मेगन मार्केलच्या लग्नाला अवघे दोन महिनेही पूर्ण होत नाही तोच तिच्या वडिलांनी तिच्या वैवाहिक जीवनाविषयी चिंता व्यक्त करायला सुरूवात केली आहे. मेगन आणि प्रिन्स हॅरी यांचा विवाहसोहळा मे महिन्यात पार पडला. एखाद्या परिकथेप्रमाणे या दोघांचा शाही विवाहसोहळा थाटामाटात झाला. मेगन अमेरिकन अभिनेत्री म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे, तर प्रिन्स हॅरी ब्रिटन राजघराण्याचे सुपुत्र. मात्र आता मेगनच्या वैवाहिक जीवनाविषयी तिचे वडिल थॉमस मार्कल यांनी चिंता व्यक्त करायला सुरूवात केली आहे.

ती सध्या खूपच घाबरलेली असते, मला तिच्या डोळ्यांतून हे दिसतं. तिच्या वागण्या, बोलण्यातून अगदी हसण्यातूनही तीची भीती स्पष्ट जाणवते. शाही कुटुंबात रुळण्यास तिला अडचणी येत आहे. ती सतत तणावाखाली वावरत असते अशी चिंता त्यांनी नुकतीच मुलाखीत व्यक्त केली आहे. मेगनला मी लहानपणापासून ओळखतो ती अशी नाही मात्र आता ती सतत तणावाखाली असल्याचं मला जाणवतंय. ती दु:ख लपवण्याचा प्रयत्न करत आहे असंही तिचे वडील म्हणाले.

राजघराण्याची सदस्य झाल्यापासून मेगनच्या वागण्या बोलण्यापासून अनेक गोष्टींवर निर्बंध आले आहे. इतकंच नाही तर पेहरावाच्या बाबतीतही तिला शाही घराण्याचे नियम काटेकोरपणे पाळावे लागत आहेत. अनेकवेळा हे नियम मोडले गेल्यानं तिच्यावर समाजमाध्यमातून  मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. याच शाही नियमाचं दडपण तिला आहे असं थॉमस मार्कल यांचं म्हणणं आहे. तसेच लग्न झाल्यापासून माझा तिच्याशी कोणताच संपर्क झालेला नाही, मी तिला अनेकदा फोन केले मात्र तिनं एकदाही फोन उचलला नाही असंही थॉमस मुलाखतीत म्हणाले.

थॉमस मेगनच्या लग्नाला उपस्थित राहिले नव्हते. याच दरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. लग्नाच्या काही दिवस आधी प्रसिद्धीसाठी त्यांनी छायाचित्रकारांना बोलावून स्वत:चे फोटो काढून घेतले होते. तसेच हे फोटो वर्तमानपत्रात छापून येतील याची सोय त्यांनी केली होती. मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांची चांगली नाचक्की झाली होती.