एकाच क्षेत्रातील दोन तज्ज्ञांमधील वैचारिक मतभेद काही नवीन नाहीत. आजवर हा प्रकार कला, साहित्य, विज्ञान, क्रीडा यांसारख्या अनेक क्षेत्रांत आपण पाहिलेला आहे. परंतु, राजकारण आणि अभिनयसृष्टीत याचे प्रदर्शन अधिक प्रकर्षांने पाहायला मिळते. याचे ताजे उदाहरण म्हणजे हॉलीवूड सुपरस्टार मेरिल स्ट्रिप आणि रोझ मॅक्गोवन यांच्यात रंगलेले ट्विटर युद्ध होय. हॉलीवूड चित्रनगरीत स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक शोषणाविरोधात सध्या मोठय़ा प्रमाणावर आवाज उठवला जात असून याच मुद्दय़ावरून या दोन आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये वाद झडला आहे.

सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेरिल स्ट्रीपने कारकिर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात समाजातील गंभीर समस्यांवर आपले लक्ष केंद्रित केले. दरम्यान, चित्रपट क्षेत्रात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरोधातही तिने आवाज उठवला. ‘गोल्डन ग्लोब’सारख्या मोठय़ा पुरस्कारांवर बहिष्काराची मागणी तर केलीच पण त्याचबरोबर मिळालेले अनेक पुरस्कारही तिने नाकारले. समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न मेरिलकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे. परंतु, अनेक श्रीमंत मंडळी केवळ प्रतिष्ठा आणि लोकप्रियतेसाठी सामाजिक प्रश्नांविरोधात आवाज उठवल्याचे नाटक करतात आणि मेरिलदेखील गेल्या काही वर्षांपासून असेच प्रयोग करीत असल्याचे गंभीर आरोप रोझ मॅक्गोवनने केले आहेत.

मेरिल गेले वर्षभर हार्वे वेन्स्टिनविरोधात आवाज उठवीत असून त्याच्यामुळे त्रस्त झालेल्या अनेक अभिनेत्रींना तिने जाहीर पाठिंबा दिला. हे सर्व कौतुकास्पद आहे, परंतु त्यामागचा तिचा हेतू संशयास्पद असल्याचा आरोप रोझने केला आहे. कारण, गेले अनेक वर्षे हार्वे आणि मेरिलची घट्ट मैत्री आहे. तेव्हा तिला त्याच्या विकृतीबद्दल काहीच कसे कळले नाही. शिवाय नवोदित अभिनेत्रींच्या तक्रारींकडेही तिने सोयीस्कर दुर्लक्ष केले. आज महिला कलाकारांच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित करणारी मेरिल इतकी वर्षे शांत का होती, असे अनेक प्रश्न रोझने उपस्थित केले आहेत. मेरिलने हे सगळे आरोप फेटाळून लावले. तसेच रोझवरच उलटे आरोप करीत तिच्या व हार्वेमधील मैत्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.