‘खुलता कळी खुलेना’ सारखी मालिका असो किंवा ‘डियर आजो’ सारखं नाटक, अभिनेत्री मयुरी देशमुखने कायमच आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आज, १६ जून म्हणजे ‘फादर्स डे’ निमित्त अनेक कलाकार त्यांच्या वडिलांविषयी खास भावना व्यक्त करत आहेत. अभिनेत्री मयुरी देशमुखनेही तिच्या वडिलांसोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

मयुरी म्हणाली की, “माझ्यासाठी माझे बाबा म्हणजे एक जादूगारच आहेत. लहानपणापासूनच त्यांनी आम्हाला मोठे केले, आमच्यावर जे संस्कार केले, आम्हाला काय हवे काय नको ते सर्व त्यांनी पाहिले. नुसते लाड नाही केले तर, चांगल्या वाईट सर्वच गोष्टी त्यांनी अगदी योग्य पद्धतीने आम्हाला समजून सांगितल्या. माझे बाबा आमच्यासाठी एक आदर्श बाबा आहेत. आज माझे जेव्हा जेव्हा कौतुक होते तेव्हा मी त्याचे श्रेय माझ्या वडिलांनाच देते. बाबांमुळे मला खूप चांगल्या सवयी लागल्या. त्यातलीच एक सवय म्हणजे माणसं जमा करण्याची. या सवयीमुळे मी लोकांच्या बाबतीत खूप श्रीमंत आहे. इतकी माणसं मी जमवली आहे. त्यासाठी मी त्यांची कायमच ऋणी आहे.”

मयुरीने तिच्या लग्नाच्या आठवणींनाही यानिमित्ताने उजाळा दिला. तिने सांगितलं की, “माझ्या लग्नाच्या वेळेस घरात खूप कल्ला असायचा. यातही माझे बाबा अगदी काळजीपूर्वक आणि नीटनेटक्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळत होते. बाबांच्या अशा छोट्या, मोठ्या अगणित आठवणी माझ्या लक्षात आहेत. माझे बाबा फक्त मी किंवा माझ्या परिवारापुरतेच मर्यादित नाहीयेत. त्यांचे मित्र, आमचे सर्व नातेवाईक, शेजारचे सगळ्यांसाठीच बाबा नेहमी मदतीसाठी तयार असतात. बाबांनी आमच्यासाठी अविरत कष्ट केले पण,आता वेळ बदलली आहे. त्यांनी त्यांचे सर्व कर्तव्य अगदी योग्य रितीने पार पाडले आहे. म्हणूनच बाबांनी आता खूप आराम करावा, त्याच्या ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत त्यांनी त्या सर्व गोष्टी आता कराव्या आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. ही माझी इच्छा आहे.”