गेल्यावर्षी मार्च महिन्यात कंगनाच्या ‘मेंटल है क्या’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. हे पोस्टर लाँच झाल्यापासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता आहे. हा चित्रपट हटके असणार याची खात्री प्रेक्षकांना आहे. त्यातून बॉलिवूडचे दोन आघाडीचे स्टार या चित्रपटात आहेत त्यामुळे प्रेक्षक ‘मेंटल है क्या’ या चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे. कंगनासोबत राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र कंगानानं चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलायला सांगितलं असल्याचं समजत आहे.
कंगनानं स्वत: दिग्दर्शित केलेला ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं खूप कौतुक झालं. कंगनाला या चित्रपटाच्या यशाचा आनंद घ्यायचा आहे. गेल्या काही महिन्यांपासून ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांशी’ च्या चित्रीकरण आणि त्यानंतर प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या कंगनाला थोडा वेळ हवा आहे. ‘मेंटल है क्या’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख मार्च असल्यानं कंगनाला स्वत:साठी वेळ देणं शक्य नव्हतं. म्हणूनच दोन चित्रपटाच्या मध्ये पुरसा काळ असावा या हेतूनं तिनं निर्मात्यांना ‘मेंटल है क्या’चं प्रदर्शन पुढे ढकलायला लावलं.
‘क्वीन’ चित्रपटानंतर कंगना आणि राजकुमार राव एकत्र काम करत आहे. मे महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटानंतर कंगनाचा ‘पंगा’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होत आहे. २०१९ च्या वर्षाअखेर ‘पंगा’ प्रदर्शित होणार असल्याचं समजत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2019 9:36 am