राजकुमार राव आणि कंगना रणौत यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मेंटल है क्या’ या चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद सुरू झाला आहे. भारतीय मनोचिकित्सा संस्थेने चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला असून निर्मात्यांना लवकरात लवकर शीर्षक बदलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. मात्र या वादावर कंगनाच्या वतीने तिच्या बहिणीने रंगोलीने कंगनाची पाठराखण केली आहे.

“कंगनाची परवानगी घेत मी आज तिची कहाणी जगासमोर मांडत आहे. दोन वर्षांपूर्वी तिच्या एक्स प्रियकराने त्याच्या संपूर्ण नेटोटिज्म साथीदारांसोबत तिच्यावर शाब्दिक हल्ला चढविला होता. तिला वेडी, उलट्या पायांची अशी अनेक दुषणं लावली होती. इतकंच नाही तर जोक्स आणि मीम्सच्या माध्यमातूनही तिच्यावर टीका करण्यात आली. परंतु कंगनाने हा अपमान सहन करत या साऱ्याविरोधात लढा देण्याचा निर्णय घेतला”, असं ट्विट रंगोलीने केलं आहे.


“या चित्रपटामध्ये पूर्वग्रहदूषित लोकांविरोधातील कहाणीचं कथन करण्यात येणार आहे. थोडक्यात दोन वर्षांपूर्वी कंगनाने जे काही भोगलं आहे, त्या साऱ्याची कथा या चित्रपटात मांडण्यात येणार आहे. त्यासोबतच हा चित्रपट पाहिल्यानंतर साऱ्यांनाच कंगनाचा अभिमान वाटेल”, असं रंगोली म्हणाली.

पुढे तिने ‘द लिव्ह लाफ फाऊंडेशन’ला उद्देशूनही एक ट्विट केलं आहे. “मेंटल है क्या चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही दीपिकाऐवजी कंगनाची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती कराल”, असं म्हटलं आहे.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि राजकुमार राव स्टारर ‘मेंटल है क्या’ प्रदर्शनापूवीच वादात सापडला आहे. चित्रपटाचे नवे पोस्टर्स रिलीज झाल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन साइकेट्रिक सोसायटीने ‘मेंटल है क्या’ या टायटलवर आणि चित्रपटाच्या पोस्टर्सवर तीव्र आक्षेप नोंदवत, सेन्सॉर बोर्ड, माहिती व प्रसारण मंत्रालय, पीएमओ अशा सगळ्यांना पत्र लिहिले आहे.

‘मेंटल है क्या’ हा चित्रपट एकता कपूर प्रोड्यूस करत असून प्रकाश कोवेलामुडी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात कंगना व राजकुमार रावशिवाय अमायरा दस्तूर, अमृता पूरी, जिमी शेरगिल असे सगळे कलाकार आहेत. शाहरूख खानही यात कॅमिओ रोलमध्ये असल्याची चर्चा आहे.