News Flash

आठवणी… ७० एमएम!

अभिनेते विजू खोटे अनेकदा गप्पांमध्ये रमल्यावर मिनव्र्हात लोकांबरोबर ‘शोले’ पाहिल्याचा अनुभव रंगवून सांगत असत.

|| दिलीप ठाकूर

आपल्या सिनेमावेड्या देशात आवडत्या थिएटरवरही भरभरून प्रेम करणारे फिल्म दिवाने खूप आहेत. अनेकांची तर जागाही ठरलेली असे अथवा असते. त्याचीही एक वेगळी परंपरा आणि खासियत आहे. विशेषत: सिंगल स्क्रीन थिएटर्स जेव्हा अनेक आठवडे हाऊसफुल्लचा फलक दिमाखात लावत त्या काळात तर ‘आवडता स्टार, आवडते थिएटर’ ही वेगळी संस्कृती होती. ही संस्कृती दिमाखाने मिरवलेल्या आणि काळाच्या ओघात जमीनदोस्त झालेल्या आपल्या आवडत्या थिएटरच्या जागेच्या व्यवहाराची जाहिरात जेव्हा अचानक समोर येते तेव्हा चित्रपटप्रेमींच्या डोळ्यात चटकन पाणी आल्यास नवल वाटायला नको…

दक्षिण मध्य मुंबईतील डॉ. भडकमकर मार्गावरील (जुना लॅमिंग्टन रोड) ‘मिनव्र्हा थिएटर’बाबत अगदी असेच झाले आहे. त्याच्या विक्रीचा विषय ही व्यावहारिक बाजू झाली, पण या वास्तूचे हिंदीच नाही तर एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत आपले एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. मूळचे जुने मिनव्र्हा थिएटर पाडून त्या जागी नवीन भव्य इमारत उभी राहिली आणि त्याच्या उद्घाटनाच्या वेळी त्याला ‘महाराष्ट्राचे गौरवस्थान’ म्हटले गेले. तीच त्याची कायमस्वरूपी ओळख झाली. जुन्या मिनव्र्हाची रचना जुन्या काळातील थिएटरसारखी होती. जुन्या मिनव्र्हातील शेवटचा चित्रपट होता नरेन्द्र बेदी दिग्दर्शित आणि राजेश खन्ना, मुमताज, संजीवकुमार अभिनित ‘बंधन’ ( १९६९), तर नवीन भव्य आणि दिमाखदार मिनव्र्हाचा पहिला चित्रपट होता एफ. सी. मेहरा निर्मित आणि सुशील मुझुमदार दिग्दर्शित ‘लाल पत्थर’ ( १९७२). राजकुमार, हेमा मालिनी, राखी आणि विनोद मेहरा यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. या थिएटरची मालकीच ‘ईगल फिल्म’चे निर्माते एफ. सी. मेहरा आणि अभिनेता शम्मी कपूरची असल्याने मेहरांच्याच चित्रपटाने याचे उद्घाटन होणे स्वाभाविकच होते.

तो मुख्यत: थिएटर संस्कृतीचा काळ होता. दक्षिण मुंबईतील थिएटरमध्ये नवीन चित्रपट यशस्वी ठरला तर पंचवीस-पन्नास (कधी त्याहीपेक्षा जास्त) आठवडे सहज मुक्काम करे आणि समजा नवीन चित्रपट रसिकांनी नाकारला तर तीन आठवड्यात त्याची प्रिन्ट गोडाऊनमध्ये जाई. या यशापयशात मिनव्र्हाचे स्थान खूपच मोठे आणि महत्त्वाचे होते. ते वाढवले रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ने (१५ ऑगस्ट १९७५ साली प्रदर्शित झाला)! ‘शोले आणि मिनव्र्हा’ या एकाच नाण्याच्या दोन भक्कम बाजू आहेत. संपूर्ण मुंबईत फक्त मिनव्र्हात ‘शोले’ सत्तर एमएम आणि स्टीरिओफोनिक साऊंड अशा स्वरूपात होता (इतरत्र ३५ एमएमचा होता). मिनव्र्हात ‘शोले’ पाहण्याचा रोमांचक अनुभव घेतलेल्या नशीबवान पिढीतील मी एक आहे. आजही मला आठवतेय, ‘शोले’पासून मिनव्र्हाचे तिकीट दर वाढवताना अप्पर स्टॉल चार रुपये चाळीस पैसे तर बाल्कनी तिकीट दर पाच रुपये पन्नास पैसे असे होते. पण ते वसूल होत. जय आणि वीरु यांच्यातील नाणेफेकीत नाणे जणू आपल्या आसपास पडलंय, अशी अनुभूती मिळत असे. संपूर्ण चित्रपटभर हे उत्तम ध्वनिसंयोजन अनुभवाला येई. ‘शोले’साठी मिनव्र्हाची पुन्हा पुन्हा वारी करताना एकदा फक्त या ध्वनीसाठी किं वा डायलॉगबाजीसाठी पाहण्यासाठी येणारे चित्रपटवेडे खूप होते. मिनव्र्हात ‘शोले’ने दिवसा दीड, साडेपाच आणि साडेनऊ अशा तीन शोमध्ये ३१ ऑगस्ट १९७८ पर्यंत मुक्काम केला आणि मग तिथेच तो मॅटिनी शोला शिफ्ट झाला. त्यानंतर आणखीन दोन वर्षे अशी एकूण पाच वर्षे हा चित्रपट चालला आणि त्याने सामाजिक, सांस्कृतिक वातावरण ढवळून काढले. ‘शोले’चा मिनव्र्हातील प्रीमियर आजही चर्चेत असतो. सत्तर एमएमची प्रिन्ट इंग्लंडवरून आली तरी ती विमानतळावर अडवल्याने पस्तीस एमएमच्या प्रिन्टवर चित्रपटाचा प्रीमियर रंगला, तर ती प्रिन्ट उशिरा पोहोचल्याने रात्री उशिरा दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी  ‘शोले’ मोजक्याच जणांसह पहाटेपर्यंत पाहिला. ‘शोले’च्या अ‍ॅडव्हान्स तिकिटासाठी या मिनव्र्हावर कायमच किमान मैलभर रांग असे आणि अजिबात न कंटाळता चित्रपटप्रेमी रांगेत उभे राहत. त्यातही एक थरार होता. अभिनेते विजू खोटे अनेकदा गप्पांमध्ये रमल्यावर मिनव्र्हात लोकांबरोबर ‘शोले’ पाहिल्याचा अनुभव रंगवून सांगत असत.

मिनव्र्हाच्या आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या तर यश चोप्रा यांनी यशराज फिल्मचा ‘दाग’ (१९७३) याच मिनव्र्हात प्रदिर्शत केला. गुलशन रॉय या चित्रपटाचे वितरक होते. विशेष म्हणजे बीबीसीच्या राजेश खन्नावरच्या अनुबोधपटात मिनव्र्हातील ‘दाग’च्या प्रीमियरचे काही क्षण आहेत.

मिनव्र्हात अनेक चित्रपटांनी रौप्यमहोत्सवी यश संपादन के ले. यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’, ‘काला पत्थर’, रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शान’ आणि ‘शक्ती’, प्रमोद चक्रवर्ती दिग्दर्शित ‘आझाद’, मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘नसीब’, राज कपूर दिग्दर्शित ‘राम तेरी गंगा मैली’, अनिल शर्मा दिग्दर्शित ‘हुकूमत’, राकेश रोशन दिग्दर्शित ‘करण अर्जुन’, उमेश मेहरा दिग्दर्शित ‘सोहनी महिवाल’, बी. आर. चोप्रांचा ‘तवायफ’, एन. चंद्रांचा ‘नरसिंह’ असे अनेक चित्रपट. येथे शंभर दिवस चाललेले चित्रपटही अनेक आहेत. यात राजा चवाथे दिग्दर्शित ‘मनचली’, रवि टंडन दिग्दर्शित ‘झूठा कही का’, राज सिप्पीचा ‘सत्ते पे सत्ता’, उमेश मेहरांचा ‘अशांती’, ऋषी कपूर यांनी दिग्दर्शित के लेला एकमेव चित्रपट ‘आ अब लौट चले’, राजीव मेहरांचा ‘एक जान है हम’सारख्या चित्रपटांचा उल्लेख करता येईल. मिनव्र्हात अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी नाकारलेही. त्यातील काही नावे सांगायलाच हवीत. ‘दिल दौलत और दुनिया’, ‘मनोरंजन’, ‘प्रेम शास्त्र’, ‘महान’, ‘पुकार’ , ‘शरारा’, ‘बारुद’ ( अक्षयकुमार व रविना टंडन), ‘कोयला’, ‘रूप की रानी चोरो का राजा’, ‘चमत्कार’, ‘जीवन एक संघर्ष’, ‘कसम’, ‘किला’ वगैरे वगैरे.  चित्रपट रसिकांना आवडतो की ते तो नाकारणार यावर त्यांचा थिएटरमधील मुक्काम ठरतो. हे झाले दिवसा तीन खेळ याप्रमाणेचे प्रगती पुस्तक. याच मिनव्र्हातील मॅटिनी शोची गोष्ट आणखी वेगळी. अशोककुमार आणि प्राण यांनी ‘दो बेचारे बिना सहारे देखो पुछ पुछ कर हारे’ गात धमाल उडवलेला ‘व्हिक्टोरिया नंबर २०३’ने येथे मॅटिनी शोला तब्बल साठ आठवडे मुक्काम केला. तर ‘कागज की नाव’, ‘अमानुष’, ‘डिस्को डान्सर’ अशा काही चित्रपटांनी मॅटिनीला ज्युबिली हिट मुक्काम केला.

मिनव्र्हाच्या वाटचालीत सर्वाधिक फ्लॉप चित्रपट ठरला तो म्हणजे मनमोहन देसाई निर्मित ‘अनमोल’ ( ऋषी कपूर व मनीषा कोईराला). हा मॅटिनीलाच रीलिज झाला, पण पहिल्याच दिवशी खुर्च्या रिकाम्या राहिल्याचे खुद्द मनजींना आश्चार्य वाटले. तर राज कपूरने आपला ‘राम तेरी गंगा मैली’ (१९८५) आम्हा समीक्षकांना याच मिनव्र्हात प्रेक्षकांबरोबर दाखवला (अन्यथा आर. के. फिल्मचा सिनेमा त्यांच्या स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये दाखवत). विशेष म्हणजे, तात्कालिक समीक्षकांना हा चित्रपट राज कपूरच्या दर्जाचा वाटला नाही तरी पंधराशे खुच्र्यांचे हाऊसफुल्ल थिएटर या चित्रपटाला झक्कास दाद देत होते आणि मग येथेच या चित्रपटाने सुवर्ण महोत्सवी यश संपादन के ले.

मिनव्र्हा थिएटरची सजावट कायमच पाहण्यासारखी असे. मी गिरगावातच राहायला होतो, त्यामुळे ही सजावट पाहायला मी मिनव्र्हावर जात असे. त्या काळात अशी सजावट पाहण्याचीही प्रथा होती. ‘शोले’च्या सजावटीचाही प्रभाव पडला. ‘दाग’साठी के लेल्या सजावटीत शर्मिला टागोर आणि राखी यांच्या खांद्यावर हात ठेवलेला राजेश खन्ना असो अथवा ‘राम तेरी गंगा…’च्या सजावटीत धबधब्याखाली भिजणाऱ्या मंदाकिनीचे अतिशय भव्य कटआऊट लावण्यात आले होते. ‘सत्ते पे सत्ता’च्या वेळी मिनव्र्हावर करण्यात आलेल्या सजावटीचा फोटो आजही समाजमाध्यमांमध्ये लाईक्स मिळवतोय. मिनव्र्हाच्या तळमजल्यावरील शोकेसमध्ये भरपूर शो कार्ड्स पाहायला मिळत. विशेषत: आगामी चित्रपटाची काडर््स पाहून ‘पिक्चरमध्ये दम असेल का नसेल’ असेही ठामपणे सांगणारे असत.

कालांतराने मल्टिप्लेक्स युगात हे मेन थिएटरचे वैशिष्ट्य कालबाह््य होत गेले. २००६ साली मिनव्र्हाची विक्री झाली आणि काही दिवसांत थिएटरच पाडले गेले. सुरुवातीला वाटले चार स्क्रीन्सचे मल्टीप्लेक्स उभारले जाईल, पण बातमी आली की येथे भव्य आर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले जाईल. पण तसे काहीही न होता पुन्हा पुन्हा याच जागेच्या विक्रीच्या जाहिराती येऊ लागल्या आणि त्या जुन्या आठवणी देऊ लागल्या. आताही तेच झाले आहे. थिएटर म्हणजे चार भिंती, एक पडदा, प्रोजेक्शन, पब्लिक, त्यांच्या टाळ्या-शिट्ट्या यासह बरेच काही ना काही असते. अनेकांचे भावविश्वा या वास्तूशी जोडले गेलेले असते. आणि मग कधी गप्पांचा फड रंगला की जुन्या चित्रपटाच्या आठवणींसह थिएटरचा फ्लॅशबॅकही डोळ्यासमोर येतोच. आता तर ही वास्तूच नाहीशी झाल्याने फक्त आठवणी आहेत. मुंबईसह अनेक शहरातील, तालुक्यातील अशी जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स एकेक करत बंद होत आहेत, अनेकांच्या तर जुन्या खाणाखुणाही आज शिल्लक नाहीत. उदा. रेक्स थिएटर, मॅजेस्टिक सिनेमा वगैरे…

आज कधीही मिनव्र्हा थिएटरच्या फूटपाथवरून जाताना प्रत्यक्षात रिकामी जागा दिसते, पण डोळ्यासमोर मिनव्र्हाच्या भव्य पडद्यावरील ‘शोले’च्या गब्बरसिंगची दहशत आठवते. महत्त्वाचे म्हणजे एकदा खुद्द अमजद खान १३०व्या आठवड्यात येथे ‘शोले’ पाहायला आले त्याचीही बातमी झाली होती. आज मिनव्र्हाची वास्तू त्या जागेवर नसली तरी त्या वास्तूचा इतिहास, त्याच्या आठवणी चित्रपटप्रेमींच्या मनात चिरंतन राहतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 12:06 am

Web Title: memories country of cinema love the theater movie akp 94
Next Stories
1 कागदी भावनांचा खेळ
2 बहुकलाकारी! वेबमालिकांची
3 ‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई
Just Now!
X