बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप समोर येत आहेत. बॉलिवूडमध्ये ‘मी टू ‘ मोहीम जोर धरू लागली आहे. मात्र जे आरोप होत आहेत ते केवळ प्रसिद्धीसाठी आहेत किंवा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आहे, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी केलं आहे. असरानी यांच्या व्यक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.

‘प्रत्येक जणांनी महिलांचा आदर केला पाहिजे, मी सुद्धा महिलांचा आदर करतो. पण, आतापर्यंत बॉलिवूडमध्ये जे काही लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप होत आहेत ते केवळ प्रसिद्धीसाठी किंवा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केले जात आहेत. या आरोपांमध्ये तथ्य नाही त्यामुळे ते गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता नाही’ अशी वादग्रस्त प्रतिक्रिया त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला बोलताना दिली आहे. अरसानी हे बॉलिवूडमध्ये त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र आता त्यांनी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या गैरवर्तणुकीच्या आरोपानंतर बॉलिवूडमधल्या अनेक महिला, अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीला वाचा फोडली. यात अभिनेता रजत कपूर, आलोक नाथ, दिग्दर्शक विकास बहल, कैलास खेर यांसारखी अनेक बडी नाव समोर आली. तनुश्रीनंतर कंगना रणौत, नयनी दीक्षित, सोना महोपात्र, विनता नंदा, संध्या मृदुल यांसारख्या अनेक कलाकारांनी लैंगिक गैरवर्तणुकीला वाचा फोडत दिग्दर्शक, अभिनेत्यांचं खरं रुप जगासमोर आणलं. तर दुसरीकडे प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, फरहान अख्तर , ट्विकल खन्ना, आमिर खान, प्रकाश राज यांसारख्या अनेक बड्या कलाकारांनी बॉलिवूडमधल्या मी टू मोहिमेला पाठींबा दर्शवला.