07 March 2021

News Flash

चित्र रंजन : जमता जमता राहिलं की..!

आपलं सगळंच लय भारी.. म्हणत तुफान हाणामारी करणारा ‘माऊली’ मराठी पडद्यावर प्रेक्षकांनी पहिल्यांदाच पाहिला होता.

(संग्रहित छायाचित्र)

रेश्मा राईकवार

माऊली

आपलं सगळंच लय भारी.. म्हणत तुफान हाणामारी करणारा ‘माऊली’ मराठी पडद्यावर प्रेक्षकांनी पहिल्यांदाच पाहिला होता. ‘माऊली’ची ही पहिलीच भेट लोकांच्या पसंतीस उतरली आणि त्यांनी त्याला भारी डोक्यावरही घेतले. त्यामुळे पुन्हा एकदा ‘माऊली’ नावानेच रितेश देशमुख प्रेक्षकांसमोर येणार म्हटल्यावर हा पहिल्या चित्रपटाचा सिक्वल आहे हाच तर्क साहजिकपणे प्रेक्षकांनी लावला. पण इथे नावातही माऊली आहे, चेहराही रितेशचाच आहे आणि त्याच्या हातातही वीट आहे. मात्र ‘लय भारी’ चित्रपटाचा प्रभाव घेऊन आलेला हा चित्रपट एकतर सिक्वल नाही. आणि सिक्वल नसल्याने स्वतंत्र गोष्ट म्हणून पाहायला गेलात तरी जिथे तिथे तुम्हाला लय भारीचाच संदर्भ आठवतो. त्यामुळेच की काय धड इथे ना तिथे या गोंधळात टाकणारा हा चित्रपट मसाला पद्धतीच्या मनोरंजनात मात्र कमी पडलेला नाही.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपल्याला वीट घेऊन गुंडांना जेरीस आणणारा माऊली दिसतो. इथूनच ‘लय भारी’च्या प्रभावाला सुरुवात होते. लगोलग होळीचे गाणे येते आणि पहिल्या चित्रपटाप्रमाणेच गाण्यापुरती जेनेलिया देशमुखचा चेहरा दिसतो. त्यामुळे ‘लय भारी’चेच कथासूत्र आपल्या मनात घोळत राहते. कापूरगावात पोलीस इन्स्पेक्टर म्हणून नव्याने आलेला माऊली सर्जेराव देशमुख (रितेश देशमुख)आणि वरवर शांत दिसणाऱ्या गावात पाण्याचा टँकर, दारू असे सगळे गैरधंदे करत वर्चस्व राखून असलेला नाना (जितेंद्र जोशी) यांच्यातला संघर्ष म्हणजे हा चित्रपट आहे. एकूणच अ‍ॅक्शनपटांना जशी गोष्ट आवश्यक असते तशीच ती इथे घडते. या गोष्टीत एक चांगला माणूस असतो जो नायक असतो आणि दुसरा खूप वाईट माणूस असतो जो खलनायक असतो. चांगल्या-वाईटाच्या गोष्टीत नेहमी चांगलेच जिंकते. फक्त खलनायकाला संपवताना हिंदी चित्रपटातही आपला नायक आधी खूप मार खाऊन घेतो. त्याच पद्धतीने इथेही नायक खूप मार खातो आणि शेवटी विठू माऊलीच्या मदतीने गावाला ‘नाना’ वाईटातून मुक्त करतो. मग या चित्रपटात नावाला का होईना नायकाला नायिका हवी, इथे ती रेणुकाच्या म्हणजेच अभिनेत्री सयामी खेरच्या रूपात पाहायला मिळते. एक भाऊ, मित्र नाहीतर कुणीतरी निष्ठावान लागतो. इथे तेही घटक पुरेपूर वापरले आहेत. त्यामुळे पठडीपलीकडे जाणारे असे या अ‍ॅक्शनपटात काही नाही. किंबहुना, ‘लय भारी’ चित्रपटात हे पाहून झालेय की ही भावना मनात घर करते.

मुळात, ‘लय भारी’ आणि ‘माऊली’ या दोन्ही चित्रपटांची तुलना करणे योग्य होणार नाही. कारण दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक वेगळे आणि त्यामुळे त्यांची मांडणीही भिन्न आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘माऊली’ चित्रपटात रितेश देशमुखची हाणामारी अगदी हिंदी चित्रपटाबरहुकूम झाली आहे. त्यासाठी केलेली कथा आणि पात्रांची रचनाही योग्य असली तरी चित्रपटात कथा पुढे नेण्यासाठी जो विठुरायाच्या भक्तीचा आधार घेतला गेला आहे. आणि बंधूप्रेमाचा जो चमत्कार साधला आहे तो हिंदीत कित्येकदा पाहून पाहून लोक थकले आहेत. त्यामुळे त्यात नवे काहीच नाही. नाही म्हटले तरी चराचरात माऊली आहे या तत्त्वाचा पटकथाकार क्षितिज पटवर्धन यांनी पात्रनिर्मितीत चांगला वापर करून घेतला आहे. अशा काही संकल्पना, काही अ‍ॅक्शन सिक्वेन्स फार चांगले जमून आले आहेत. मात्र काही तांत्रिक करामती अगदी उघडय़ा पडल्या आहेत. सरपोतदार यांच्या चित्रपटात वेगळाच चेहरा खलनायक म्हणून समोर येतो. इथे तो खूप दिवसांनी जितेंद्र जोशीच्या रूपात आला आहे. जितेंद्रने लुक आणि अभिनय दोन्ही आघाडय़ांवर नानाच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.  रितेश देशमुख इथेही माऊली आणि माऊलीच्या (हे काय कोडे आहे ते चित्रपट पाहिल्यावरच उमगेल) भूमिकेत भारी ठरला आहे. सयामीला रेणुकाच्या भूमिकेत फार करण्यासारखे काही नाही. तिचा वावर सहज आहे. सिद्धार्थ जाधवलाही मोठी भूमिका नसली तरी त्याचे असणे आनंददायी आहे. अजय-अतुल यांचे संगीत असलेले ‘माझी पंढरीची माय’ हे गाणे संपूर्ण चित्रपटभर सुंदररीत्या गुंफण्यात आले आहे. एकूणच अभिनय आणि तंत्राच्या बाबतीत चित्रपट भारी असला तरी तो लय भारी आहे म्हणता येत नाही.

* दिग्दर्शक – आदित्य सरपोतदार

*  कलाकार – रितेश देशमुख, सयामी खेर, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, उषा नाईक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 2:08 am

Web Title: mauli marathi movie review
Next Stories
1 ‘दिसतं तसं नसतं’, सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज
2 दीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..
3 अभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण
Just Now!
X