महाराष्ट्राच्या राजकारणातील बाळासाहेब ठाकरे या झंझावत्या व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ठाकरे’ हा २०१९ या वर्षातला हा सर्वांत उत्कंठतावर्धक चित्रपट असून या चित्रपटातील गाणी नुकतीच प्रदर्शित करण्यात आली. या म्युझिक लॉन्च सोहळ्याप्रसंगी ठाकरे कुटुंबियांसोबत चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी अभिनेत्री अमृता रावने माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकारताना तिला आलेल्या अनुभवांचं कथन केलं. त्यासोबतच ही भूमिका साकारणं म्हणजे माझं भाग्यच होतं असंही ती यावेळी म्हणाली.

‘ठाकरे’ या चित्रपटातील ‘आया रे सबका बाप रे,कहते है उसको ठाकरे’ हे हिंदी गाणं प्रदर्शित झालं. विशेष म्हणजे प्रदर्शित झालेल्या या गाण्याला काही वेळातच तुफान लोकप्रियता मिळाल्याचं पाहायला मिळालं. या म्युझिक लॉन्चच्या प्रसंगी अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अभिनेत्री अमृता राव यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मीनाताईंसारखं आयुष्य जगायला मिळालं हे माझं भाग्यच आहे, असं ती म्हणाली.

‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या वाघाला मीनाताई ठाकरेंसारख्या धीट, जिद्दी व खंबीर अशा वाघीणीची साथ मिळाली आणि महाराष्ट्राला मातृछाया मिळाली. परंतु त्यांची भूमिका साकारणं हे माझ्यासाठी मोठं आव्हान होतं. कारण मला प्रेक्षकांसमोर अमृता राव म्हणून नाही तर माँसाहेब मीनाताई ठाकरे म्हणून सादर व्हायचं होतं. माँसाहेब प्रत्यक्षात कशा होत्या हे प्रेक्षकांना दाखवून द्यायचं होतं. त्यामुळे ही भूमिका वठविणं तसं मोठं आव्हानच होतं’, असं अमृता म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘मीनाताई यांची भूमिका करताना मला विशेष काळजी घ्यावी लागली कारण त्या नेमक्या कशा होत्या हे जाणून घेण्यासाठी माझ्याकडे त्यांचा कोणताही ऑडिओ किंवा व्हिडिओ नव्हता. त्यामुळे मी या भूमिकेला न्याय देऊ शकेन की नाही ही भिती सतत मनात होती. परंतु, चित्रपट निर्माते संजय राऊत यांनी मला या कामात प्रचंड मदत केली. त्यामुळे मला माँसाहेबांची भूमिका वठवणं शक्य झालं’.

दरम्यान, संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि कार्निवल मोशन पिक्चर्स निर्मित ‘ठाकरे’ येत्या २५ जानेवारी ला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तांत्रिक विभागाच्या टीमने ह्या चित्रपटाच्या अनुषंगाने काम केलेले आहे. दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे.