बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी दररोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. नुकताच सुशांतची एक्स मॅनेजर जया साहा हिने अमली पदार्थविरोधी पथकाकडून (एनसीबी) होणाऱ्या चौकशीत मोठा खुलासा केला. अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन सीबीडी ऑईल मागवल्याची कबुली जयाने दिली. यावर आता अभिनेत्री मीरा चोपडाने ट्विट करत प्रश्न विचारला आहे.

नुकताच मीराने एक ट्विट केले आहे. ‘सीबीडी ऑईल हे बेकायदेशीर आहे तर मग ते सहजपणे ऑनलाइन कसे उपलब्ध आहे? मी ऑनलाइन चेक केले. जर ते बेकायदेशीर आहे तर त्याच्या संबंधीत काही नियम का नाहीत?’ या आशयाचे ट्विट तिने केले आहे. तिच्या ट्विटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

सुशांतची एक्स मॅनेजर जया साहा हिने अमली पदार्थविरोधी पथकाकडून (एनसीबी) होणाऱ्या चौकशीत श्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन सीबीडी ऑईल मागवल्याची कबुली दिली. श्रद्धा कपूरशिवाय तिने सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, दिग्दर्शक मधू मंटेना वर्मा आणि स्वत:साठी सीबीडी ऑईल मागवल्याचा खुलासा जयाने केला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीच्या जामीनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. रियाच्या जामीनावर बुधवारी सुनावणी होणार होती. मात्र,ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्यानुसार, ही सुनावणी आज गुरुवारी होणार आहे, अशी माहिती रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी दिली.