मेगास्टार चिरंजीवी सध्या त्यांच्या आगामी ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती त्यांचा मुलगा रामचरण करत आहे. ऐतिहासिक कथानकावर आधारित या चित्रपटाचा बजेट जवळपास २०० कोटींच्या आसपास असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाच्या यशासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं रामचरणने एका मुलाखतीत म्हटलं होतं. म्हणूनच यातल्या एका युद्धाच्या दृश्यासाठी त्याने तब्बल ५४ कोटी खर्च केले आहेत.

जॉर्जियामध्ये युद्धाच्या दृश्याची शूटिंग होत असून फक्त आठ मिनिटांच्या दृश्यासाठी ५४ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. चित्रपटाच्या शेवटी हे दृश्य असून यासाठी टीमने बरीच मेहनत घेतली आहे.

‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ चित्रपटाच्या टीमने शूटिंगसाठी हैदराबादहून जवळपास १५० लोकांना जॉर्जियाला नेलं. या १५० लोकांच्या शूटिंगचे कपडेसुद्धा हैदराबादमधून नेण्यात आले होते. याशिवाय जॉर्जियामधल्या ६०० स्थानिक कलाकारांनीही या शूटिंगमध्ये सहभाग घेतला.

Video : तनुश्रीच्या कारवरील हल्ल्याचा २००८ मधला व्हिडिओ व्हायरल

स्वातंत्र्यसैनिक उय्यालवाडा नरसिम्हा रेड्डी यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. यामध्ये नयनतारा, विजय सेतुपती, तमन्ना आणि सुदीप यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. इतकंच नव्हे तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनसुद्धा चिरंजीवीसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. काही दिवसांपूर्वी बिग बींनी या चित्रपटातील लूक ट्विटरवर शेअर केला होता.