इरावती कर्वे लिखित ‘युगांत’ या पुस्तकाविषयी असणारं प्रेम व्यक्त करत अभिनेता आस्ताद काळेने त्याच्या किताबखान्याची ओळख करुन दिली. महाभारताविषयी आपण सगळे जाणतो, किंवा त्याविषयी जाणून घेण्यासाठी आपण उत्सुकही असतो. अशीच उत्सुकता आणि त्या महाकाव्याविषयी असणारी ओढ आस्तादने यावेळी व्यक्त केली. ”महाभारताविषयी माझ्या मनात एक वेगळ्या प्रकारची ओढ आहे. मुख्य म्हणजे ते एक महाकाव्य नसून तो इतिहासच आहे’, असंही त्याने सांगितलं.

‘ही कथा आपल्याला अधिक जवळची वाटण्यामागचं कारण म्हणजे त्यातील पात्रांना उगाचच देवपण बहाल केलेलं नाहीये. तसं पाहायला गेलं तर सध्याच्या आयुष्यातील कोणत्याही प्रसंगाचं, घटनेचं मूळ महाभारतातच आहे असं मला वाटतं’, असं म्हणत आस्तादने या पुस्तकात मांडण्यात आलेल्या वेगळ्या दृष्टीकोनाविषयीही सांगितलं.

”या महाकाव्यासोबतच सध्या मी ‘श्रीमानयोगी’ हे पुस्तकही वाचतोय. महाराजांच्या इतिहासाविषयी वाचायला मला नेहमी आवडतं. त्यांचे पराक्रम, इतक्या कमी वयात त्यांनी मिळवलेलं यश हे सर्व काही प्रशंसनीय आहे आणि असायलाच हवं. पण, त्यांच्या नावाचा आज जो काही राजकीय वापर केला जातोय ते मला मान्य नाही,” असं आस्तादने ठामपणे सांगितलं.

वाचनाच्या सवयीविषयी सांगताना तो म्हणाला, ‘तसं पाहायला गेलं तर मला वाचनाची सवय तशी उशीराच लागली. माझ्या कुटुंबातच वाचनाचा वारसा असल्यामुळे मला वाचनासाठी चांगलं साहित्य मिळालं हेसुद्धा तितकच खरं. हल्लीच्या पिढीचंही अगदी तसंच काहीसं झालं आहे. विविध मार्गांनी ही पिढी वाचन करत आहे यात शंकाच नाही. पण, माझ्या मते काही लेखकांच्या आहारी जाणं कितपत योग्य आहे याचा अंदाज त्यांनी घेतला पाहिजे. त्यामुळे तरुणाई वाचनापासून दुरावत आहे असं मला मुळीच वाटत नाही. त्यांच्या वाचनाच्या सवयीला फक्त एक दिशा देण्याची गरज आहे असं माझं मत आहे.’

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

ग्रेस, श्री. ना. पेंडसे, पुलं, बाबासाहेब पुरंदरे, विश्वास पाटील, प्रकाश नारायण संत या लेखकांच्या पुस्तकांचा आस्तादवर प्रभाव आहे असं त्यांने सांगितलं. त्याच्या आजवरच्या वाचनात ‘रथचक्र’, ‘गारंबीचा बापू’, ‘लव्हाळी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘पानिपत’ ही पुस्तकं आहेत. याशिवाय भालचंद्र नेमाडेंचं ‘कोसला’सुद्धा त्याच्या आवडीच्या पुस्तकांपैकी एक. आस्तादच्या किताबखान्यात निवडक इंग्रजी पुस्तकांचाही संग्रह आहे. सिडनी शेल्डन, आर्थर हेली, फ्रेड्रिक फोरसिथ या लेखकांचीही बरीच पुस्तकंही त्याच्या किताबखान्यात आहेत. आजच्या घडीला एका क्लिकवर जागतिक पातळीवरचं साहित्य वाचकांसाठी उपलब्ध झालं आहे. त्यामुळे वाचकांनी त्याचा उपभोग घेण्यात काहीच गैर नाही, असं म्हणत आस्तादने त्याचा किताबखाना आवरता घेतला.

यापुढील सेलिब्रिटी वाचकाच्या आवडत्या पुस्तांविषयी जाणून घेण्यासाठी वाचत राहा ‘माझा किताबखाना’.

शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com