‘आंधळं दळतंय’ या लोकनाटय़ाद्वारे मुंबईतल्या मराठी माणसाच्या उपेक्षेला वाचा फोडणाऱ्या आणि त्याद्वारे शिवसेनेच्या प्रसववेदना व्यक्त करणाऱ्या शाहीर साबळे यांच्यावर पुढच्या काळात ‘आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली’ हा पोवाडा प्रसवण्याची वेळ यावी, ही तशी मन विदीर्ण करणारीच गोष्ट! ज्या शिवसेनेच्या स्थापनेकरिता शाहिरांनी आपल्या कलेद्वारे वातावरणनिर्मिती केली, मराठी माणसांचा स्वाभिमान चेतवला, तिनेच पुढच्या काळात मुंबईचा बाजार मांडला, याबद्दलचे असह्य़ दु:ख प्रकट करणारा हा शाहिरांचा पोवाडा! तो ऐकताना उपस्थितांना आपलीच आपलीच असीम व्यथा-वेदना मुखर होते आहे असे भासत होते. निमित्त होते.. महाराष्ट्रशाहीर साबळे यांच्या शिष्यांनी ‘मी आणि शाहीर साबळे’ या कार्यक्रमाद्वारे त्यांना वाहिलेल्या आदरांजलीचे!
शाहिरांचे नातू केदार शिंदे, अभिनेते भरत जाधव आणि लेखक-दिग्दर्शक-अभिनेते संतोष पवार या शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’मधील शिष्यांनी या कार्यक्रमाचा घाट घातला होता. शाहीर साबळे यांचे विविधांगी कर्तृत्व आजच्या पिढीसमोर यावे आणि त्यातून तरुण पिढीला प्रेरणा मिळावी, हा त्यामागचा हेतू होता.
शाहिरांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना-घडामोडींची चित्रफीत, त्यांचे पोवाडे, कवने, शाहिरी कार्यक्रम, शाहिरांच्या मुक्तनाटय़ांमधील प्रवेशांचे सादरीकरण, ‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी लोककलांच्या जतन-संगोपनासाठी केलेले महत्त्वपूर्ण योगदान, त्यांच्या शिष्यांची मनोगते अशा भरगच्च सादरीकरणातून शाहीर साबळे यांचे अवघे व्यक्तिमत्त्व या कार्यक्रमात उलगडत गेले.
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमात पसरणी गावातील शाहिरांच्या जन्मापासून ते त्यांची अमळनेरमध्ये झालेली जडणघडण, गाडगेबाबा व सानेगुरुजी यांच्या संस्कार व सहवासात घडलेला त्यांचा पिंड, त्यांच्या कलेला मिळालेले उत्तेजन, पुढे त्यातूनच विकसित झालेले त्यांचे विविधांगी कार्यकर्तृत्व असा सारा पट ‘मी आणि शाहीर साबळे’मध्ये संहिताकार वसुंधरा साबळे यांनी रेखाटला होता. शाहिरांची कवने, गाणी आणि पोवाडय़ांतून गायिका सायली पंकज, रोहित राऊत आणि प्रसन्नजीत कोसंबी यांनी त्यांच्या सांगीतिक योगदानाची झलक पेश केली, तर केदार शिंदे, भरत जाधव आणि संतोष पवार यांनी ‘आबूरावाचं लगीन’, ‘आंधळ दळतंय’, ‘पुण्याचा पोवाडा’ या नाटय़ांशातून त्यांच्यातल्या अस्सल समाजभिमुख कलावंतांचे दर्शन घडवले. जनतेची नाडी अचूक जाणणारी आणि सामाजिक-राजकीय दंभावर सणसणीत कोरडे ओढणारी त्यांची मुक्तनाटय़े किती प्रभावी होती, याचा वानवळा यानिमित्ताने आजच्या पिढीस अनुभवावयास मिळाला. तर ‘महाराष्ट्राची लोकधारा’मधून शाहिरांनी आपल्या मायमातीचे ऋण फेडण्याच्या केलेल्या प्रयत्नांना या कार्यक्रमाने पुनश्च उजाळा मिळाला. केदार शिंदे, संतोष पवार आणि भरत जाधव यांच्या अदाकारीने कार्यक्रमाची रंगत चढत्या आलेखाने वाढतच गेली आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या शाहिरांच्या महाराष्ट्रगीताने या झंझावाती ‘साबळेपर्वा’ची सांगता झाली.

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
praniti shinde question photos of pm narendra modi
खतांच्या बॅगांवर मोदींचा फोटो, आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना खत विकत घेणे मुश्किल; प्रणिती शिंदे संतापल्या
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…