विकास बहलने आपल्या फॅन्टम कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी या कंपनीतील भागीदार असलेला प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप याने या प्रकरणावरुन अखेर आपले मौन तोडले आहे. तसेच ट्विटरवर या प्रकरणाचे स्पष्टीकरण देणारी मोठी पोस्ट लिहून त्याने पीडित महिलेची माफीही मागितली आहे.

अनुरागने ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, विकास बहलने पीडित कर्मचारी महिलेसोबत जे कृत्य केले त्याची मला माहिती होती. मात्र, तरीही कंपनीच्या धोरणांनुसार आपण या प्रकरणात कायदेशीररित्या काहीही करु शकलो नाही. मात्र, तरी वैयक्तिकरित्या त्या पीडित महिलेला माझ्याकडून जितकी होऊ शकेल तितकी मदत मी केली.

अनुरागने म्हटले की, आपण फॅन्टम कंपनीमधील एक भागीदार असलो तरी आपल्याजवळ विकास बहलला कंपनीतून काढून टाकण्याचे सामर्थ नव्हते. फॅन्टम कंपनी सुरु करताना करण्यात आलेल्या करारावेळी त्यांना सांगण्यात आले होते की, विकास बहल आणि त्याची लीगल टीम कंपनीशी जोडलेले सर्व प्रकरणे सांभाळतील कारण त्यामुळे आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करु शकू. त्यानंतर जेव्हा महिला कर्मचाऱ्याच्याबाबतीतील घटनेबाबत त्याला कळाले. त्यावेळी त्याने आपल्या लीगल टीमला याबाबत सांगितले. त्यावर याबाबत आपण जास्त काही करु शकत नाही असे त्याला सांगण्यात आले. मात्र, तरीही आपण विकासवर कारवाईसाठी कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर विकासला निलंबित करण्यात आले. तसेच कंपनीत येण्यापासून रोखण्यात आले. त्याचे अधिकारही काढून घेण्यात आले.

ज्यावेळी चित्रपटसृष्टीत लोक केवळ अफवांवर लक्ष देत होते. तेव्हा मी पहिला व्यक्ती होतो ज्याने अशा प्रकरणांबाबत माध्यमांमध्ये भाष्य केले. भलेही माझ्या नावाच्या उल्लेखाशिवाय याबाबतचे लिखाण प्रसिद्ध झाले असले तरी मी हे मुद्दे समोर घेऊन आलो होतो.

उशीरा या प्रकरणावर माध्यमांमध्ये बोलण्यावर अनुरागने स्पष्ट केले की, या प्रकरणातील पीडित महिला यापूर्वी समोर येण्यास इच्छूक नव्हती, त्यावेळी आम्ही तिच्या निर्णयाचा सन्मान केला. मात्र, आता जर ती खुलेपणाने यावर बोलत आहे तर आम्ही सुद्धा यावर बोलू शकतो. यासाठी आम्ही तिची परवागनही घेतली आहे.