20 February 2019

News Flash

#MeToo बद्दल बोलणाऱ्या सईला पुण्यातील दारु पार्टीबद्दल विचारले तेव्हा…

२०११ साली पुण्यातील एका सोसायटीमध्ये दारु पिऊन मराठी कलाकारांनी धिंगाणा घातला होता

सईने दिले उत्तर

प्रसिद्ध दिग्दर्शिका-निर्मात्या विनता नंदा यांनी ज्येष्ठ अभिनेते अलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. त्यानंतरही अनेक अभिनेत्रींनी #MeToo मोहिमेअंतर्गत आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडली. मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरनेही ट्विटरच्या माध्यमातून या मोहिमेला आपला पाठिंबा दर्शवला होता. मात्र तिच्या या मतप्रदर्शनावर अनेकांनी मत व्यक्त करत तिला पुण्यातील एका जुन्या प्रकरणाची आठवण करुन देत ‘दारु पिऊन धिंगाणा घालणारी अभिनेत्री’ अशा शब्दात तिला रिप्लाय केला. या रिप्लायला सईने सडेतोड उत्तर दिले आहे.

तुम्ही कधीच शांततापूर्ण आयुष्य जगू शकणार नाही, तुम्ही नरकातच सडणार असं ट्विट सईनं करत विनता नंदा आणि मी टू मोहीमेला पाठिंबा दर्शवला. या संदर्भातील बातम्या ट्विट झाल्यानंतर एका वाचकाने सईला टॅग करून, ‘आहो पण पुण्यात फ्लॅटमध्ये रात्री दारु पिऊन जो धिंगाणा घातलेला त्याचंही बोला जरा’ असे ट्विट केले.

या ट्विटला सईनेही सडेतोड शब्दात उत्तर दिले आहे. या वाचकाला उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये सई म्हणते, ‘मित्रा त्यापेक्षा काहीतरी महत्वाचं घडू पाहतयं इथे. असो. ते समजायची कुवत वा मानसिक पातळी तुझी नाही. देव तुझं भलं करो.’

सईने मी टू प्रकरणात घेतलेल्या भूमिकेवर ती ठाम असल्याचेच या ट्विटमधून दिसून येते. आलोक नाथ यांच्यावर भाष्य करणारी सई नाना पाटेकरांवरील आरोपांवर काहीच बोलली नाही, अशी टीका तिच्यावर झाली. या टीकाकारांना सईने सडेतोड उत्तर देत, ‘मराठी असण्याचा प्रश्न नाही; जे चूक आहे ते चूकच आहे’ अशा शब्दात आपली भूमिका मांडली.

मात्र नाना पाटेकरांसंदर्भातील प्रकरणात मौन बाळगल्याचा आरोप होण्याआधीच तिने या प्रकाराबद्दल आपले मत व्यक्त केले होते. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सईनं तनुश्री दत्तालाही पाठिंबा दर्शवला आहे. तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्यावर जे काही आरोप केले आहेत ते ऐकून मला धक्का बसला आहे. मात्र तिच्या आरोपात तथ्य असेल तर नाना पाटेकर यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे असंही ती म्हणाली आहे.

काय घडले होते पुण्यात

२०११ साली एप्रिल महिन्यामध्ये पुण्यातील एरंडवना भागामध्ये झालेल्या एका पार्टीमध्ये काही मराठी कलाकारांनी मद्याच्या नशेत धिंगाणा घातला होता. कोथरुडमधील निलांबरी सोसायटीमध्ये हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी दिग्दर्शक श्रीरंग गोडबोलेंचा मुलगा सुरूद गोडबोले, सौरभ देशमुख, अभिषेक शेट्टी, अजिंक्य खांबेकर, अमेय गोसावी यांच्यासहीत आठ जणांना अटक केली होती. या पार्टीला अभिनेत्री सई ताम्हकरसहीत चार महिलाही हजर होत्या. घटनास्थळी महिला पोलिस नसल्याने सई आणि इतर चार महिलांवर पोलिसांना कारवाई करता आली नाही.

दारु पिऊन या सर्व कलाकारांनी चांगलाच धिंगाणा घालताना. यामध्ये स्थानिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असताना या कलाकारांनी स्थानिकांना शिवीगाळ केला. त्यावेळी स्थानिकांनी पोलिसांना फोन करुन बोलावून घेतले. आणि पोलिसांनी आठही पुरुषांना अटक केली. या आठही जणांना एक रात्र कोथरुड पोलिस स्थानकात काढावी लागली होती. प्रत्येकी १० हजारांच्या जात मुचलक्यावर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यावेळी हे प्रकरण चांगलेच गाजले होते.

First Published on October 12, 2018 4:37 pm

Web Title: me too saie tamhankar reacts on pune party controversy related question