मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीत एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित झाले, तर त्या दोनपैकी एका चित्रपटाचे मरण नक्की असते. मात्र नाटकाचा प्रयोग हा एकाच शहरात होणार असल्याने एकाच दिवशी आपापली नाटके रंगभूमीवर आणण्याचे धाडस नाटय़निर्माते करू शकतात. त्यामुळे या शनिवारी दोन वेगवेगळी नाटके मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नाटय़सृष्टीत मानाचे स्थान असलेल्या ‘श्री चिंतामणी’ या संस्थेच्या ‘मायलेकी’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवारी दुपारी साडेचार वाजता ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात होणार आहे. तर ‘रंगमंच व रंगनील’ या संस्थेची निर्मिती असलेल्या ‘प्रपोझल’ या नाटकाचा पहिला प्रयोग वाशीच्या विष्णुदास भावे नाटय़गृहात शनिवारी रात्री रंगणार आहे.
‘जोगवा’, ‘पांगिरा’, ‘७२ मैल’ अशा एकापेक्षा एक सरस, सकस आणि आशयघन चित्रपटांचे लेखन करणाऱ्या संजय कृष्णाजी पाटील यांनी ‘मायलेकी’ या नाटकाचे लेखन केले आहे. विशेष म्हणजे कारागृहाच्या पाश्र्वभूमीवर रंगणारे हे कौटुंबिक व सामाजिक नाटक लिहिण्यासाठी त्यांनी तब्बल दोन वर्षे अभ्यासही केला आहे. प्रस्थापित व्यवस्था आणि त्याविरोधात झगडणारी एक महिला तुरुंग अधीक्षक, त्या महिला अधिकाऱ्याचा कौटुंबिक संघर्ष आणि तिला लाभलेली आईची साथ या विषयावर हे नाटक भाष्य करणार आहे. नाटकाचे दिग्दर्शक कुमार सोहनी यांनी केले असून यात अमिता खोपकर, शर्मिष्ठा राऊत, किरण खोजे, किरण माने, डॉ. विलास उजवणे आदी कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. कारागृहाचे लक्षवेध आणि आगळेवेगळे नेपथ्य राजन भिसे यांचे आहे.
आपल्या पहिल्याच जाहिरातीने लोकांचे लक्ष वेधून घेतलेल्या ‘प्रपोझल’ या नाटकाचे लेखन सुरेश चिखले यांनी केले आहे. रंगमंच व रंगनील या संस्थांची निर्मिती असलेल्या नाटकाचे दिग्दर्शन राजन ताम्हाणे यांचे आहे. हे संपूर्ण नाटक रात्रीच्या शेवटच्या लोकल ट्रेनमध्ये घडत असल्याने प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य हे या नाटकाचे आकर्षण ठरेल. शेवटच्या ट्रेनमध्ये चढलेली एक स्त्री आणि एक पुरुष यांचे संभाषण कोणत्या मार्गावर जाते, त्या रात्री दोघांच्याही आयुष्याला कलाटणी देणारा कोणता प्रसंग घडतो, त्यातून दोघेही कसे पुढे जाताता याचे सुरेख चित्रण या नाटकात असल्याचे दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले.