जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोणने विद्यापीठात हजेरी लावली. यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. तिच्यावर अनेकांनी टीकासुद्धा केली. इतकंच नव्हे तर तिच्या ‘छपाक’ या चित्रपटावर बंदी आणण्याचीही मागणी काही जणांनी केली. या सर्व वादावर आता ‘छपाक’ची दिग्दर्शिका मेघना गुलजारने मौन सोडलं आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य वेगळं ठेवता आलं पाहिजे, असं म्हणत मेघना गुलजारने दीपिकाला पाठिंबा दिला.

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत मेघना म्हणाली, “वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य यांमध्ये फरक ठेवण्याची क्षमता आपल्यात हवी. एखाद्या व्यक्तीने तिच्या खासगी आयुष्यात काय केलं आणि तिची व्यावसायिक कामगिरी कशी आहे या दोन गोष्टींना वेगळं पाहणं गरजेचं आहे. एकीकडे जिथे लोक पर्सनल आणि प्रोफेशनल या दोन गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याच्या प्रयत्नात आहेत, तिथे जर थोडंसं लक्ष चित्रपटाच्या विषयाकडे आणि त्यातील गांभीर्याकडे वळवलं तर ते जास्त महत्त्वपूर्ण ठरेल.”

‘छपाक’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी दीपिकाने जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचली. दीपिका जेएनयूमध्ये पोहोचल्याची बातमी आणि फोटो समोर येताच सोशल मीडियावर तिच्याविरोधात ट्रेंड सुरु झाला होता. काही वेळातच तिच्या ‘छपाक’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी झाली होती. #boycottchhapaak हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला होता.