21 January 2021

News Flash

“मी खूप अस्वस्थ झाले, पण..”; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ

मयुरी म्हणाली, "..अशी बुरसटलेली व्याख्या आपल्यासाठीच घातक ठरतेय."

वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी सोमवारी सकाळी विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येची बातमी ऐकल्यापासून मी खूप अस्वस्थ झालेय, असं म्हणत अभिनेत्री मयुरी देशमुखने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे याने नैराश्यातून आत्महत्येचं पाऊल उचललं होतं. या दोन्ही घटनांबद्दल मयुरी मनमोकळेपणाने या व्हिडीओत व्यक्त झाली.

काय म्हणाली मयुरी?

“शीतल आमटेंच्या आत्महत्येची बातमी ऐकल्यापासून मी खूप अस्वस्थ झालेय. त्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे काही आठवड्यांपूर्वी त्यांनी फेसबुकवर मला मेसेज केला होता. त्यांनी मला खूप धीर दिला होता, माझा फोन नंबर घेतला आणि त्यांचासुद्धा नंबर मला दिला. माझ्यासाठी त्या खंबीरपणे उभ्या आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. आमची अजिबात ओळख नसतानाही त्यांनी माझ्यासाठी हे सर्व केलं. दुसरं म्हणजे काही महिन्यांपूर्वी ताईंचा एक व्हिडीओ मी पाहिला होता. त्यात त्यांनी विविध कलेच्या माध्यमातून डिप्रेशनचा सामना कसा केला ते दाखवलं होतं. तो व्हिडीओ मी आशूलाही दाखवला होता. आम्हां दोघांनाही तिचं खूप कौतुक वाटलं होतं.

शीतल आमटेंच्या जाण्याने खूप त्रास होतोय. मला माहीत नाही माझी मतं बरोबर आहेत की चुकीची, पण आज मी त्याबद्दल नक्की बोलेन. एक समाज म्हणून आपण ताकद आणि सहनशीलता या व्याख्यांना खूप चुकीच्या पद्धतीने मांडलंय. मुलांनी रडलं नाही पाहिजे, सगळी संकटं एकट्याने पेलली पाहिजेत, समाजातल्या मोठ्या व्यक्तींवरही हा भार आपण टाकतो. पण ते बदलणं खूप गरजेचं आहे. अशी बुरसटलेली व्याख्या आपल्यासाठीच घातक ठरतेय.

आशुतोष गेल्यानंतर मला अनेकांनी मेसेज केले की तू खूप धीरानं घेतलंस. पण मी तर रोज रडतेय, रोज मला त्रास होतोय. मग मी स्ट्राँग कशी? पण मी माझ्या जवळच्या व्यक्तींना माझ्या मनातलं सर्वकाही सांगतेय. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा तरी असा व्यक्ती असावा, की ज्याला आपण कसलाही विचार न करता सर्वकाही सांगू शकतो. शेअर करणं सध्या खूप गरजेचं आहे. शेअर न केल्यास त्या गोष्टी मनात साचून राहतात आणि नंतर वाटच सापडत नाही. कुणाचीही मदत मागण्यात काही चुकीचं नाही. यात स्वाभिमान कुठेच मध्ये येत नाही. पण खरा संवाद साधण्याची गरज आहे. मला सोशल मीडियाचीही ताकद समजली. सोशल मीडियावरील ९९ टक्के मी लोकांना ओळखत नाही. पण सगळ्यांनी असंख्य मेसेज केले. तीच ऊर्जा घेऊन मी पुन्हा काम करतेय. पण समाज म्हणून आपण काही बदल केले तर असे मौल्यवान जीव भविष्यात गमावणार नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2020 1:57 pm

Web Title: mayuri deshmukh posted video after dr sheetal amte suicide ssv 92
Next Stories
1 ‘बजरंगी भाईजान’मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो
2 अमित साध करतोय किमला डेट? अभिनेता म्हणाला, ‘कॉफी घेताना भेटलो अन्..’
3 ‘…ती माझी सगळ्यात मोठी चूक होती’, प्रियांकाने केला खुलासा
Just Now!
X