‘स्मिता, स्मितं आणि मी’….हे ललिता ताम्हणे यांचं पुस्तक म्हणजे अभिनय क्षेत्रातल्या आम्हा कलाकारांसाठी एक प्रकारची कार्यशाळाच. किंबहुना या क्षेत्रातील कलाकार आणि दिग्गजांचं आत्मचरित्रात्मक पुस्तकं आमच्यासाठी कार्यशाळाच आहेत’, असं म्हणत अभिनेत्री अक्षया गुरवनं तिच्या आवडीच्या पुस्तकांविषयी सांगण्यास सुरुवात केली. ‘माझा किताबखाना’ या सदराच्या निमित्ताने ‘लव्ह लग्न लोचा’ फेम अभिनेत्री अक्षया गुरवचा किताबखाना आपल्यासमोर आला आहे. याच किताबखान्यातील काही पुस्तकांंचा उल्लेख करत तिनं किताबखान्याची सफर घडवली. अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘स्मिता, स्मितं आणि मी’ हे पुस्तक अक्षयाने बऱ्याचदा वाचून इतरांनाही वाचण्यासाठी दिलं आहे. ‘मुळात माझ्या आईला वाचनाची आवड असल्यामुळे माझ्या घरात वाचनासाठीचं पोषक वातावरण होतंच, त्यामुळे माझ्याकडे तिचा किताबखान्याचा वारसा आहे, असंच म्हणावं लागेल. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर माझी वाचनाची सवय आणखीनच वाढत गेली आणि विविध विषयांवर भाष्य करणारी पुस्तकं वाचण्याकडे माझा कल वाढला’, असं अक्षया म्हणाली.

ललिता ताम्हणे यांच्या पुस्तकामागोमाग अक्षयानं आणखी एका पुस्तकाचा उल्लेख केला. ते पुस्तक म्हणजे कांचन घाणेकर लिखित ‘नाथ हा माझा’. नटश्रेष्ठ काशिनाथ घाणेकर यांचं सुरेख चित्रण या पुस्तकामध्ये करण्यात आलं आहे. त्यामुळे हे पुस्तकही खऱ्या अर्थाने वाचकांसाठी फार महत्त्वांचं आहे, असं अक्षयाने न चुकता नमूद केलं. अभिनय क्षेत्रात आल्यामुळे अक्षयाला काहीजणांनी विविध पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला, तर काहींनी भेटस्वरुपी पुस्तकांचा नजराणाही दिला. याच बळावर तिचा किताबखाना दिवसेंदिवस मोठा होत गेला. सध्याच्या घडीला तिच्या हाती ‘द कृष्णा की’ (The Krishna Key) हे पुस्तक लागलं आहे. पण, वेळेअभावी तिला हे पुस्तक वाचणं शक्य होत नाहीये. हो…. पण वेळ मिळताच हे पुस्तक वाचण्याचं तिनं ठरवलं आहे.

प्रेमकथा, भयकथा आणि थरारक कथा वाचण्याकडे कल असणाऱ्या अक्षयाने स्पृहा जोशीच्या ‘लोपामुद्रा’ या काव्यसंग्रहाविषयी सांगताना तिचं तोंडभरुन कौतुक केलं. ‘स्पृहाच्या अभिनयासोबतच तिचे विचारही मला फार आवडतात. तिच्यासोबत काम करण्याची संधी अद्यापही मला मिळाली नाहीये’ असं म्हणत त्या संधीबद्दल आपण आशावादी असल्याचंही तिनं बोलण्यातून स्पष्ट केलं.

विनोदी पुस्तकांमध्ये न रमणाऱ्या या अभिनेत्रीनं गुलजारांच्या लेखनाबद्दलची तिची पसंती आणि प्रिया तेंडुलकरांच्या ‘जावे तिच्या वंशा’ या पुस्तकाविषयीही सांगितलं. किताबखान्याविषयी रंगलेल्या या गप्पांच्या ओघात तिनं एक खंतही व्यक्त केली. अर्थात तिची ही खंतही पुस्तकासंदर्भातच आहे. सुहास शिरवळकरांचं ‘दास्तान’ हे पुस्तक बरेच प्रयत्न करुनही तिच्या हाताशी लागलं नाहीये. त्यामुळे ‘जर कोणाच्या हाती हे पुस्तक लागलं तर त्याबद्दल मला जरुर कळवा असंही या सदराच्या माध्यमातून अक्षयानं सांगितलं आहे.’ हा होता अक्षयाचा विविधतेनं नटलेला, दिवसेंदिवस मोठा होणारा हटके किताबखाना…

शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com