मेघना गुलजार दिग्दर्शित आगामी ‘राजी’ या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर भूमिका साकारणार आहे. पाकिस्तानमधील एका शाही कुटुंबातल्या मुनिरा या गृहिणीच्या भूमिकेत ती पाहायला मिळणार आहे. या भूमिकेसाठी अमृताने विशेष मेहनत घेतली असून ती उर्दू भाषासुद्धा शिकली आहे. अस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गुलजारने अमृताची पाठ थोपटली आहे.

पाकिस्तानी गृहिणीची भूमिका असल्याने अर्थातच अमृताला उर्दूमध्ये संवाद होते. ‘कट्यार काळजात घुसली’ या मराठी चित्रपटातही अमृताने उर्दू भाषेत संवाद म्हटले होते. त्यानंतर पुन्हा एकदा आता ‘राजी’च्या निमित्ताने ती मुस्लिम महिलेच्या भूमिकेत ती दिसणार आहे. ‘कट्यार..’नंतर हा चित्रपट करताना अमृताने उर्दू भाषेच्या शिकवण्या घेतल्या.

उर्दू शिकतानाचा अनुभव सांगताना अमृता म्हणाली की, ‘कट्यारपेक्षाही या चित्रपटात जास्त कठीण उर्दू संवाद होते. यात मी मशहूर गीतकार-शायर गुलजार यांच्या कन्येसमोर उर्दू बोलणार असल्याने, मी सेटवर जाताना तयारीतच गेले. भूमिकेचा संपूर्ण अभ्यास आणि त्यातल्या बारकाव्यांसह मी सेटवर पोहोचल्याचे पाहून पहिल्याच दिवशी मेघना मॅडमनी माझ्या तयारीचं कौतुक केलं.’

वाचा : ‘महाभारताच्या काळात इंटरनेट’वरून होणाऱ्या विनोदांवर संतापलेले जावेद अख्तर म्हणतात…

‘मी ऑडिशनला गेले तेव्हा माझ्या उर्दू उच्चारणांकडे पाहून त्या खूप प्रभावित झाल्या होत्या. त्यामुळेच तर ऑडिशन झाल्या-झाल्या मला धर्मा प्रॉडक्शनने साइन केले. सिनेमाचे शूटिंग सुरू झाल्यावर काही दृश्यांमध्ये अवघड उर्दू संवादही मी अस्खलित बोलल्याने मेघना मॅडमनी माझी पाठ थोपटली आणि याचा अर्थातच मला अभिमान वाटतो,’ असंही ती म्हणाली.

आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या ११ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.