बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेनं हिंदी बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासून घरचं चित्रच पूर्णपणे पालटलं आहे. घरात प्रवेश केल्यानंतर अल्पावधितच मेघानं अनुप जलोटा यांना बाहेरचा रस्ता दाखवला. अनुप जलोटा आणि जसलिन ही बिग बॉसच्या घरातली सर्वात लोकप्रिय जोडी होती. मात्र मेघानं घरात प्रवेश केल्यानंतर अनुप जलोटांना नॉमिनेट केलं अन् बिग बॉसच्या विजेतेपदचा किताब पटकावण्याचं अनुप यांचं स्वप्न भंगलं.
‘पण, मला घरातून बाहेर काढल्याबद्दल मेघाला खूपच वाईट वाटलं, तिनं यासाठी माझी माफी देखील मागितली. घरातील इतरांच्या तुलनेत मला समजून घेणं तिला अवघड गेलं, म्हणूनच मेघानं मला नॉमिनेट केल्याचं तिनं मला सांगितलं’ असं अनुप घरातून बाहेर पडल्यानंतर ‘दी इंडियन एक्स्प्रेसशी’ बोलताना म्हणाले. पण याचवेळी मेघा बिग बॉस जिंकू शकत नाही असा दावाही त्यांनी केला.
‘मेघानं या खेळात डॉक्टरेट पदवी मिळली आहे. नेमकं काय करायचं हे तिला चांगलच माहिती आहे. मात्र मधूनच खेळात सहभागी झालेले खेळाडू कधीही जिंकत नसतात’ असं म्हणत मेघाची जिंकण्याची संधी ही खूपच कमी असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. मेघा धाडेनं मराठी बिग बॉसचा किताब जिंकला. त्यावेळी घरात प्रवेश केल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच तिनं आपल्या खेळीनं सगळ्यांचं मन जिंकलं. ती बिग बॉस मराठीमध्येही पूर्णपणे अभ्यास करूनच आली होती अनेकदा इतर स्पर्धकांनीही म्हटलं होतं. तिनंही बिग बॉसच्या घरात आपण केवळ जिंकण्यासाठीच प्रवेश केला होता हेही खुलेपणानं मान्य केलं.
पण हिंदी बिग बॉसमध्ये मेघाला अनेक प्रतिस्पर्धकांचा सामना करावा लागणार आहे. तेव्हा अनुप जलोटांचा दावा खोटा ठरवत हिंदी बिगमध्येही मेघा बाजी मारते का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 30, 2018 3:50 pm