धरून रेखाटलेलं चित्र, फार स्वप्नरंजन नाही की अतिवास्तववादी वगैरेपण नाही. अशा कथेला पडद्यावर फुलवत नेणे तेदेखील वेब सिरीजच्या माध्यमातून हे नक्कीच आव्हानात्मक ठरते. त्यातून फार काही असाधारण कलाकृती वगैरे निर्माण करायची आहे असंदेखील जाणवत नाही. एका मध्यमवर्गीय तरुणाची कथा मांडायची, जोडीला आजच्या काळाचे प्रतिबिंब उमटेल याचं भान ठेवायचे इतपतच मर्यादित आशय मांडणारी वेब सिरीज म्हणजे ‘नेटफ्लिक्स’वरील ‘मास्टर ऑफ नन’.

अझिज अन्सारी याची ही वेब सिरीज सध्या बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. दोन सीझनच्या २० भागांमध्ये अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका तरुणाची देवची ही कथा आहे. देव हा जन्मला अमेरिकेतच, साहजिकच त्याच्यावर तेथील संस्कृतीचा प्रभाव आहे. पोटापाण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये काम करायचे, एखाद्या टीव्ही शोचे अँकरिंग करायचे हा त्याचा व्यवसाय. आणखीन एक अशियाई वंशाचा मित्र, एक धिप्पाड असा अमेरिकन मित्र आणि एक मैत्रीण हे त्याचे मित्रमंडळ. आईवडील त्याच शहरात राहणारे, पण हा त्यांच्यात फारसा न गुंतलेला. जाहिराती अथवा टीव्ही शोच्या पलीकडे जाऊ न त्याला चित्रपटात काम हवे असते, पण तशी संधी काही मिळत नसते. परिणामी थोडे नैराश्य असतेच. वयानुसार त्याला मुलींबरोबर फिरावे, डेटिंग करावे आणि जीवनसाथी निवडावी अशीदेखील इच्छा असते. त्याचे डेटिंगदेखील सुरू असते. पण लग्न करायचे की असेच जगत राहायचे याचे उत्तर त्याला सापडलेले नसते. त्यातच तो स्वत:च्या करिअरमध्येदेखील अनेक प्रयोग करत असतो. पण या सर्वातून त्याचा त्याला तो सापडतो का हा खरा प्रश्न आहे.

हे सारे कथानक कमीअधिक प्रमाणात सर्वत्रच पाहायला मिळते. पण तरीदेखील या वेब सिरीजकर्त्यांनी मोठय़ा खुबीने काही प्रसंगांची पेरणी या २० भागांमध्ये केली आहे. अगदी सहज म्हणून येणारे हे प्रसंग भाष्यकारी ठरतात. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण काहीतरी असाधारण दाखवत आहोत हा आविर्भाव त्यामध्ये नाही. त्याचबरोबर भारतीय वंशाच्या नायकाशी निगडित कथानक असल्यामुळे आपसूकच वर्णभेदावरील भाष्य त्यातून घडून येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपूर्णपणे आजच्या काळाशी सुसंगत असेच वर्तन सर्व पात्रांकडून घडताना दिसते.

या सर्वासोबत एक बाब अतिशय ठळकपणे मांडली आहे ती म्हणजे एकूणच कुटुंबव्यवस्थेवर केलेले भाष्य. विशेष म्हणजे हे भाष्य करताना जुने ते चांगले आणि आजचे वाईट अशी भूमिका न घेता अतिशय सहजपणे असे अनेक प्रसंग येत जातात. त्यातून बोध काय घ्यायचा याचा निर्णय त्याने प्रेक्षकांवर सोडला आहे. त्यात अगदी वृद्धांच्या प्रश्नापासून ते लहान मुलांच्या बाबतीतील प्रसंगांचा समावेश आहे. एक संपूर्ण भागच लेखकाने केवळ डेटिंगवर बेतला आहे. अप्रतिम संकलनाच्या आधारे हा पूर्ण भाग प्रभावी झाला आहे. आजच्या पिढीचे एक सर्वसमावेशक प्रतिबिंब मांडणारा हा भाग सिरीजमध्ये ज्या टप्प्यावर येतो तो टप्पादेखील अतिशय जाणीवपूर्वक निवडला आहे.

भारतीय सांस्कृतिक मनाला ही वेब सिरीज काही प्रमाणात न झेपणारी वाटू शकते. कारण अजूनही विवाहसंस्था नामक प्रकाराचे आपल्या समाजाला आकर्षण आणि बंधन अपेक्षित असते. तेथे हा मुक्त व्यवहार कदाचित खटकू शकतो. पण या सिरीजमधले प्रसंग हे स्वैराचाराचे नाहीत. किंबहुना तथाकथित चौकटीत न अडकता जे आहे ते खुसखुशीतपणे मांडले आहे.

बऱ्याच वेळा ही वेब सिरीज कंटाळवाण्या सदरात मोडणारीदेखील वाटू लागते. विशेषत: सिरीजचा दुसरा सीझन हा बराच कंटाळवाणा ठरतो. तुलनेने पहिल्या सीझनमध्ये अनेक गोष्टी घडतात. दुसऱ्या सीझनमधील ठरावीक भाग सोडले तर कथानक फारसे वेग घेत नाही. आणि सिरीजकर्त्यांना तिसरा सीझनही अपेक्षित आहे असे दिसते. एकंदरीत पाहता ही सिरीज काही खूपच चाकोरीबाहेची नसली तरी एक विरंगुळा म्हणून पाहायला हरकत नाही. आणि ‘नेटफ्लिक्स’वरील इतर सिरीजच्या तुलनेत याचा कालावधीदेखील मर्यादित असल्यामुळे फार वेळ वाया गेला अशी प्रेक्षकांची भावना होत नाही.