20 September 2020

News Flash

चित्र रंजन : पोरकट खेळ सारा

रायबाने आडदांड नाजूकाला पहिल्यांदा पत्नी म्हणून नाकारणे आणि नंतर सहवासातून वाढत गेलेल्या प्रेमातून झालेला तिचा सहजस्वीकार हा त्यातला महत्त्वाचा धागा होता.

(संग्रहित छायाचित्र)

रेश्मा राईकवार

‘माझा अगडबम’

एका चित्रपटाची संकल्पना यशस्वी ठरल्यावर तब्बल आठ वर्षांनंतर त्याच विषयावर चित्रपट आणताना त्याला काहीएक ठोस कथानकाची गरज हवी. विशेषत: गेल्या काही वर्षांत ‘बॉडी शेमिंग’वर टीकाही झाली आहे आणि दुसरीकडे आपल्याकडे स्थूल शरीर असलेल्यांची संख्या जास्त आहे हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी कपडय़ांपासून अनेक गोष्टी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. याचा गांभीर्याने विचार करत नाजूकाची कथा आजच्या संदर्भाने येऊ  शकली असती. त्याऐवजी पोरकटपणे केलेली मांडणी आणि नको तो विनोदाचा संदर्भ जोडत आपणच उभ्या केलेल्या नायिकेचे हसू करण्यात अगडबम प्रयत्न खर्ची पडले आहेत.

तृप्ती भोईर यांनी अभिनेत्री म्हणून जेव्हा ‘अगडबम’ चित्रपटातून नाजूका पहिल्यांदा उभी केली तेव्हा तिची कथा खूप प्रामाणिकपणे मांडण्यात आली होती. रायबाने आडदांड नाजूकाला पहिल्यांदा पत्नी म्हणून नाकारणे आणि नंतर सहवासातून वाढत गेलेल्या प्रेमातून झालेला तिचा सहजस्वीकार हा त्यातला महत्त्वाचा धागा होता. या चित्रपटाच्या ‘सिक्वल’मध्ये म्हणजेच ‘माझा अगडबम’मध्ये पहिल्या काही मिनिटांतच नाजूका आणि रायबामधील प्रेम आजही किती घट्ट आहे, याची जाणीव एका गाण्यातून दिग्दर्शक म्हणून पुन्हा एकदा तृप्तीनेच करून दिली आहे. निर्माती, दिग्दर्शक आणि अभिनेत्री या तिन्ही जबाबदाऱ्या स्वत:च पेलण्याच्या नादात कथेवरचे तिचे नियंत्रण पूर्ण सुटले आहे. कारण पहिली गाण्याची दहा मिनिटे सोडल्यानंतर कामदेव बाबा, त्यांच्या गोळ्या आणि परिणाम ज्या पद्धतीने रंगवण्यात आला आहे त्याला धड पोरकटपणाही म्हणता येत नाही आणि चावटपणा म्हणावा तर त्यातही सगळे उघडेच पडले आहेत.

त्यानंतर पुन्हा एकदा कथा जोरदार वळण घेते आणि मग कुस्ती आखाडा ते ‘डब्ल्यूडब्ल्यूई’चे मराठी सामने, मराठी बोलणारा जपानी सुमो अशा काय काय नवलाईच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. नाजूकाला हिरो करण्यासाठी वापरलेला हा प्लॉट इतका फसवा आणि भयंकर आहे की, क्षणभर काय पाहतो आहोत हेच कळेनासे होते. या पूर्ण अडीच तासांच्या चित्रपटाच्या प्रवासात पहिल्यांदाच जेव्हा रायबाच्या विश्वासाला तडा बसतो आणि त्याक्षणी का होईना रागाच्या भरात नाजूकाच्या प्रेमाच्या आवरणाखाली दडलेल्या रायबाच्या मनातील भावना खऱ्या अर्थाने बाहेर पडतात. नाजूकाचा नवरा म्हणून लोकांचे चिडवणे, त्यांनी केलेला अपमान जो रायबाने गिळला आहे तो त्या अनाहूत क्षणी बाहेर पडतो. हा एकच प्रसंग प्रामाणिक वाटतो. मात्र ज्याचा शेवट गोड त्याचे सगळेच गोड. इथेही नायिका चारचौघींप्रमाणे पुन्हा एकदा सगळे गोड मानून रायबाच्या मिठीत विसावते.

अभिनयाच्या बाबतीत बोलायचे तर नाजूकाचे आव्हान अभिनेत्री म्हणून तृप्तीने आठ वर्षांपूर्वीच पेलले होते. इथे त्या अवतारात तिने स्टंट्सही केले आहेत. मात्र या वेळी ही नाजूका कृत्रिम वाटते. सुबोध भावेने एक वेगळा टोन पकडत आपल्या पद्धतीने रायबा साकारला असला तरी मधल्या काही प्रसंगांत तो सुबोध म्हणूनच समोर येतो. वेगळा प्रयोग म्हणून या चित्रपटाचा मोह त्याला आवरला नाही की काय.. असा विचार केला तरी त्याने असा चित्रपट का केला असेल, हा प्रश्न छळतो. आता तर तिसऱ्या पर्वाचेही सूतोवाच झाले असले तरी ‘अगडबम’च बरा होता, हा दुजाही नको आणि तिजाची तर कल्पनाच नको..!

* दिग्दर्शक : तृप्ती भोईर

* कलाकार : तृप्ती भोईर, सुबोध भावे, तानाजी घाडगे, उषा नाडकर्णी, जयवंत वाडकर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 1:36 am

Web Title: maza agadbam movie review
Next Stories
1 ‘मी ड्रग अॅडिक्ट नाही आणि लेस्बियन तर मुळीच नाही’
2 मलाईका आणि अर्जुन कपूर पुढच्या वर्षी विवाहबंधनात?
3 सासरा -जावई नाते उलगडणारी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X